Wednesday, 26 January 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.01.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 January 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

****

आमच्या सर्व श्रोत्यांना ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

****

देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      देशात प्रजासत्ताक दिनाचा सर्वत्र उत्साह, प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर असलेला भारत ऊर्जा आणि आत्मविश्वासानं जगात सर्वोच्च स्थानी पोहोचेल - राष्ट्रपतींना विश्वास

·      ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभ अत्रे, संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत, यांना पद्मविभुषण,  पुण्यातल्या सिरम संस्थेचे प्रमुख सायरस पुनावाला, भारत बायोटेकचे प्रमुख कृष्णा इला आणि सुचित्रा इला, माजी खासदार गुलाम नबी आझाद, यांच्यासह १७ जणांना पद्मभुषण जाहीर

·      ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण, गायक सोनू निगम, डॉ हिंमतराव बावस्कर, डॉक्टर विजयकुमार डोंगरे, डॉक्टर भीमसेन सिंघल, आणि दिवंगत डॉक्टर बालाजी तांबे यांच्यासह १०७ जणांना पद्मश्री सन्मान

·      राज्य पोलिस दलातील चार जणांना विशिष्ठ सेवेसाठी, सात जणांना शौर्यासाठी तर ४० जणांना उल्लेखनीय कामगिरीसाठीचं राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर

·      औरंगाबाद विमानतळाचं छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नामकरण करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

·       राज्यात ओमायक्रॉनचे १३ तर कोविड संसर्गाचे ३३ हजार ९१४ नवे रुग्ण, मराठवाड्यात तीन जणांचा मृत्यू तर तीन हजार १६१ बाधित

आणि

·      राज्यातल्या महाविद्यालयांचे नियमित वर्ग एक फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता

****

देशाचा त्र्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आज साजरा होत आहे. राजधानी दिल्लीत सकाळी साडे दहा वाजता प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम राजपथावर होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद तीनही सैन्यदलांच्या संचलनाचं निरीक्षण करून मानवंदना स्वीकारतील. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये महाराष्ट्राची वारली कला प्रदर्शित केली जाणार आहे. राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात आपल्या आवडत्या चित्ररथाला आणि मार्चिंग तुकडीला ऑनलाइन मत देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोविड पार्श्वभूमीवर ऑनलाइन माध्यमातून थेट प्रक्षेपण बघण्यासाठी माय गव्ह या पोर्टलवर नोंदणी करता येणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

****

देशप्रेमाची भावना देशवासियांची कर्तव्यनिष्ठेला बळ देते. आपल्या कर्तव्याचं निष्ठा आणि कुशलतेनं पालन करणं, हेच आपलं देशाप्रती प्राथमिक आणि महत्त्वाचं योगदान असल्याचं, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात देशानं केलेल्या प्रगतीचा उल्लेख करत, देश त्याच ऊर्जा आणि आत्मविश्वासाने प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर असेल, आणि जगात सर्वोच्च स्थानी पोहोचेल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. ते काल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करत होते. २१वं शतक हे हवामान बदलाचं युग ठरत असून, या बदलांना सामोरं जाण्यासाठी भारत जगाचं नेतृत्व करत दिशादर्शन करत असल्याचं, राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

भारताने प्रतिकूल परिस्थीतीतही कोविड संसर्गाचा दृढ संकल्पातून मुकाबला केला. प्रादुर्भावानंतर वर्षभरात कोविड लस तयार करून, आज देशात कोविड लसीकरण समाधानकारक रित्या सुरू असून, याचं जगभरातून कौतुक होत असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. भविष्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत सक्षम स्थितीत असल्याचं, राष्ट्रपतींनी नमूद केलं.

****

पद्म पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभ अत्रे यांना पद्मविभुषण सन्मान जाहीर झाला असून, दिवंगत तिन्ही सशस्त्र दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत, गीता प्रेस विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दिवंगत राधेश्याम खेमका आणि माजी राज्यपाल दिवंगत कल्याणसिंह यांना मरणोत्तर पद्मविभुषण सन्मान जाहीर झाला आहे.

पुण्यातल्या सिरम संस्थेचे प्रमुख सायरस पुनावाला, भारत बायोटेकचे प्रमुख कृष्णा इला आणि सुचित्रा इला, टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर, माजी खासदार गुलाम नबी आझाद, ज्येष्ठ गायक राशीद खान, मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यनारायण नडेला, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदरराजन पिचाई, यांच्यासह १७ जणांना पद्मभुषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण, गायक सोनू निगम, डॉ हिंमतराव बावस्कर, डॉक्टर विजयकुमार डोंगरे, डॉक्टर भीमसेन सिंघल, अनिल राजवंशी, ॲथलीट नीरज चोप्रा, दिव्यांग नेमबाज अवनी लेखरा, आणि दिवंगत डॉक्टर बालाजी तांबे यांच्यासह १०७ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

****

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातल्या ९३९ पोलिसांना विविध पदकं जाहीर झाली आहेत.

यामध्ये ८८ जणांना विशिष्ठ सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालं आहे. यात राज्यातल्या चार जणांचा समावेश आहे. मुंबईचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विनय कोरेगावकर, धुळे इथले राज्य राखीव पोलिस दलाचे कंमांडंट प्रल्हाद खाडे, पुणे इथले पोलिस निरीक्षक चंद्रकांत गुंडगे, आणि नांदेड इथले पोलिस उपनिरीक्षक अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा यांना विशिष्ठ सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालं आहे. नांदेडचे भूमिपुत्र झारखंड राज्याचे अपर पोलिस महासंचालक संजय लाठकर यांनाही राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालं आहे, त्यांनी काही काल हिंगोली आणि लातूरमध्ये पोलिस अधिक्षक म्हणून काम केलं आहे.

१८९ जणांना शौर्यासाठी पोलिस पदक जाहीर झालं आहे. यात महाराष्ट्रातल्या गोपाळ उसेंडी, महेंद्र कुलेटी, संजय बाकमवार, भरत नागरे, दिवाकर नरोटे, निलेश्वर पाडा, संतोष पोटावी या सात जणांचा समावेश आहे.

६६२ जणांना उल्लेखनीय कामगिरीसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालं यामध्ये राज्यातल्या ४० जणांचा समावेश आहे. परभणी इथल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक भारत हुंबे, लातूर इथले पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, औरंगाबाद इथले पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे आणि परभणी इथले पोलिस निरीक्षक राजेश जाधव यांचा यामध्ये समावेश आहे.

 

अग्निशमन विभागासाठी विशिष्ट पदकही काल जाहीर झाली. महाराष्ट्रातले अग्निशमन दलाचे जवान बाळू देशमुख यांना शौर्यासाठी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक मरणोत्तर जाहीर झालं आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांना विशिष्ठ सेवेसाठी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर झालं आहे. उत्कृष्ट सेवेसाठी अग्निशमन सेवा पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातले मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, जवान सुरेश पाटील, संजय म्हामुनकर, चंद्रकांत अनादास यांचा समावेश आहे.

****

सैन्यदलासाठीचे शौर्य पुरस्कारही काल जाहीर झाले. सहा सैनिकांना शौर्यचक्र जाहीर झालं असून, यापैकी पाच जणांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झालं आहे. चार उत्तम युद्ध सेवा पदक, १९ सैनिकांना परमविशिष्ट सेवा पदक, ३३ अतिविशिष्ट सेवा पदकं, १० युद्ध सेवा पदकं, ७७ विशिष्ट सेवा पदकं तर ८४ सेवा पदकं जाहीर झाली आहेत.

५१ जीवन रक्षा पदकांनाही राष्ट्रपतींनी काल मंजूरी दिली. यामध्ये सहा सर्वोत्तम जीवन रक्षा पदकं, १६ उत्तम जीवन रक्षा पदकं, तर २९ जीवन रक्षा पदकांचा समावेश आहे.

****

औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद शहरातल्या संत एकनाथ रंगमंदिराचं नूतनीकरणानंतर काल लोकार्पण करण्यात आलं. त्यावेळी मुख्यमंत्री दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा प्रस्ताव राज्य विधीमंडळात संमत झाला आहे. औरंगाबाद शहरासाठीच्या नव्या समांतर पाणी पुरवठा योजनेच्या कामांची पाहणी करण्यासाठी लवकरच येणार असून जी जी वचने औरंगाबादसाठी दिली ती पूर्ण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

****

राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेले नवे १३ रुग्ण आढळले. हे सर्व रुग्ण पुणे जिल्ह्यातले आहेत. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या दोन हजार ८५८ एवढी झाली असून, यापैकी एक हजार ५३४ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ३३ हजार ९१४ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७५ लाख ६९ हजार ४२५ झाली आहे. काल ८६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४२ हजार २३७ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के झाला आहे. काल ३० हजार ५०० रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७१ लाख २० हजार ४३६ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९४ पूर्णांक शून्य सात दशांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या तीन लाख दोन हजार ९२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल तीन हजार १६१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या दोन तर नांदेड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ३८ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातले ७४८, तर ग्रामीण भागातले २९० रुग्ण आहेत. लातूर जिल्ह्यात ४७५, नांदेड ४५४, जालना ३०६, परभणी २९०, उस्मानाबाद २११, बीड २३७, तर हिंगोली जिल्ह्यात १५० रुग्णांची नव्यानं नोंद झाली. 

****

राज्यातल्या महाविद्यालयांचे नियमित वर्ग एक फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. कोविड प्रादुर्भावाची स्थानिक परिस्थिती पाहून महाविद्यालयं सुरू करण्यासंदर्भातले अधिकार विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

****

मराठी पत्रकार परिषदेच्या अंबाजोगाई शाखेचे दर्पण दिन तसंच मूकनायक दिनानिमित्त दिले जाणारे पुरस्कार काल जाहीर झाले. नंदकुमार पांचाळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार आष्टीचे पत्रकार सचिन पवार यांना जाहीर झाला आहे. तर मौलाना मुश्ताक हुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कार, साठी परळी वैजनाथ इथले पत्रकार प्रवीण फुटके यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण येत्या रविवारी ३० जानेवारीला होणार आहे.

****

प्रजासत्ताक दिनानिमित्तानं उस्मानाबाद जिल्ह्यात आज होत असलेल्या ऑनलाईन ग्रामसभांना ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं आहे.

****

जिल्हा नियोजन समितीमाध्यमातून प्राप्त निधी अधिक क्षमतेने खर्च करावा, आणि आवश्यकतेनुसार स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार विहित वेळेत निधी खर्च करावा, असे निर्देश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. कोविड काळातील प्रलंबित देयकं, वडवणी क्रीडा संकुलास जागेची उपलब्धता, तसंच गौण खनिज निधी वाटपाबाबत काल झालेला बैठकीत आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.

****

वर्धा जिल्ह्यात काल चारचाकी वाहनाचा भीषण अपघात होऊन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार याचाही समावेश आहे.

****

No comments: