Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 26 December 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ डिसेंबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
ओमायक्रॉन हा कोरोना विषाणुचा
नवा प्रकार आपल्या देशातही आला आहे, या प्रकाराचा, वैज्ञानिक सातत्यानं अभ्यास करत आहेत आणि त्यांना रोज नवी माहिती मिळत आहे. कोरोना विषाणुच्या या नव्या स्वरुपाशी लढण्यासाठी
स्वयंजागरुकता, स्वयंशिस्त आवश्यक असून आपली सामुहिक शक्ती कोरोनाचा
पराभव करेल या जाणीवेसह आपल्या सर्वांना २०२२ या वर्षात प्रवेश करायचा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणी
वरच्या मन की बात या कार्यक्रम शृंखलेच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधताना बोलत
होते.
तामिळनाडू मध्ये हेलिकॉप्टर अपघातात हुतात्मा झालेले देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख
जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पंतप्रधानांनी यावेळी गौरवपूर्ण उल्लेख
केला. या अपघातात मृत्यूशी अनेक दिवस झुंज दिल्यानंतर मरण पावलेले कॅप्टन वरुण सिंह
यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहिलेल्या पत्राचा ही मोदी यांनी उल्लेख केला.
या पत्रात दिवंगत वरुण सिंह यांनी आपल्या यशाचा नव्हे तर आपल्या कमतरतांचा संदर्भ दिला
असून आपल्यातल्या उणीवांवर मात करण्यासाठी, विशेष करुन
विद्यार्थ्यांकरीता हे पत्र प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. परीक्षांपूर्वी
विद्यार्थ्यांशी आपण चर्चा करणार असून या कार्यक्रमासाठी २ दिवसांनंतर mygov.in
या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. २८ डिसेंबर पर्यंत नोंदणी उपलब्ध
असून यात ९ वी ते बारावीचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी
ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे, यात मोठ्या संख्येनं
सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.
पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेनं इतर देशांच्या लोकांना
महाभारताच्या महत्वाविषयी परिचय करुन देण्यासाठी सुरु केलेल्या ऑनलाईन अभ्यासक्रमाबद्दल
आणि देशविदेशातून त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात
प्रशंसा केली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य आणि प्रत्यक्ष
रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तिसरा संरक्षक म्हणजेच बुस्टर डोस देण्याच्या
केलेल्या घोषणेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केलं आहे. या लसीकरणाचं राज्यात योग्य पद्धतीनं नियोजन केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
बूस्टर डोस देण्यासंदर्भात अलिकडेच राज्य मंत्रिमंडळातदेखील
चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होतीच, असं मुख्यमंत्री म्हणाले. पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांचं देखील लसीकरण केल्यामुळे विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी
निश्चितपणे मदत होईल तसंच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनादेखील
बूस्टर डोसमुळे फायदा मिळेल, असं मुख्यमंत्री
ठाकरे म्हणाले.
****
भारत बायोटेक ची निर्मिती असलेली कोवॅक्सिन लस आपत्कालीन परिस्थितीत १२ ते १८ वयोगटातल्या
मुलांना देण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रौढ व्यक्ती आणि मुलांनाही देता येईल अशा
पद्धतीनं कोवॅक्सिन लस तयार करण्यात आली असल्याचं भारत बायोटेकनं म्हटलं आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा मूळ प्रकार आणि त्यानंतर आढळून
आलेल्या प्रकारांवर कोवॅक्सिन सुरक्षित आणि प्रभावी ठरली असल्याचं या कंपनीनं सांगितलं.
बालकांसाठी देखील ही लस सुरक्षित असल्याचं एका अभ्यासाद्वारे स्पष्ट झालं असल्याचंही
भारत बायोटेकनं म्हटलं आहे.
****
राज्यातील कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता
राज्य शासनाच्या सूचनेनुसार अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथलं साईबाबांचं समाधी मंदिर
रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत, बंद राहणार असल्याची माहिती
संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली. या वेळेत होणाऱ्या
पहाटेची काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीसाठी देखील भाविकांना प्रवेश दिला जाणार नसल्याचं
बानायत यांनी स्पष्ट केलं.
****
नाशिक जिल्ह्यातील ओझर जवळील जानोरी रस्त्यावर
परवानगी न घेता आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यती प्रकरणी शिवसेनेचे
माजी आमदार अनिल कदम यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यां विरोधात गुन्हे दाखल करण्यात
आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयानं बैलगाडा स्पर्धेसाठी परवानगी दिली, मात्र कदम आणि त्यांच्या समर्थकांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेला
पोलिसांची परवानगी घेण्यात आली नव्हती, त्यामुळे हे
गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर
नोंदणी केलेल्या बैलगाड्यांच्या स्पर्धा काल घेण्यात आल्या.
****
काश्मिर खोऱ्यात स्थानिक पोलीसांनी काल रात्री फरहीम भट या दहशतवाद्याला ठार केलं.
भटनं काही दिवसांपूर्वी इस्लामिक स्टेट या संघटनेचं सदस्यत्व घेतलं होतं. घटनास्थळी
सापडलेली शस्त्रास्त्र देखील पोलिसांनी ताब्यात घेतली.
//************//
No comments:
Post a Comment