Tuesday, 28 December 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.12.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 December 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत, सदस्यांच्या वर्तणुकीबद्दल चर्चा करण्यात आली. सदस्यांच्या वर्तणुकीसंदर्भात आज विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांच्यासह सर्व नेते यावेळी उपस्थित होते. विधीमंडळ सदस्यांना शोभेल, इतर कोणाचा अपमान होणार नाही, असं सदस्यांचं वर्तन असलं पाहिजे, असं उपमुख्यमंत्री पवार यांनी विधानसभेत सांगितलं. सदस्यांनी शिस्त आणि शिष्टाचार पाळावा, असं आवाहन त्यांनी केलं.

****

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचं काम करताना होणाऱ्या मालवाहतुकीमुळे संबंधित जिल्ह्यातल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे, अशी तक्रार, सर्वपक्षीय सदस्यांनी आज विधानसभेत केली. संबंधित कंत्राटदारांकडून ते तातडीने दुरुस्त करून घेतले जातील अशी ग्वाही, सार्वजनिक उपक्रम खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. वाहतूक करणाऱ्या मोठमोठ्या डंपर्स मुळे ग्रामीण भागातल्या रस्त्यांची दुर्दशा झाल्याचे दोन प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले होते.

वाशिम जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांच्या शेतात समृद्धी महामार्गाच्या कामामुळे पाणी गेल्याने त्यांचं नुकसान झालं आहे, त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई द्या आणि पुन्हा पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावर बोलताना मंत्री शिंदे यांनी, अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असल्याचं सांगितलं.

****

विधान परिषदेत आज राज्यातल्या कोविड परिस्थितीवर चर्चा झाली. आरोग्य विभागातली रिक्त पदं भरण्यासंदर्भातला प्रश्न विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारला. रिक्त आणि मंजूर पदं भरण्याची प्रक्रिया सुरु असून, तोपर्यंत कंत्राटी पद्धतीने पदं भरली असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.  

दरम्यान, ओबीसी आरक्षण लागू करावं तसंच अल्पावधीत अधिवेशन घेतल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली.

****

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करत याविषयी माहिती दिली. गायकवाड काल विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये उपस्थित होत्या. आपली प्रकृती सध्या स्थिर असून, गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक आपल्या संपर्कात आले आहेत त्यांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन गायकवाड यांनी केलं आहे.

****

नीती आयोगानं काल ‘आरोग्यदायी राज्यं, प्रगतीशील भारत’ या अभियानाअंतर्गत २०१९-२० या वर्षासाठीचा अहवाल प्रकाशित केला. अशा प्रकारचा हा चौथा अहवाल आहे. या अहवालानुसार, आरोग्यविषयक क्षेत्रातल्या संर्वंकष कामगिरी या वर्गवारीत, केरळ पहिल्या, तामिळनाडू दुसऱ्या, तेलंगणा तिसऱ्या स्थानावर आहे. तर महाराष्ट्र पाचव्या स्थानावर आहे. आरोग्य क्षेत्राच्या विकासासाठीच्या कामगिरीशी संबंधित वर्गवारीत, महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे.

****

ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या हेमाताई रवींद्र रसाळ यांना यंदाचा ‘परभणी भूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. दैनिक गोदातीर समाचारच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन परभणीचा लौकिक वाढवणाऱ्या मान्यवरांचा या पुरस्कारानं गौरव केला जातो. एक जानेवारी रोजी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातल्या टाकळी ढोकेश्वर इथल्या जवाहर नवोदय विद्यालयात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढत असून ही संख्या ८३ झाली आहे. काल आणखी १२ विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आले.

****

नांदेड हून हिंगोली-वाशिम-अकोला मार्गे धावणारी नांदेड अमृतसर साप्ताहिक एक्सप्रेस गाडी उद्या २९ डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे.

दरम्यान, अकोला - तिरुपती - अकोला आणि पूर्णा - तिरुपती - पूर्णा या दोन विशेष रेल्वे गाड्यांना जानेवारी महिन्यात मुदतवाढ देण्यात आली असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.

****

नांदेड-पुणे द्वी-साप्ताहिक रेल्वे गाडी नवीन वर्षात, नांदेड-हडपसर-नांदेड अशी धावेल. या गाडीच्या रचनेत बदल करून तिला एल.एच.बी. कोचेस लावण्यात आले आहेत. येत्या दोन जानेवारीपासून या गाडीत २० डबे असतील. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे येत्या दोन जानेवारीला, जालना रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून या गाडीला रवाना करणार आहेत.

****

जयपूर इथं सुरू असलेल्या ३६व्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महिला कनिष्ठ गटात सांघिक प्रकारात महाराष्ट्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. याच गटात २०० मीटर्स स्प्रिंट प्रकारात महाराष्ट्राच्या संध्या कोकाटे आणि श्वेता गुंजाळ यांनी अंतिम फेरीत झेप घेतली.

****

No comments: