Tuesday, 25 January 2022

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 January 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 January 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ जानेवारी २०२ सायंकाळी ६.१०

****

देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा.. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा..

****

·      ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं आज सायंकाळी देशवासियांना संबोधन.

·      देशभरातल्या ९३९ पोलिसांना विविध पदकं जाहीर; महाराष्ट्रातल्या ५१ पोलिसांचा समावेश.

·      बारावा राष्ट्रीय मतदार दिवस आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा.

आणि

·      कोविड संसर्गाची तिसरी लाट महिनाभरात ओसरण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त.

****

देशाचा त्र्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उद्या साजरा होत आहे. राजधानी दिल्लीत उद्या सकाळी साडे दहा वाजता प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम राजपथावर होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद तीनही सैन्यदलांच्या संचलनाचं निरीक्षण करून मानवंदना स्वीकारतील. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये महाराष्ट्राची वारली कला प्रदर्शित केली जाणार आहे.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज संध्याकाळी देशातल्या नागरिकांना उद्देशून भाषण करणार आहेत. राष्ट्रपतींचं भाषण सर्व राष्ट्रीय वाहिन्या तसंच आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून संध्याकाळी सात वाजता प्रसारित होईल. त्याचबरोबर हे भाषण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून रात्री साडे नऊ वाजता प्रादेशिक भाषांमधून देखील ऐकता येईल.

****

यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातल्या ९३९ पोलिसांना विविध पदकं जाहीर झाली आहेत.

यामध्ये ८८ जणांना विशिष्ठ सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालं आहे. यात राज्यातल्या चार जणांचा समावेश आहे. मुंबईचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विनय करगावकर, धुळे इथले राज्य राखीव पोलिस दलाचे कंमांडंट प्रल्हाद खाडे, पुणे इथले पोलिस निरीक्षक चंद्रकांत गुंडगे, आणि नांदेड इथले पोलिस उपनिरीक्षक अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा यांना विशिष्ठ सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालं आहे.

१८९ जणांना शौर्यासाठी पोलिस पदक जाहीर झालं आहे. यात महाराष्ट्रातल्या गोपाळ उसेंदी, महेंद्र कुलेटी, संजय बाकमवार, भरत नागरे, दिवाकर नारोटे, निलेश्वर पाडा, संतोष पोटावी या सात जणांचा समावेश आहे.

६६२ जणांना उल्लेखनीय कामगिरीसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालं आहे. यामध्ये राज्यातल्या ४० जणांचा समावेश आहे. परभणी इथल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक भारत हुंबे, लातूर इथले पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, औरंगाबाद इथले पोलिस निरीक्षक सुरेंद्र मळाले आणि परभणी इथले पोलिस निरीक्षक राजेश जाधव यांचा यामध्ये समावेश आहे.

 

अग्निशमन विभागाचे विशिष्ठ पदकही जाहीर झाली आहेत. महाराष्ट्रातले अग्निशमन दलाचे जवान बाळू देशमुख यांना शौर्यासाठी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक मरणोत्तर जाहीर झालं आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांना विशिष्ठ सेवेसाठी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर झालं आहे. उत्कृष्ट सेवेसाठी अग्निशमन सेवा पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातले मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, आणि अग्निशमन दलाचे जवान सुरेश पाटील, संजय म्हामुनकर, चंद्रकांत अनादास यांचा समावेश आहे.

****

राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी नागरिकांनी प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरु नये असं गृह विभागाच्या परिपत्रकात आदेशित करण्यात आलं आहे. प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबवण्यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

****

बारावा राष्ट्रीय मतदार दिवस आज साजरा करण्यात आला. यंदाच्या राष्ट्रीय मतदान दिनाचं घोषवाक्य, ‘सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्वक मतदान प्रक्रिया’ असं होत. यानिमित्त आज नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यक्रमात उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, तर केंद्रीय कायदा मंत्री किरेन रीजीजू प्रत्यक्ष सहभागी झाले. यावेळी सुरक्षा व्यवस्थापन, निवडणूक व्यवस्थापन, सुलभ निवडणुका, मतदार जागृती तसंच प्रसार क्षेत्रातलं योगदान अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्य आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना २०२१ - २२ या वर्षासाठीचे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

मतदार दिनाचा राज्य शासनाचा मुख्य कार्यक्रम औरंगाबाद इथं झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, अभिनेता मकरंद अनासपुरे, अभिनेत्री चिन्मयी सुर्वे, यांच्यासह अनेक मान्यवरांनी मतदारांचे अधिकार आणि कर्तव्यांवर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. यावेळी नवमतदारांना मतदार ओळखपत्रांचं वाटप करण्यात आलं.

 देशात लोकशाही बळकट व्हावी तसंच आपल्या कर्तव्याची जाणीव करुन देण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करत असल्याचं, लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी म्हटलं आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आणि दयानंद कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते.

हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयात ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ कार्यक्रमात उप जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप कच्छवे यांनी मार्गदर्शन करताना, लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणं आवश्यक असल्याचं नमूद केलं.

परभणी इथं राष्ट्रीय मतदार दिवस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झाला. प्रथमच नाव नोंदणी केलेल्या नवमतदारांना मतदान ओळखपत्राचे वाटप तसंच प्रथमच नोंदणी झालेल्या पाच तृतीयपंथी मतदारांचा सत्कार करण्यात आला.

नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदारांसाठीची प्रतिज्ञा घेण्यात आली.

****

वर्धा जिल्ह्यात देवळी तालुक्यातल्या सेलसुरा इथं चारचाकी वाहनाचा भीषण अपघात होऊन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने जवळपास ४० फूट पुलावरून गाडी खाली नदीत कोसळून हा अपघात झाला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं. पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. 

****

कोविड संसर्गाची एका महिन्यात तिसरी लाट ओसरण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेनं वर्तवली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली. आज औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या कोविड परिस्थितीचा आढावा घेतला, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. मात्र कोविड प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशासह राज्यात लसीकरणाचं उद्दीष्ट साध्य केल्यामुळे तिसऱ्या लाटेचा जास्त परिणाम जाणवत नसल्याचं देशमुख म्हणाले. औरंगाबाद इथल्या घाटी रुग्णालयात वाहनतळ, खेळाचे मैदान, नर्सिंग महाविद्यालयाचा विस्तार, नवीन अभ्यासक्रम, विद्यार्थी वसतिगृह या मागण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

****

दरम्यान, औरंगाबाद अणि लातूर इथल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातल्या कंत्राटी कामगार, सफाईगार तसंच बाह्य रुग्ण विभाग-ओपीडीतल्या वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याची मागणी आयटक कामगार संघटनेच्या वतीनं वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्री अमित देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासंदर्भात देशमुख यांनी मागेच आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी यावेळी विधीज्ञ अभय टाकसाळ यांनी केली.

****

औरंगाबाद इथं गावठी बंदुक बाळगणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये शहरातल्या गजानननगर इथं राहणाऱ्या हितेंद्र वाघमारे आणि बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या हिरापूर इथं राहणाऱ्या अनिकेत वडमारे या दोघांचा समावेश आहे.  त्यांच्याकडून एक गावठी बंदुक, एक जिवंत काडतूस आणि इतर साहित्य असे एक लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

****

लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करणार असल्याचं राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितलं.

****

No comments: