Monday, 27 December 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 December 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 December 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ डिसेंबर २०२ सायंकाळी ६.१०

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं, चिंता वाढली आहे. सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड 19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** सर्व जिल्ह्यांत कोविड प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

** इतर मागास वर्गाला वगळून निवडणुका घेण्याचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर

** कंत्राटी कामगारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महामंडळ स्थापन केलं जाणार

आणि

** जनतेचे प्रश्न सोडण्यात राज्य सरकार अपयशी - केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉक्टर भारती पवार यांची टीका

****

सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांत कोविड प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ते आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलत होते. अधिक दक्षता बाळगून काटेकोर पावलं उचलण्याची गरज व्यक्त करत, मुख्यमंत्र्यांनी एक दोन दिवसांत राज्य कोविड कृती दलाची बैठक बोलावण्याचे निर्देश दिले. आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी या बैठकीत केलेल्या सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली. ८ डिसेंबर रोजी राज्यात कोविडचे सहा हजार दोनशे सक्रिय रुग्ण होते. मात्र गेल्या २० दिवसांत सक्रिय रुग्णांत ५० टक्के वाढ झाली असून, आज १० हजार सक्रिय रुग्ण आहेत. मागील सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या राज्याचा कोविड संसर्ग दर एक पूर्णांक शून्य सहा दशांश टक्के असल्याची माहितीही डॉ व्यास यांनी मंत्रिमंडळ बैठकीला दिली.

****

इतर मागास वर्ग - ओबीसींना वगळून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नये अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणारा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा ठराव सभागृहात मांडला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिनियमातील तरतुदीनुसार २७ टक्के ओबीसी आरक्षणाची तरतूद आहे, मात्र आरक्षणाशिवाय निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ओबीसी त्यांच्या हक्कांपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने, ओबीसी आरक्षण वगळून निवडणूक घेण्यात येऊ नये, अशी शिफारस एकमताने करत असल्याचं अजित पवार यांनी हे विधेयक मांडताना नमूद केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रस्तावाला समर्थन दिलं. हे विधेयक संमत झाल्यामुळे आता ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात येणार आहे.

पुरवणी मागण्यांसाठीचे विनियोजन विधेयकही आज विधानसभेत मंजूर करण्यात आलं.

****

राज्याग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांच्या रखडलेल्या देयकांची अर्धी रक्कम वित्त आयोगाच्या निधीतून भरली जाईल, ग्रामीण पाणीपुरवठा योजनाही देयकं न भरल्यामुळे बंद आहेत, या देयकातील अर्धी रक्कम संबंधित ग्रामपंचायतीन भरून सहकार्य करावं, असं ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत यासंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना नमूद केलं.

****

त्रुटीपूर्तता आणि अनुदाना अभावी राज्यातली कोणतीही शाळा बंद होणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधानपरिषदेत दिली. याबाबत वित्त विभागाकडून अभिप्राय मागवण्यात आला असून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला जाईल असंही गायकवाड यांनी सांगितलं.

****

कंत्राटी कामगारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी कंत्राटी कामगार महामंडळ तयार करण्याची सूचना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज विधानपरिषदेत केली. हे महामंडळ तयार करण्याबाबत कार्यवाही केली जाईल असं कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं.

राज्यातील शाळांमधून कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची पद भरण्याच्या विषयावर जानेवारी महिन्याच्या शेवटी बैठक घ्यावी अशी सूचना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली.

****

जैव इंधनाचा वापर वाढावा आणि पर्यावरण संवर्धनाला मदत व्हावी यासाठी, केंदीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने मानस अॅग्रो आणि लिफिनिटी बायो एनर्जी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार भंडारा जिल्ह्यातील मासळ इथं जैव इंधन केंद्र उभारलं जाणार आहे. या केंद्रांमध्ये शेती, उद्योग, तसंच घरामधून निघणारा कचरा यापासून इंधन तयार केलं जाईल. नागपूर तसंच छत्तीसगडची राजधानी रायपूर इथंही अशा जैव इंधन निर्मिती केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. या जैव इंधनावर वाहनं चालवण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. आयएसओ मानकानुसार डिझेलवर चालणारी बस पूर्णपणे जैवइंधनावर चालवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. नागपूर आणि रायपूर दरम्यान पहिली जैव इंधनावर चालणारी बससेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरु केली जाणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

****

एस टी कर्मचारी संपात सहभागी असलेल्या कामगारांच्या बडतर्फीचा निर्णय ताबडतोब मागे घेता येणार नाही, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत सांगितलं. या कामगारांना अनेक संधी देऊनही काही कामगार कामावर परतले नसल्यामुळे, विलानीकरणासंदर्भात त्रिसदस्यीय समितीचा जो अहवाल येईल तो राज्य सरकार मान्य करेल, असं परब यांनी सांगितलं. एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन यापुढे वेळेवरच होईल अशी ग्वाही परब यांनी दिली.

****

राज्यातील जनतेचे प्रश्न सोडण्यात राज्य सरकार अपयशी झालं असल्याची टीका केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केली. त्या आज उस्मानाबाद इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. एसटी कर्मचारी संपामुळे विस्कळीत जनजीवन, अनेक परीक्षांमध्ये घोटाळे, तसंच केंद्रावर वारंवार आरोप करून जबाबदारी टाळण्याचं राज्य सरकारचं धोरण, अशा अनेक मुद्यांवरून डॉ पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्ह्यात प्रस्तावित आयुष्य रुग्णालय सुरू करणे, तसंच स्त्री रुग्णालयातील महिला आणि बाल संगोपन विभागासाठी शंभर खाटांचे विस्तारीकरण या कामासाठी केंद्र सरकार राज्य सरकारच्या बरोबरीनं मदत करण्यास तयार असल्याचं आश्वासन पवार यांनी यावेळी दिलं.

****

औरंगाबाद शहरात पोलीस आयुक्त डॉ निखील गुप्ता यांच्या आदेशानं प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. आज मध्यरात्रीपासून हे आदेश लागू होत असून, ते येत्या ९ जानेवारीपर्यंत लागू राहणार असल्याचं, याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे.

****

No comments: