Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 25 January 2022
Time
7.10 AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि.
****
देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं
ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं,
आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं
आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा,
दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती
आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०-
२६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· नागरिकांच्या अपेक्षांचा दबाव घेण्यापेक्षा त्यातून प्रेरणा घ्यावी - राष्ट्रीय
बाल पुरस्कार वितरण कार्यक्रमात पंतप्रधानांचं आवाहन’
· आज राष्ट्रीय मतदार दिन; राज्य शासनातर्फे मतदार दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचं
औरंगाबाद इथं आयोजन
· राज्यात ओमायक्रॉन संसर्ग झालेले नवे ८६ तर कोविड संसर्ग झालेले नवे २८ हजार
२८६ रुग्ण; मराठवाड्यात सात रुग्णांचा मृत्यू तर दोन हजार ८०२ नव्या रुग्णांची नोंद
· मुख्यमंत्र्यांची टीका नगरपंचायतींच्या पराभवातून आलेल्या नैराश्यामुळे - भाजप
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
· औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावीच्या वर्गांना आजपासून
पुन्हा प्रारंभ
· उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी १६४
अर्ज दाखल
· परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात तिघांचा मृत्यू
आणि
· राज्यात थंडीचा कडाका वाढला
****
नागरिकांच्या अपेक्षांचा दबाव घेण्यापेक्षा त्यातून प्रेरणा घ्या, असं आवाहन,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल २०२१ आणि २०२२ साठीच्या ‘प्रधानमंत्री
राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं’ ब्लॉक चेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी वितरण केलं, त्यावेळी
ते बोलत होते.
हा पुरस्कार पाच ते १५ वर्षे वयोगटातल्या मुलांना नवोपक्रम, सामाजिक कार्य,
शिक्षण, क्रीडा, कला आणि संस्कृती तसंच शौर्य या सहा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी
दिला जातो. गौरव पदक, एक लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
२०२२ यावर्षासाठी देशभरातल्या २९ पुरस्कार विजेत्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. हे
सर्व पुरस्कार विजेते प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनामध्येही सहभागी होणार आहेत. पुरस्कार
विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या नांदेड इथला कामेश्वर वाघमारे, नागपूरचा श्रीनभ अग्रवाल,
मुंबईचा जिया राय, नाशिकचा स्वयं पाटील, जळगावची शिवांगी काळे तसंच पुण्याची जुई केसकर
यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व बालकांचं अभिनंदन केलं आहे.
****
राष्ट्रीय मतदार दिन आज साजरा होत आहे. यंदाच्या राष्ट्रीय मतदान दिनाचं घोषवाक्य,
‘सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्वक मतदान प्रक्रिया’ असं आहे. त्याअनुषंगानं
निवडणूक आयोगाचं कार्य सुरु असून, राज्यातल्या पुरुष मतदारांच्या संख्येत एक पूर्णांक
८६ टक्के, महिला मतदारांच्या संख्येत एक पूर्णांक ९१ टक्के, तृतीयपंथी मतदारांमध्ये
२७ टक्के, आणि दिव्यांग मतदारांमध्ये, १८ पूर्णांक २२ टक्के वाढ झाली आहे. राज्यात
२३ लाख तीन हजार नवीन मतदारांची वाढ झाली असून, २३ लाख नऊ हजार मतदार वगळण्यात आल्याची
माहिती, निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
यांनी दिली. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्य शासनाचा मतदार दिनाचा मुख्य कार्यक्रम आज औरंगाबाद इथं सकाळी दहा वाजता,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात होणार आहे. या कार्यक्रमात
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळाचं, तसंच टेलिग्राम बॉटचं लोकार्पण
होणार आहे. डॉ. दीपक पवार यांच्या “लोकशाही समजून घेताना” या पुस्तकाचं प्रकाशन होणार
असून, नवमतदारांना मतदार ओळखपत्राचं वाटप, पथनाट्य तसंच अभिरूप मतदान केंद्राचं दालन,
आणि विविध आकर्षक साहित्यांनी सुशोभित लोकशाही भिंत उभारण्यात येणार आहे.
****
राष्ट्रीय बालिका दिन काल देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. बालिकांचे
अधिकार, मुलींच्या शिक्षणाचं तसंच त्यांच्या आरोग्य आणि पोषणाचं महत्व, याबाबत जनजागृतीच्या
उद्देशानं, २००८ पासून दरवर्षी २४ जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो.
बालिकांच्या कल्याणासाठी शासनातर्फे बेटी बचाव, बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी, उडान,
यासारख्या विविध योजना राबवल्या जात आहे. उस्मानाबाद इथं राष्ट्रीय बालिका दिनानिमित्तानं
टपाल खात्यात बालिकांची खाती काढण्यासाठी प्रस्ताव अर्ज दाखल करण्यात आले, तसंच सात
बालिकांची सुकन्या समृद्धी योजनेत खाती उघडण्यात आली.
****
राज्य सरकारने आणलेल्या कृषी वीज जोडणी धोरणात शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास त्यांना
थकीत वीज बिलामध्ये सरसकट पन्नास टक्के सूट मिळेल, असं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी
म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीतल्या सर्व
घटक पक्षांनी एकत्र येऊन विज बिल समस्यांचं निराकरण करणं आवश्यक असल्याचंही राऊत म्हणाले.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना कोरोना विषाणूची
लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटर वरून ही माहिती दिली. सध्या ते मुंबई इथल्या सिल्व्हर
ओक या निवासस्थानी गृहविलगीकरणात आहेत. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ची तपासणी
करावी असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांच्या
तब्येतीची दूरध्वनीवरून चौकशी केली.
****
राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेले नवे ८६ रुग्ण आढळले. यामध्ये नागपूर जिल्ह्यातले
४७, पुणे ३२, वर्धा दोन तर मुंबई, अमरावती, यवतमाळ, ठाणे आणि भंडारा जिल्ह्यातल्या
प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या
दोन हजार ८४५ एवढी असून, यापैकी एक हजार ४५४ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे २८ हजार २८६ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या ७५ लाख ३५ हजार ५११ झाली आहे. काल ३६ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४२ हजार
१५१ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८८ शतांश टक्के झाला आहे. काल २१ हजार ९४१ रुग्ण
बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७० लाख ८९ हजार ९३६ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९४ पूर्णांक शून्य नऊ दशांश टक्के झाला आहे. राज्यात
सध्या दोन लाख ९९ हजार ६०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल दोन हजार ८०२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर सात रुग्णांचा
मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या तीन तर लातूर, जालना, नांदेड आणि हिंगोली
जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश
आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ५९६ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातले
४६३, तर ग्रामीण भागातले १३३ रुग्ण आहेत. लातूर जिल्ह्यात ४९७, नांदेड ४८४, जालना ३३१,
परभणी ३०१, उस्मानाबाद २६८, बीड १७७, तर हिंगोली जिल्ह्यात १४८ रुग्णांची नव्यानं नोंद
झाली.
****
भाजपासोबत पहिल्या क्रमांकावर असलेली शिवसेना आता चौथ्या क्रमांकार आहे, त्यामुळे
कोणासोबत सडले, याचा विचार करावा, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवा युतीसंदर्भात केलेल्या टीकेवर
ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी भाजपवर केलेली टीका नगरपंचायत
निवडणुकीतल्या पराभवामुळे आलेल्या नैराश्यातून केली असल्याचं, भारतीय जनता पक्षाचे
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात बोलत होते. भाजपचं
हिंदुत्व हे ढोंग असल्याची टीका ठाकरे यांनी केली होती. हताश झालेले मुख्यमंत्री आपल्या
पक्षाचा ऱ्हास होताना पाहून भाजपवर टीका करत असल्याचं पाटील म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
नाना पटोले हे पंतप्रधानांविषयी ज्या प्रकारे बोलत आहेत, ते पाहता पटोले यांच्या राजकारणाचा
स्तर किती घसरला आहे याचा काँग्रेस पक्षाने विचार करावा, असं सांगतानाच पाटील यांनी,
पटोले यांच्या वृत्तीचा निषेध करत असल्याचं सांगितलं. भाजपातर्फे राज्यात ठिकठिकाणी
पटोले यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
मराठवाड्यात औरंगाबाद, परभणीसह अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन, घोषणाबाजी
करून पटोले यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
****
औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागातले इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग आजपासून
सुरु होत आहेत. कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन करुन शाळा सुरु करण्याच्या
सूचना, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात
कोविड संदर्भात साप्ताहिक आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात कोविड लसीची दुसरी
मात्रा देण्यासाठी अधिक प्रयत्न करणं गरजेचं असून, घरोघरी जाऊन लस देण्यासंदर्भात पाठपुरावा
करण्याच्या सूचना, जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. औरंगाबाद हद्दीत सर्व सोयीसुविधांनी युक्त
असं कोरोना सुश्रुषा केंद्र सुरु करून, तिथे चार बालरोग तज्ञ डॉक्टरांची तत्काळ नेमणूक
करावी, गृहविलगीकरणातल्या रुग्णांची वेळावेळी फोनद्वारे चौकशी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी
चव्हाण यांनी दिले.
****
परभणी जिल्ह्यात ग्रामीण तसंच शहरी भागातले इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग कालपासून
सुरू झाले. परंतू, काल शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांशी शाळांमधून विद्यार्थ्यांची तुरळक
उपस्थिती दिसून आली. दरम्यान, शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांनी सुटकेचा
निःश्वास सोडला. उर्वरीत शैक्षणिक वर्ष सुरळीतपणे सुरु राहावं, अशी अपेक्षा पालकांनी
व्यक्त केली आहे.
****
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंधरा जागांसाठी
उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी कालपर्यंत १६४ अर्ज प्राप्त झाले. आज दाखल
अर्जांची छाननी होणार असून २७ जानेवारी रोजी उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. २७
जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. २० फेब्रुवारी
रोजी मतदान तर २१ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या अकोली शिवारात काल सकाळी ट्रक आणि दुचाकीचा
भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तिघांपैकी दोघे सख्खे भाऊ असून,
तिसरा तरूण त्यांचा चुलत भाऊ असल्याचं समजतं. हे तिघे दुचाकीवरून जिंतूरकडे जात असताना
अकोली शिवारात भरधाव ट्रकवर आदळल्याने हा अपघात झाला.
****
राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड मध्ये काल पाच
अंश सेल्सिअस, आणि नाशिक शहरात सहा पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
झाली. कुंदेवाडी इथं निच्चांकी तीन पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वत रागांमध्ये असणाऱ्या
डाब आणि वालंबा परिसरात यंदा दुसऱ्यांदा दवबिंदू गोठल्याचं दिसून आलं. औरंगाबाद शहरात
तापमान आज पहाटे सुमारे ११ अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलं होतं या हवामानाचा गहू, हरभरा,
भाजीपाला, कांदा, द्राक्ष यांच्यावर परिणाम होताना दिसून येत आहे. सध्या कांद्यावर
बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत असल्यानं, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
राज्यात येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान
कोरडं राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता
हवामान खात्यानं वर्तवली आहे
****
हळदीच्या वाढत्या उत्पादनातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास
मदत होईल, असं मत, कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलं आहे. वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागामार्फत, काल एकदिवसीय ऑनलाईन राज्यस्तरीय हळद कार्यशाळा
घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. हळदीचं उत्पादन, काढणी, गुणवत्ता वाढ, जाहिरात
आणि निर्यात या विषयांवर या कार्यशाळेत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू
डॉ. अशोक ढवण यांनी मार्गदर्शन केलं.
****
गावाच्या विकासासाठी सरपंचांनी विविध योजनांच्या माध्यमातून कामं करून घेण्यासाठी
पुढाकार घ्यावा, असं आवाहन, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केलं आहे. लातूर
जिल्ह्यात उदगीर इथल्या तीन नवीन वास्तूंच्या बांधकामाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत
होते. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कणा असलेल्या उदगीर पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचं
कामं दर्जेदार करण्याचे निर्देश बनसोडे यांनी दिले.
****
राज्यातल्या सिटी सर्व्हेचं काम झालेल्या शहरांमध्ये सातबारा बंद करून त्याठिकाणी
फक्त प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय, भूमी अभिलेख विभागानं घेतला असून, त्यासाठी
एन आय सी च्या मदतीने संगणक प्रणाली विकसित केली आहे. जमिनींच्या खरेदी विक्रीच्या
व्यवहारात होणारी फसवणूक कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment