Friday, 3 December 2021

TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.12.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 December 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओमायक्रान हा नवा प्रकार आढळून आल्याचं चिंता वाढली आहे. आपल्या सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

ठळक बातम्या

****

·      कोरोना विषाणू ओमायक्रॉनचे कर्नाटकात दोन रुग्ण, अतिधोकादायक म्हणून सूचिबद्ध केलेल्या देशांमधल्या प्रवाशांसाठी राज्य सरकारची नवी मार्गदर्शक तत्वे जारी

·      मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिं आणि उपायुक्त पराग मणेरे निलंबित

·      शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर विम्याची रक्कम येत्या आठ दिवसात जमा करण्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांचे निर्देश

·      ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून नाशिकमध्ये प्रारंभ    

·      राज्यात ७९६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात दोन जणांचा मृत्यू तर ३७ बाधित

·      कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार, चंद्रकांत जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

आणि

·      भारत - न्यूझीलंड यांच्यात आजपासून मुंबईत दुसरा कसोटी क्रिकेट सामना

****

कोरोना विषाणुचा नवा अवतार ओमायक्रॉननं भारतात शिरकाव केला असून, कर्नाटकात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. आतापर्यंत एकूण २९ देशांमध्ये ओमायक्रॉन विषाणुचे रुग्ण आढळल्याचं त्यांनी दिल्लीत वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.

हे दोन्ही रुग्ण परदेशी नागरिक असून त्यांचं वय ६६ आणि ४६ वर्षे असं आहे. या बाधित दोन्ही रुग्णांमध्ये विषाणुची अत्यंत सौम्य लक्षणं असून, कोणतीही गंभीर लक्षणं दिसत नसल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. बंगळुरूमध्ये ओमायक्रॉन संसर्ग आढळलेल्या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची ओळख पटवण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ६६ वर्षीय रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २६४ लोकांची ओळख पटली असून, त्या सर्वांना या संसर्गाची लागण झालेली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. बंगळुरू महापालिकेचे मुख्य प्रशासक गौरव गुप्ता यांनी ही माहिती दिली. हा संसर्ग आढळलेल्या ४६ वर्षीय रुग्णाच्या प्रवासाचा कोणताही तपशील नाही. त्याच्या संपर्कात २१८ लोक आले होते. कोरोना विषाणू संसर्ग चाचणीमध्ये यातल्या पाच जणांना संसर्ग झाला असल्याचं आढळलं आहे. ओमायक्रॉन संसर्ग झालेल्या या दोन्ही रुग्णांनी कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत.

रम्यान, कर्नाटकात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर नीती आयोगाचे सदस्य असलेले डॉ. व्ही. के. पॉल यांनी, आता केंद्र सरकारचं पहिलं प्राधान्य हे पात्र व्यक्तींना पूर्णपणे लसीकृत करण्याला असल्याचं सांगितलं. लसीकरणाचा वेग आणि प्रमाण वाढणं ही सध्याची गरज आहे. कुणीही लसीचे दोन्ही डोस घेऊन पूर्णपणे लसीकृत होण्याला विलंब करता कामा नये, डॉ. पॉल म्हणाले.

****

ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्वरुपाच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारनं, अतिधोकादायक म्हणून सूचिबद्ध केलेल्या देशांमधल्या प्रवाशांसाठी नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार, दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना आणि झिंबाब्वे हे तीन देश अतिधोकादायक म्हणून सूचिबद्ध केले आहेत. त्यामुळे आता या देशांमधून महराष्ट्रात येणाऱ्या, संच महाराष्ट्रात येण्यापूर्वीच्या १५ दिवसांमध्ये या देशांमध्ये प्रवास करून आलेले नागरिक,तिधोकादायक हवाई प्रवासी म्हणून समजले जाणार आहेत.

याअनुषंगानं इमिग्रेशन कार्यालय, तरच परदेशी प्रवाशांच्या नोंदणी कार्यालयानं विमान प्रवास करून येत असलेल्या प्रवाशांच्यामधून स्थलांतरीत झालेल्या नागरिकांसंबंधीच्या मागच्या १५ दिवसांच्या प्रवासाबद्दलची माहिती उपलब्ध करून द्यावी, असंही या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलं आहे.

यासोबतच राज्यात येणाऱ्या देशांतर्गत विमान प्रवाशांनी कोविड १९ प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असणं, किंवा ७२ तांसांपेक्षा अधिक जुना नसलेला आरटीपीसीआर बाधित नसलेला अहवाल सादर करणं बंधनकारक असणार आहे.

****

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि त्यांचे सहकारी उपायुक्त पराग मणेरे यांना राज्य सरकारनं काल अखेर सेवेतून निलंबित केलं. त्यांच्याविरुद्ध खंडणी, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक गुन्हा प्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकानं तडकाफडकी ही कारवाई केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल या संदर्भातल्या आदेशांवर स्वाक्षरी केली. त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू झाली असून, त्यांनी विना परवानगी राज्याबाहेर जाऊ नये, तसंच निलंबन कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यापार आणि व्यवसाय यात सहभागी होऊ नये, असं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. सिंग हे भारतीय पोलिस सेवेतील १९८८च्या तुकडीमधील अधिकारी असून कर्तव्यावर अनधिकृतपणे अनुपस्थित राहण्यासह, काही अनियमितता आणि केलेल्या चुकांबद्दल आता त्यांना शिस्तभंग कारवाईचा सामना करावा लागणार आहे.

****

शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर विम्याची रक्कम येत्या आठ दिवसात जमा करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. मुंबईत आढावा बैठकीत ते काल बोलत होते. शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रश्नावर चालढकल करणाऱ्या आणि विम्याचे पैसे शेतकऱ्यांना न मिळाल्यास विमा कंपन्यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशाराही भुसे यांनी दिला आहे. मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये विम्याच्या संदर्भात २३ जिल्ह्यांनी अधिसूचना काढल्या असून, या जिल्ह्यात ४२५ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे, ही नुकसानभरपाईची रक्कम तातडीनं देण्याची कार्यवाही विमा कंपन्यांनी करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले.

****

९४ वं अखिल भारतीय मराठी संमेलन आजपासून नाशिकच्या कुसुमाग्रज नगरीत सुरु होत आहे. वैज्ञानिक साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या हस्ते आज संध्याकाळी साडे चार वाजता संमेलनाचं उद्घाटन होईल. या सोहळ्यास ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर हे प्रमुख पाहुणे म्हणून प्रत्यक्ष, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी सकाळी परंपरेनुसार कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून ग्रंथ दिंडी निघणार आहे. पाच तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार आहे.

****

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या निमित्तानं दिव्यांग नोंदणी प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मिळवून देण्यासाठी, राज्यभरात १२ डिसेंबर ते १२ मार्च २०२२ या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. जागतिक दिव्यांग दिनाच्या पूर्वसंध्येला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी हा निर्णय घोषीत केला.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या निमित्तानं आज उस्मानाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या दिव्यांग आघाडीच्या वतीनं, दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

राज्यात काल ७९६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ३ हजार, २२१ झाली आहे. काल २४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४ हजार ४९ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल ९५२ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६४ लाख ८ हजार २९० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ७ दशांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या सात हजार २०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ३७ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये जालना आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

लातूर जिल्ह्यात १७ नवे रुग्ण आढळले. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी आठ, बीड तीन, तर उस्मानाबाद जिल्ह्यात एक नवा रुग्ण आढळला. नांदेड, परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात काल कोविडचा एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

कोरोना विषाणू संसर्गाचं काही दिवसांपासून टळलेलं संकट पुन्हा ओमायक्रॉनच्या रुपानं येण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर, प्रत्येकानं योग्य काळजी घेण्याचं आवाहन, परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केलं आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असून, नागरिकांनी लसीकरण करुन घेणं अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी मास्क, निर्जंतुकीकरणासह शारीरिक अंतर पाळून या संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं, असं गोयल यांनी म्हटलं आहे.

****

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद आज राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण करणार आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीनं देण्यात येणारे हे पुरस्कार दिव्यांग, दिव्यांगांसाठी कार्यरत व्यक्ती, संस्थांना दिल्लीच्या विज्ञान भवनात सकाळी अकरा वाजता प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील नऊ दिव्यांगांसह, श्रवण दोष असणारे औरंगाबादचे शिवछत्रपती पुरस्कार विजेता जलतरण पटू सागर बडवे आणि लातूरच्या प्राध्यापक डॉक्टर प्रिती पोहेकर यांचा समावेश आहे. सागरची आई कांचन बडवे यांनी त्याच्या या यशाबद्दल मोठा आनंद व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या….

‘‘त्याने तीन कर्णबधीरांच्या ओलम्पिक स्पर्धेत भाग घेतला आहे. प्रत्येक वेळेला दहाच्या आत त्याचा नंबर आलेला आहे. सुमारे दिडशे तरी सुवर्ण पदकं त्याच्याकडे असतील. सलग सात वर्ष त्याने नॉमर्ल नॅशनल पण केलेल्या आहेत, आणि असं करणारा मराठवाड्यातला एकुलता एक आहे. समुद्री स्पर्धा किंवा लांब पल्याच्या नदीतल्या स्पर्धा या जिब्रायटल म्हणजे स्पेन ते मोरोको असं करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. आणि झ्यूरीच लेक स्विट्जरलैंडमधली स्पर्धा असते स्विमिंग मॅरेथॉन तर ती त्याने पाचव्या क्रमांकावर जिंकलेली आहे नॉर्मल गटात आणि त्यावर्षी असं करणार तो सगळ्यात लहान एकुलता एक अपंग आणि एकुलता एक आशियाई खेळाडू होता.’’

****

उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी वसंत नागदे यांची तर उपाध्यक्षपदी माजी आमदार वैजनाथ शिंदे यांची निवड झाली आहे. बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची काल अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी बैठक झाली, त्यावेळी ही निवड करण्यात आली.

****

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे आमदार, चंद्रकांत जाधव यांच्या पार्थिवावर काल कोल्हापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. जाधव यांचं काल निधन झालं, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद इथल्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे.

****

भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून मुंबईतल्या वानखेडे मैदानावर सुरू होत आहे. मुंबईत अधूनमधून पाऊस सुरू असल्यानं त्याचा प्रभाव सामन्यावर पडू शकतो. दोन सामन्यांच्या मालिकेत कानपूर इथला पहिला सामना अनिर्णीत राहिला आहे. त्यामुळं आज सुरू होत असलेल्या सामन्यातला विजयी संघ सामन्यासह मालिकेमध्येही विजयी ठरणार आहे.

****

अरबी समुद्राच्या अग्नेय भागात चक्रीवादळाची परिस्थीती निर्माण झाल्याच्या प्रभावानं, राज्याच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाची परिस्थिती कायम आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण, बिडकीन, खुलताबाद परिसरात काल पाऊस झाला. औरंगाबाद शहरातही पाऊस झाला असून, परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. जालना, बीड जिल्ह्यात काही भागातही पाऊसही झाला.

****

No comments: