Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 December 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ डिसेंबर २०२१ सकाळी ७.१० मि.
****
केंद्र आणि राज्य सरकारनं घरोघरी जाऊन कोरोना विषाणू
प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊन
लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच
ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी
सहकार्य करावं. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही, हे विसरू नका. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा,
सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -19 शी संबंधित अधिक
माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी
किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·तीन कृषी कायद्यांच्या
विरोधातील आंदोलनादरम्यान मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना
कोणतीही आर्थिक मदत दिली जाणार नसल्याचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचं स्पष्टीकरण
·संसदेत
मंजूर झालेल्या तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या विधेयकाला
राष्ट्रपतींची मंजुरी
·मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र
सरकारनं विशेष पॅकेज देण्याची औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची लोकसभेत मागणी
·२०२४च्या लोकसभा
निवडणुकीत
भारतीय जनता पक्षाला सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्यावर, पश्चिम बंगालच्या
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार यांच्यात चर्चा
·शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर
यांच्यावर अडीचशे
कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा भाजपचा आरोप, खोतकरांनी आरोप फेटाळले
·राज्यात
७६७ नवे कोरोना विषाणू बाधित रुगण; मराठवाड्यात
चार जणांचा मृत्यू तर
३६ बाधित
आणि
·
अरबी समुद्र तसंच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अनेक भागात पाऊस तर मराठवाडा, विदर्भात दिवसभर ढगाळ वातावरण
****
तीन कृषी कायद्यांच्या विरोधात वर्षभरापासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान अनेक
शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या मृतकांच्या कुटुंबियांना कोणतीही आर्थिक मदत दिली
जाणार नसल्याचं, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर
यांनी काल संसदेत स्पष्ट केलं. या मृत शेतकऱ्यांच्या
कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत लोकसभेत उपस्थित
केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, त्यांनी हे स्पष्टीकरण
दिलं. तब्बल वर्षभर चाललेल्या या आंदोलना दरम्यान, किती
शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, याची कोणतीच आकडेवारी उपलब्ध नाही,
त्यामुळे भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं ते म्हणाले.
दरम्यान, शेतकरी आंदोलनाचं नेतृत्त्व करणाऱ्या संयुक्त
किसान मोर्चानं ७०० हून अधिक शेतकऱ्यांनी या आंदोलनात जीव
गमावल्याचा दावा केला आहे.
****
संसदेत
मंजूर झालेल्या तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या विधेयकाला
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल मंजुरी दिली. त्यामुळे आता हे कायदे
रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
****
मराठवाड्यात अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्यांसाठी केंद्र
सरकारनं विशेष पॅकेज देण्याची मागणी, औरंगाबादचे
खासदार इम्तियाज जलील यांनी काल लोकसभेत केली. नापिकीला
कंटाळून मराठवाड्यात गेल्या वर्षभरात ७५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
अतिवृष्टीचे फक्त पंचनामे करण्यात आले. मात्र, पिक विम्याचे
पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही. राज्य सरकार म्हणते केंद्र सरकार नं त्यांचा हिस्सा
दिलेला नाही, त्यामुळे पिक विम्याचे पैसे देता येत नाहीत.
केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणामुळे शेतकऱ्यांच्या या आत्महत्या होत असल्याचा
आरोपही, खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी केला.
****
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता
पक्षाला सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्यावर पश्चिम बंगालच्या
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चा झाली असल्याचं, राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. मुंबईच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या बॅनर्जी यांनी काल पवार यांची भेट घेतली. देशातील समविचारी पक्षांनी
राष्ट्रीय स्तरावर एकत्रित येण्यासह अन्य काही मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं पवार यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना सांगितलं. चर्चा
सकारात्मक झाल्याचं ते म्हणाले. भाजपाविरोधी असलेल्या
कुणालाही एकत्र यायचं असेल, तर त्यांचं स्वागत आहे, नेतृत्व
हा महत्त्वाचा मुद्दा नसल्याचं पवार म्हणाले.
****
कोरोना विषाणूच्या नव्या ओमायक्रॉन प्रकाराच्या
पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लागू केलेल्या प्रमाण कार्य प्रणालीनुसार राज्यानं
निर्बंध लागू करावेत, अशी सूचना केंद्रीय आरोग्य सचीव राजेश
भुषण यांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात केली आहे. राज्य
सरकारनं परदेशी प्रवाशांसाठी लागू केलेले निर्बंध केंद्र सरकारच्या निर्बंधाशी
सुसंगत नाही, असं या पत्रात म्हटलं आहे.
राज्य सरकारनं परदेशातून राज्यात येणाऱ्या सर्वच प्रवाशांना आरटीपीसीआर
चाचणी बंधनकारक केली आहे. मात्र केंद्र सरकारनं कोरोनाचा नवा प्रकार
आढळणाऱ्या जोखीम असलेल्या देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांचीच आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. अन्य देशातून याणाऱ्या प्रवाशांना केवळ १४
दिवसांच्या विलगीकरणाची सक्ती केली आहे.
****
आगामी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
पाच डिसेंबरपर्यंत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदवता
येणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस.
मदान यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. भारत निवडणूक आयोगानं
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी वाढवल्यामुळे
मतदारांना ही नाव नोंदणी करता येणार आहे.
****
राज्यात बहुतांश भागातल्या प्राथमिक शाळा कालपासून सुरु झाल्या.
जालना,
परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या सर्व
प्राथमिक शाळा कालपासून उघडण्यात आल्या. औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण
भागातल्या प्राथमिक शाळा कालपासून सुरू झाल्या. राज्याच्या अन्य भागातल्या प्राथमिक
शाळांही सुरू झाल्या आहेत. काल पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत
सोडण्यासाठी पालकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साह दिसून आला.
****
शिवसेनेचे
माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा
आरोप, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. ते काल जालना इथं वार्ताहरांशी
बोलत होते. खोतकर यांनी जालना तालुक्यातल्या रामनगर सहकारी साखर कारखान्याची जमीन हडप
केली, जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांनी अर्जुन बिजनेस सेंटर सुरु केलं. यासंदर्भातली
कादगपत्रं विविध विभागांना देण्यात आली असून, त्याची प्रत्यक्ष पाहणी केल्याचं, सोमय्या
यांनी सांगितलं.
दरम्यान,
खोतकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं हा खटाटोप सुरु
असल्याचं ते म्हणाले.
****
राज्यात काल ७६७ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ३६
हजार, ४२५ झाली आहे. काल २८
रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची
एकूण संख्या, एक लाख ४१ हजार ०२५
झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर
कायम आहे. काल ९०३ रुग्ण बरे झाले, राज्यात
आतापर्यंत ६४ लाख ८४ हजार ३३८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड
मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ७ दशांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या सात हजार ३९१
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ३६ नवे कोरोना
विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर चार जणांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या तीन, तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा
समावेश आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यात १२ नवे रुग्ण आढळले. बीड दहा, लातूर सहा, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यात
प्रत्येकी तीन, तर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला. जालना जिल्ह्यात काल कोविडचा एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या उपमहापौर पदी
काँग्रेस पक्षाचे अब्दुल गफार अब्दुल सत्तार
यांची, तर स्थायी समितीच्या सभापती पदी,
किशोर स्वामी यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोन्ही
पदासाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातलं बालविवाहाचं प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या
माध्यमातून बालविवाह मुक्त गाव ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याचं, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी म्हटलं आहे. त्या काल उस्मानाबाद इथं आयोजित किशोरवयीन मुलींसाठी संवाद कार्यशाळेत बोलत
होत्या. शाळकरी मुलींचे बालविवाह, आरोग्य, शिक्षण यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी, जिल्ह्यातल्या
प्रत्येक शाळेत तक्रार पेटी बसवण्यात येणार असून, पालक- शिक्षक- संस्थाचालक आणि प्रशासन यांच्यात
विश्वासाचं नातं निर्माण करण्यात येणार असल्याचं, त्या
म्हणाल्या. यावेळी मुलींना बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी जागरूक राहण्याची शपथ देण्यात
आली.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे २०२० आणि २०२१ या वर्षांचे जीवनगौरव पुरस्कार, काल पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांच्या हस्ते वितरीत
करण्यात आले. २०२० चा पुरस्कार, साहित्यिक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांना, तर २०२१ चा पुरस्कार,
माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलतांना डॉक्टर लहाने यांनी, ज्ञानाचा समाजाच्या
विकासासाठी उपयोग करण्याचं आवाहन केलं. शहरी आणि ग्रामीण भागातले उत्कृष्ट महाविद्यालय,
तसंच उत्कृष्ट शिक्षक या पुरस्कारांचंही वितरण यावेळी करण्यात
आलं.
****
उस्मानाबादच्या
पौर्णिमा खरमाटे ही रांची इथं होणाऱ्या कुस्ती
स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाचं प्रतिनीधीत्व करणार आहे. पौर्णिमानं
औरंगाबाद इथं झालेल्या १५ वर्ष वयोगटाखालील ६२ किलो वजनीगटाच्या कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक
मिळवलं आहे.
****
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक नियमांचं पालन न केल्याबद्दल
परभणी शहरातल्या पाथरी रस्त्यावरील दोन पेट्रोल पंपांना जिल्हा प्रशासनानं
काल टाळ ठोकलं. या पेट्रोलपंपांवर कोविड प्रतिबंधक लस घेतली
असल्याबाबतची खात्री न करताच, तसंच विनामास्क
ग्राहकांना इंधनाची विक्री केली जात असल्याचं
निदर्शनास आल्यानंतर, ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेनं सहा जणांचं पथक नियुक्त
केलं आहे.
****
अरबी
समुद्र तसंच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे
राज्यातल्या अनेक भागात ऐन हिवाळ्यात पाऊस झाला. काल मुंबई, पुणे, मध्य महाराष्ट्र
आणि खान्देशात अवकाळी पाऊस पडला. मराठवाडा, विदर्भात दिवसभर ढगाळ वातावरण राहील्यानं
थंडीचा कडाका वाढला आहे.
नाशिक जिल्ह्यात अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे द्राक्ष
आणि कांदा पिकाला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
धुळे जिल्ह्यात काल दुपारी काही काळ पावसाच्या
हलक्या सरी कोसळल्या. धुळ्यात थंड वारे वाहत असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे.
सातारा जिल्ह्याच्या सर्वच भागात मुसळधार पावसाचं
थैमान सुरू असून, जनजीवन विस्कळीत झालं
आहे.
दरम्यान,
अरबी समुद्रात कच्छनजीक कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे मराठवाडा, विदर्भ, कोकण, मध्य
महाराष्ट्रात आणखी दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे.
त्यामुळे काही भागात पाऊस पडण्याचाही अंदाज आहे.
****
No comments:
Post a Comment