Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 December 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ डिसेंबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
भारताचा
अनुभव आणि कौशल्याचा लाभ इतर राष्ट्रांना देण्यात आणि शिकण्यात भारत उत्सुक असल्याचं,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आर्थिक तंत्रज्ञानावर आधारित नेतृत्व मंच
- इन्फिनिटी फोरमचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत
होते. तंत्रज्ञान किंवा नाविन्याच्या बाबतीत भारत मागे नाही, हे देशानं सिद्ध केलं
असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
आंतरराष्ट्रीय
दिव्यांग दिनानिमित्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण
केलं. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीनं देण्यात येणारे हे
पुरस्कार दिव्यांग, दिव्यांगांसाठी कार्यरत व्यक्ती, संस्थांना प्रदान करण्यात आले.
राज्यातल्या ११ व्यक्ती आणि एका संस्थेला यावेळी गौरवण्यात आलं. श्रवण दोष असणारा औरंगाबादचा
शिवछत्रपती पुरस्कार विजेता जलतरण पटू सागर बडवे आणि लातूरच्या प्राध्यापक डॉक्टर प्रीती
पोहेकर यांना यावेळी पुरस्कार देण्यात आला.
****
औरंगाबाद
इथं आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीनं,
दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि सवलतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी,
एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या
हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. शासनानं दिव्यांगांच्या निधीत वाढ करावी, दिव्यांगांना
स्वस्त धान्य दुकानातून अन्न धान्य पुरवठा वाढवावा, दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या
शिष्यवृत्तीत वाढ करावी यासह अन्य मागण्या, दिव्यांगांचे प्रतिनिधी बन्सीधर निकम, रमा
जगताप यांनी यावेळी केल्या.
****
नाशिक इथं
कुसुमाग्रज नगरीत आयोजित ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज सकाळी ग्रंथ
दिंडीनं प्रारंभ झाला. टिळकवाडी इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यालयापासून ग्रंथदिंडीला
सुरुवात झाली. यावेळी नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, साहित्य
महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील उपस्थित होते. ढोल पथक तसंच शालेय विद्यार्थ्यांचा
सहभाग, लेझीम, नृत्य पथक यामुळे अत्यंत उत्साहाच्या वातावरणात ही ग्रंथदिंडी नाशिकच्या
सार्वजनिक वाचनालयापर्यंत नेण्यात आली.
ज्येष्ठ
साहित्यिक विश्वास पाटील यांच्या हस्ते आज संध्याकाळी साडे चार वाजता संमेलनाचं औपचारिक
उद्घाटन होणार आहे. संमेलनाध्यक्ष जयंत नारळीकर प्रकृतीच्या कारणास्तव उद्घाटन समारंभात
उपस्थित राहू शकणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाइन, तर गीतकार जावेद अख्तर
हे प्रत्यक्ष हजेरी लावणार आहेत.
****
मानव विकास
कार्यक्रमांतर्गत राज्यातल्या २३ जिल्ह्यांमधल्या १२५ मागास तालुक्यातल्या महिला बचतगट
आणि अनुसूचित जाती जमातीचं सक्षमीकरण करण्यासाठी, प्रत्येक तालुक्याला एक कोटी रुपये
प्रमाणे, १२५ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असून, ही विशेष योजना राबविण्यासाठी
मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या विशेष योजनेबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. यामुळे राज्यातल्या मागास तालुक्यांमधल्या
नागरिकांना रोजगार निर्मितीच्या समान संधी उपलब्ध होणार असून, या भागांच्या विकासाला
गती मिळणार आहे. या जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातल्या जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड
या जिल्ह्यांचा समावेश आहे.
****
राज्यात
कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या आणि २०२२ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या
परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचं संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष
बाब म्हणून माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा
गायकवाड यांनी ही माहिती दिली. अशा विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे दहावी आणि
बारावी परिक्षा शुल्क भरण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
राहिल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा येऊन पुढील वाटचाल खंडीत होण्याची
शक्यता आहे. यामुळे त्यांना शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
****
परभणी महानगरपालिका
हद्दीतील व्यापाऱ्यांसह विक्रेत्यांनी कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरु नयेत,
अन्यथा त्यांच्याविरुध्द कारवाई केली जाईल, असा इशारा महानगरपालिका प्रशासनानं एका
प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे. प्लास्टिक बंदी संदर्भात तीन प्रभाग समित्यांमधून
पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
भारत आणि
न्यूझीलंड दरम्यान मुंबई इथं सुरु असेलल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या
पहिल्या दिवशी, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा, भारताच्या दहा षटकात बिनबाद २९ धावा
झाल्या होत्या. मुंबईत जोरदार पाऊस झाल्यानं खेळपट्टी ओली झाली होती, त्यामुळे सामना
उशीरा सुरु करण्यात आला.
****
No comments:
Post a Comment