Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 February
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२७ फेब्रुवारी २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या
सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड
प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन
साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ
ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५
या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी
संपर्क करू शकता.
****
· युक्रेनमध्ये असलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला सुरक्षितपणे परत आणण्यासाठी तत्पर
असल्याची केंद्र सरकारची ग्वाही
· ४६९ जणांना घेऊन दोन विमानं मुंबई तसंच दिल्लीत दाखल; तिसरं विमान आज पोहोचणार
· मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांचं बेमुदत उपोषण
सुरु
· मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन
· देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण अभियान
· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
· अन्नातून विषबाधा झाल्यानं, अंबाजोगाई तालुक्यात तीन बालकासह
मातेचा मृत्यू
**आणि**
· श्रीलंकेविरुद्ध दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना जिंकत भारताची मालिकेत विजयी आघाडी
****
युक्रेनमध्ये असलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला सुरक्षितपणे परत आणण्यासाठी तत्पर
असल्याची ग्वाही केंद्र सरकारनं दिली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी एकूण
४६९ जणांना रोमानियाची राजधानी बुखारेस्ट इथून घेऊन निघालेली दोन विमानं काल अनुक्रमे
मुंबई तसंच दिल्लीत दाखल झाली, दिल्लीत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य
शिंदे यांनी तर मुंबईत उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी या सर्वांचं स्वागत
केलं.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोयल यांनी, प्रत्येक भारतीयला परत आणण्यावर पंतप्रधान
नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर जातीनं लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं.
ते म्हणाले...
हमारे
लिये तो इतनी संतुष्टी है की यह बॅच अब पहुचा है । और अब यह लगातार निरंतर प्रयास रहेगा की, जल्द से
जल्द सबको लौटाया जाए । जब तक सब के सब वापस नही आ जाते । पुरी केंद्र सरकार तत्पर
रहेगी । प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी स्वयंम इस पुरे कार्यक्रम को मॉनिटर कर रहे है
। उसपे नियंत्रण रखे हुए है । परराष्ट्रमंत्री डॉ जयशंकर दिनरात उनके अधिकारीयों के
साथ संपर्क बनाये हुए है । विदेश के मंत्रीयों के साथ संपर्क बनाये हुये है । हम प्रतिबद्ध
है कि भारत का हर नागरिक सुरक्षित भारत वापस लौटे ।
हंगेरी इथून २४० जणांना घेऊन निघालेलं तिसरं
विमान आज भारतात पोहोचेल.
दरम्यान, युक्रेन आणि रशियात अडकून
पडलेल्या भारतीयांमध्ये नांदेड जिल्ह्याचे ३० विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांशी
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे प्रत्यक्ष
संवाद साधून धीर दिला.
युक्रेनमध्ये अकडलेल्या जालना जिल्ह्यातल्या
सात तरुणांपैकी नागेश साळवे हा वैद्यकीय शिक्षण घेत असलेला तरुण काल जाफराबाद तालुक्यातल्या
टेंभुर्णी या आपल्या मूळगावी परतला. औरंगाबाद विमानतळावर कुटुंबियांनी त्याचं स्वागत
केलं. जिल्ह्यातले अन्य सहाजण अद्यापही युक्रेनमध्येच असून, त्यांच्या कुटुंबियांनी
याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती दिली आहे. सहापैकी चारजण टेंभुर्णी इथले असल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती
यांनी मुंबईत आझाद मैदानावर कालपासून बेमुदत उपोषण सुरु केलं. उपोषणाला बसण्यापूर्वी
त्यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. आपल्याला संपूर्ण राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत
असल्याचं ते म्हणाले.
मराठा आरक्षण
मिळण्यासाठी न्यायमूर्ती भोसले समितीनं केलेल्या शिफारशींची तत्काळ अंमलबजाणी करून, लवकरात लवकर आरक्षण प्रक्रिया
सुरू करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी
केली. राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन पूर्ण केलं नसल्याचा
आरोप त्यांनी केला.
दरम्यान, या उपोषणाला पाठिंबा दर्शवत कोल्हापूर इथं दसरा चौकात मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषण
सुरु करण्यात आलं आहे.
धुळे शहरातही जिल्हा मराठा क्रांती मोर्चासह मराठा
समाजाच्या विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.
जालना शहरात गांधीचमन चौकात मराठा महासंघाच्यावतीनं
लाक्षणिक उपोषण करण्यात आलं.
तर आमदार राणाजगजीतसिंह पाटील आज तुळजापूर इथं लाक्षणिक उपोषण करणार
आहे.
****
राज्य सरकारने
२ हजार ८८ शिक्षक पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री
उदय सामंत यांनी ही माहिती दिली. ते काल जळगाव इथं कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र
विद्यापीठात झालेल्या बैठकीत बोलत होते.
****
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त
प्रसिद्ध साहित्यिक वि वा शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती; मराठी भाषा गौरव दिन आज साजरा
होत आहे. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी कार्यरत
असणाऱ्या मान्यवरांचा गौरव आणि त्यांना पुरस्कार प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात
आलं आहे.
संस्कृती, कला, इतिहास अशा
विविध विषयांवरील वैविध्यपूर्ण, आणि दुर्मिळ अश्या ५३ पुस्तकांचे लोकार्पण आज मराठी भाषा गौरवदिनी करण्यात येणार आहे. राज्य
साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील यांनी ही माहिती दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा आणि वाङ्गमय विभागाच्या
वतीनं मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला गझल संध्या कार्यक्रम घेण्यात आला. तर
आज ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक सुधीर रसाळ यांच्या विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात
आलं आहे. एमजीएम विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण
केंद्राच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाच्या वतीनं काल निमंत्रितांचं कवीं संमेलन घेण्यात
आलं
राज्यपाल भगतसिंह कोशारी आज औरंगाबाद दौऱ्यावर येणार असून शहरातल्या तापडिया नाट्य
मंदिर इथं आयोजित श्री समर्थ साहित्य परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. स्वातंत्र्याचं
अमृत महोत्सवी वर्ष तसंच मराठी राजभाषा दिनानिमित्त या परिषदेचं आयोजन करण्यात आलं
आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ८९३
रुग्ण आढळले. त्यामुळे
राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ६४ हजार ५१६ झाली आहे. काल आठ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात
या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४३ हजार ६९५ झाली
असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश
टक्के आहे. काल एक हजार ७६१ रुग्ण
बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख नऊ हजार १५ रुग्ण
कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक
शून्य दोन शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या सात हजार ८११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात काल १० रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद सहा, तर नांदेड जिल्ह्यात दोन नव्या रुग्णांची नोंद झाली.
****
पल्स पोलिओ लसीकरण
मोहिम आज देशभर राबवण्यात येत आहे.
शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या बालकांना पोलिओ लस दिली जाणार आहे. केंद्रीय आरोग्य
मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते काल एका बालकाला पोलिओ डोस देऊन या मोहिमेचा शुभारंभ
करण्यात आला. ही मोहीम येत्या २ मार्चपर्यंत राबवली जाणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात दोन लाख
६७ हजार बालकांना पोलिओचा डोस देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. यासाठी २ हजार ८३ केंद्र
उभारण्यात आले आहेत. तर, सोमवारपासून घरोघरी जाऊन पोलिओचा डोस देण्यात येणार आहे.
औरंगाबाद महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी सर्व पालकांना आपल्या
बालकांना पोलिओ डोस देण्याचं आवाहन केलं आहे.
मि सर्व ननागरिकांना आवाहन करतो की ० ते ५ वर्ष
वायुगटांतील आपल्या बालकांना पोलिओच्या डोस
जरी अगोदर डोस घेतलेलिया
असेल बालक जरी आजारी असेल तरी
पोलिओच्या डोस आपल्याला पाजायचा आहे
परभणी जिल्ह्यात पल्स पोलिओ
लसीकरण मोहिमेंतर्गत ५ वर्षांपर्यंतच्या २ लाख ११ हजार ९३३ बालकांना पोलिओ डोस देण्यात
येतील. यासाठी १ हजार ५५३ बुथ तयार करण्यात आल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राहुल गिते यांनी
दिली.
बीड जिल्ह्यात दोन लाख १८ हजार १७३ बालकांना
डोस देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. यासाठी दोन हजार ३७३ बूथ उभारण्यात आले आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणी वरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८६ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व
वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
औरंगाबाद शहरात घरगुती तसंच व्यावसायिक वापरासाठी नैसर्गिक वायू वाहिनी कामाचा
शुभारंभ येत्या दोन मार्चला होणार आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
मंत्री हरदिपसिंग पुरी यांच्या हस्ते या वायू वाहिनीच्या कामाचा शुभारंभ होणार आहे.
शहरातल्या दोन लाख घरापर्यंत हा गॅस पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे. गंगापूर आणि वाळूज
औद्योगिक क्षेत्रालाही या वाहिनीद्वारे गॅस पुरवठा करण्यात येणार असून भविष्यात जालना
आणि परभणीलाही या वाहिनीद्वारे पुरवठा होणार असल्याचं डॉ. कराड यांनी यावेळी सांगितलं.
****
प्रसिद्ध भूलतज्ज्ञ आणि साहित्यिक डॉ सुहास जेवळीकर यांचं काल रात्री औरंगाबाद
इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं, ते ६४ वर्षांचे होते. औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातील भूलतज्ज्ञ विभाग प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या
पार्थिव देहावर आज सकाळी साडे दहा वाजता औरंगाबाद इथं मध्यवर्ती जकातनाका परिसरातल्या
स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
कोणताही सामाजिक उपक्रम हा कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता तो चळवळ म्हणून अंगिकारला
पाहिजे, असं आमदार डॉ.राहुल पाटील यांनी म्हटलं आहे. डॉ पाटील यांच्या संकल्पनेतून
काल परभणी इथं राज्यस्तरीय दिव्यांग वधूवर मेळावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
या मेळाव्यात राज्यभरातून ७२३ दिव्यांग तरुण तरुणी सहभागी झाले, तर १६ जणांचे विवाह
ठरले. या मेळाव्याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर...
दिव्यागांना
सहजीवनाचा आनंद मिळावा यासाठी दिव्यांग राज्यस्तरीय सर्वधर्मीय वधुवर परिचय मेळावा
घेण्याचे कसब साध्य आहे. संयोजक तथा आमदार डॉ राहूल पाटील यांनी अंधकारमय जीवन जगणाऱ्या
दिव्यांगाच्या जीवनात आनंदाचा क्षण यावा त्यांना सामाजिक स्तरावर सन्मान मिळतानाच आत्मविश्वास
वाढीस लागावा यासाठी परिचय मेळावा निश्चितच लाभदायक ठरणार असल्याच्या भावना अनेकांना
साश्रू नयनांनी व्यक्त केल्या. आकाशवाणी बातम्यासाठी परभणीवरुन विनोद कापसीकर
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातल्या
बागझरी इथं तीन बालकासह त्यांच्या आईला जेवणातून विषबाधा होऊन चारही जणांचा मृत्यू
झाला. भाग्यश्री धारासुरे असं या महिलेचं नाव असून, दोन बालकं अनुक्रमे सहा आणि चार
वर्षांची तर तिसरं बाळ आठ महिन्यांचं आहे. काल सकाळी ही घटना निदर्शनास आली.
****
धर्मशाला इथं काल झालेल्या दुसऱ्या
टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या
मालिकेत दोन-शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेनं निर्धारित
षटकात ५ बाद १८३ धावा केल्या, भारतीय संघानं तीन गडी गमावत, अठराव्या षटकांत हे लक्ष्य
साध्य केलं. नाबाद ७४ धावा करणारा श्रेयस अय्यर सामनावीर ठरला.
या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा
सामनाही आज धर्मशाला इथंच होणार आहे. टी-ट्वेंटी मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये दोन
कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. पहिला कसोटी सामना ४ मार्चपासून मोहालीत, तर दुसरा
सामना बेंगळुरूमध्ये होणार आहे.
****
No comments:
Post a Comment