Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 December 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २ डिसेंबर २०२१ सायंकाळी ६.१०
****
केंद्र आणि राज्य सरकारनं घरोघरी जाऊन
कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत आपण
सर्वांनी सहभागी होऊन लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच ज्यांनी
अद्याप लस घेतली नाही. त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करावं, कोरोना विषाणू
संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही, हे विसरू नका. आपली आणि आसपासच्या सर्वांची
काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा.
कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या
राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी
संपर्क करू शकता.
****
· कर्नाटकमध्ये `ओमायक्रॉन`चा संसर्ग झालेले दोन रुग्ण आढळले
· राज्यसभेत विरोधी पक्ष सदस्यांचा सभात्याग
· मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह निलंबित
आणि
· अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळित
****
देशात कोरोना विषाणू संसर्गाचा नवा प्रकार
`ओमायक्रॉनचा` शिरकाव झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज एका पत्रकार
परिषदेत ही माहिती दिली. कर्नाटकमध्ये या संसर्गाचे रुग्ण आढळले आहेत. ६६ आणि ४६
वर्षे वयाचे हे रुग्ण आहेत. त्यांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला असल्याचं आज स्पष्ट
झालं. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येत असल्याचं केंद्रीय आरोग्य
मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. कर्नाटकलगत राज्याच्या सीमा भागात या
पार्श्र्वभूमीवर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
राज्यसभेत आपल्याला विविध समस्या
मांडण्याची संधी दिली जात नाही या तक्रारीवरून आज काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, आप,
राजद आणि तेलंगणा राष्ट्र समिती या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.
दुपारी १२ वाजता सभागृहाचं कामकाज पहिल्यांदा तहकूब झालं. त्यानंतर
कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर उपाध्यक्ष
हरिवंशराय यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरु केला. मात्र विरोधी पक्षांनी १२
सदस्यांच्या निलंबनाचा मुद्दाच धरून ठेवला आणि विरोधी पक्ष नेत्यांना बोलण्याची
संधी दिली जावी अशी मागणी केली. सरकार महागाईसारख्या अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर
चर्चा होऊ देत नाही असा आरोप विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
त्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. प्रश्नोत्तराच्या तासानंतर
सभागृहाचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.
****
केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे रद्द
करण्याची राजपत्र अधिसूचना आज जारी केली. संसदेच्या सध्या सुरु असलेल्या हिवाळी
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये हे कायदे रद्द करण्याबाबतचं
विधेयक मंजूर केलं होतं. गेल्या महिन्यात १९ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
हे कायदे हिवाळी अधिवेशनात रद्द करण्याची घोषणा केली होती. तसंच आंदोलनकर्त्या
शेतकऱ्यांना आंदोलन थांबवून घरी जाण्याचं आवाहन केलं होतं. शेतीशी संबंधित सर्व
बाबीचा विचार करण्यासाठी एक समिती नेमण्याची घोषणाही पंतप्रधानांनी त्यावेळी केली
होती.
****
देशानं कोविडविरोधी लसीकरण मोहिमेत १२५
कोटींचा टप्पा पार केला आहे. हा प्रत्येक भारतीयांसाठी गर्वाचा क्षण असल्याचं
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. दरम्यान, देशात गेल्या २४
तासांत ९ हजार ७६५ रुग्णांना कोविड संसर्ग झाला असून ८ हजार ५४९ रुग्ण यातून मुक्त
झाले आहेत. आतापर्यंत संसर्गमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या तीन कोटी ४० लाख ३७
हजार ५४ झाली आहे. देशात सध्या या संसर्गाच्या ९९ हजार ७६३ रुग्णांवर उपचार सुरु
आहेत. केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत कोविड लसींच्या
१३८ कोटींपेक्षा जास्त मात्रा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
****
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह
यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्याविरुद्ध खंडणी, अनुसूचित जाती, जमाती
अत्याचार प्रतिबंधक गुन्हा प्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ही
कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या संदर्भातल्या
आदेशांवर स्वाक्षरी केली. बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमिततेचा ठपकाही त्यांच्यावर
ठेवण्यात आला आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात
२०२४ मध्ये केंद्रात पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल असं विधानसभेचे विरोधी
पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूल
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली, त्या भेटीबाबत फडणवीस आज पत्रकार
परिषदेत बोलत होते. विरोधी पक्षांमध्येच अंतर्गत सामना सुरू असून त्यांच्यातला
सामना संपल्यानंतर भारतीय जनता पक्षाशी कोण लढेल ते पाहू, असं फडणवीस यावेळी
म्हणाले. मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस नसून तृणमुल काँग्रेसच आहे, असं दाखवण्याचा
तृणमूल काँग्रेसचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज सकाळी
मुंबईतल्या सर एच. एन. रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सकाळच्या चाचणीनंतर त्यांना
सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मान आणि मणक्याच्या त्रासामुळे ते गेल्या दहा
नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी
त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पुढचे काही दिवस मुख्यमंत्र्यांना
घरूनच काम करण्याचा सल्ला देण्यात आला असल्याचं रुग्णालयातले डॉ. अजित देसाई यांनी
म्हटलं आहे.
****
अरबी समुद्राच्या अग्नेय भागात
चक्रीवादळाची परिस्थीती निर्माण झाल्याच्या प्रभावानं राज्याच्या अनेक भागात
गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाची परिस्थिती आजही कायम आहे.
अचानक आलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे हवेतला गारठा अचानक
वाढल्यानं आरोग्यविषयक तक्रारी वाढण्याची भितीही व्यक्त होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात
पैठण, बिडकीन, खुलताबाद परिसरात आज पाऊस झाला. औरंगाबाद शहरातही पाऊस झाला असून
परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. जालना जिल्ह्यातही आज सकाळपासून ढगाळ वातावरण
असून, हवेतला गारवा वाढला आहे. जिल्ह्यातल्या काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊसही
झाला. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, कापूस, तसंच मूग, उडीद, तूर, तीळ,
बाजरी, मका या पिकांचं मोठं नुकसान व्हायचा धोका निर्माण झाला आहे.
****
जवाद चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात
घेता संबलपुर - नांदेड - संबलपुर या जलद रेल्वेची उद्याची फेरी रद्द करण्यात आली
आहे. बिलासुर विभागात तांत्रिक काम सुरु असल्यामुळं नांदेड - संत्रागाच्ची -
नांदेड जलद रेल्वेची येत्या सहा आणि आठ डिसेंबरची फेरी रद्द करण्यात आली असल्याचं
दक्षिण मध्य रेल्वेतर्फे कळवण्यात आलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाचं काही दिवसांपासून
टळलेलं संकट पुन्हा ओमायक्रॉनच्या रुपानं येण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर
प्रत्येकानं योग्य काळजी घेण्याचं आवाहन परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी
केलं आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी जिल्हा
प्रशासनाकडून योग्य त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी लसीकरण करुन
घेणं अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment