Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 December 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ डिसेंबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
राज्यात
काही भागातल्या प्राथमिक शाळा आजपासून सुरु झाल्या.
बीड जिल्ह्यात
जिल्हा परिषद तसंच खाजगी संस्थेच्या शाळा सुरू झाल्या. शाळेत विद्यार्थांचं गुलाब पुष्प
देऊन स्वागत करण्यात आलं. शाळांमध्ये कोविड-19 संबंधी नियम पाळण्यात येत असून, शिक्षण
विभागाच्या वतीनं यावर देखरेख ठेवण्यात येत आहे.
धुळे जिल्ह्यातही
प्राथमिक शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचं तापमान मोजून शाळेत प्रवेश देण्यात
आला. नंदुरबार जिल्ह्यातही शाळा सुरु झाल्यानं विद्यार्थ्यांसोबतच पालकांमध्ये देखील
आनंदाचं वातावरण पहायला मिळालं. नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या दोन हजार १४ शाळा
सुरु झाल्या.
दरम्यान,
मुंबई महानगरपालिका क्षेत्र, ठाणे जिल्हा, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात,
१५ डिसेंबरपासून प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहेत. औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर महापालिकेनंही
१० डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचं ठरवलं आहे. तर नांदेड जिल्ह्यात १३ डिसेंबरपासून
शाळा सुरू होणार आहेत.
****
संसदेच्या
हिवाळी अधिवेशनात आज दोन्ही सभागृहात विरोधकांनी विविध मुद्यांवर गदारोळ केला.
लोकसभेत
कामकाज सुरु होताच तेलंगणा राष्ट्र समितीच्या खासदारांनी समान अन्नधान्य खरेदी धोरण
किमान आधारभूत किंमतीसंदर्भात कायदा करण्याची मागणी लाऊन धरली. या सदस्यांनी हौद्यात
उतरुन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या गदारोळातच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्ताचा
तास सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र गदारोळ वाढत गेल्यानं, सदनाचं कामकाज एका तासासाठी
तहकूब करण्यात आलं होतं.
राज्यसभेतही
१२ खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला.
त्यामुळे सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.
****
देशाच्या
जीडीपी म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादनात वर्तमान आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत
जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत सर्वात जलद वाढ नोंदवली गेली आहे. देशाचा जीडीपी
दर एक वर्षापूर्वीच्या तुलनेत आठ पूर्णांक चार दशांश टक्के नोंदवला गेला असल्याचं,
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं काल जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. या कालावधीत
उत्पादनात साडे पाच टक्के वाढ झाली आहे, तर बांधकाम विभागात दुसऱ्या तिमाहीत साडे सात
टक्के वाढ झाली आहे. कोरोना विषाणूच्या व्यत्ययानंतर अर्थव्यवस्थेतील मागणी हळूहळू
पूर्वपदावर आल्याने या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे.
****
नाशिक इथं
होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे. तीन ते
पाच डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या संमेलनासाठी मुख्य मंडपाची बांधणी अंतिम टप्प्यात
आली आहे. या संमेलनात विविध विषयांवरील परिसंवाद, कवी कट्टा संमेलन असे विविध उपक्रम
होणार आहेत.
दरम्यान,
नाशिक इथं चार आणि पाच डिसेंबर रोजी होणाऱ्या पंधराव्या विद्रोही साहित्य संमेलनाचं
उद्घाटन डॉ. गोहर रजा यांच्या हस्ते होणार आहे. मुख्य संयोजक राजू देसले आणि स्वागताध्यक्ष
शशिकांत उनवणे यांनी ही माहिती दिली.
****
औरंगाबाद
तालुक्यातल्या आडगाव बुद्रुक, निपाणी आणि सातारा इथल्या २२५ लाभार्थ्यांना, महात्मा
जोतीबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत कर्जमुक्ती देण्यात यावी, असे निर्देश,
सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले. या यासंदर्भात काल मुंबईत बैठक झाली.
या सर्वांना विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून कर्ज देण्यात आलं
होतं.
****
स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात जालना पोलीस दलात जवळपास
पाचशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक तपासणी करण्यात आली. पोलीस दलातले अधिकारी
आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असून, त्यासाठी व्यायामाबरोबर
उत्तम आहार घेणं गरजेचं असल्याचं, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी यावेळी सांगितलं.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या
किशोरवयीन मुलींसाठी आज संवाद कार्यशाळा घेण्यात येत आहे. मुलींमधल्या शारीरिक, मानसिक
आणि भावनिक ताण-तणावांचा विचार करून, त्यांच्या शालेय गळतीचं प्रमाण, बालमजुरी तसंच
बालविवाह यांचं वाढत चाललेल्या प्रमाणाबद्दल या कार्यशाळेत समुपदेशन केलं जात आहे.
****
मुंबई उपनगराच्या
अनेक भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. वातावरणात गारवाही निर्माण झाला आहे. पालघर, ठाणे,
नाशिक जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत
असल्यानं राज्यात येत्या दोन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली
आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे.
****
No comments:
Post a Comment