Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 February 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ फेब्रुवारी २०२२ दुपारी १.०० वा.
****
पायाभूत
सुविधांची परिणामकारकता वाढवण्यासाठी पीएम गतीशक्ती योजना महत्वाची असल्याचं, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पीएम गतिशक्तीचा दृष्टीकोन आणि यंदाच्या अर्थसंकल्पात
त्याविषयीचा समन्वय' याविषयी एका वेबिनारमध्ये ते आज बोलत होते. आधुनिक पायाभूत सुविधांच्या
निर्मितीमुळे भारताची अर्थव्यवस्था मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त
केला. गतिशक्ती योजना कार्यान्वित झाल्यानंतर संपूर्ण माहितीसह नियोजन करणं शक्य होणार
आहे. केंद्र आणि राज्यांमधल्या समन्वयाच्या अभावामुळे देशाचं मोठं नुकसान झाल्याचं
पंतप्रधान यावेळी म्हणाले. यंदाच्या अर्थसंकल्पानं २१ व्या शतकातल्या भारताच्या विकासाची
गती निश्चित केली असून, सरकार खूप मोठं ध्येय घेऊन पुढे जात असल्याचं ते म्हणाले. केंद्राने
राज्यांच्या मदतीसाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दुर्गम भागात रस्ते संपर्क
वाढवण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम राबवला जात असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
****
युक्रेनमधल्या
परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री हरदीप सिह पुरी, ज्योतिरादित्य शिंदे,
किरेन रिजिजू आणि व्ही के सिंह युक्रेसमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी युक्रेनच्या
शेजारी राष्ट्रांचा दौरा करणार आहेत. यासंदर्भात आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी, सरकार भारतीयांना परत आणण्यासाठी सर्वप्रकारे मदत करणार असल्याचं
सांगितलं.
****
युक्रेनमध्ये
अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं ऍट ऑप गंगा हे
विशेष ट्विटर हँडल सुरू केलं आहे. नागरिकांना आपल्या सर्व अडचणी यावर पाठवता येतील
अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एका ट्वीट संदेशात
दिली आहे.
****
राष्ट्रीय
विज्ञान दिन आज साजरा होत आहे. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी, रामन
परिणामांचा शोध लावल्याच्या स्मरणार्थ, २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन
म्हणून साजरा केला जातो. शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातला एकात्मिक
दृष्टिकोन ही यावर्षीच्या विज्ञान दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. यानिमित्तानं विविध
कार्यक्रम आज देशभरात आयोजित केले जात आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत
२२ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या विज्ञान सर्वत्र पूज्यते या साप्ताहिक कार्यक्रमाची
सांगताही आज होणार आहे.
****
मराठा आरक्षणाच्या
मागणीसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा
दिवस आहे. संभाजीराजे यांची आज वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, रक्तदाब आणि शरीरातील
साखरेचं प्रमाण कमी झालं असून, अशक्तपणा आणि तीव्र डोकेदुखी ही लक्षणे जाणवत आहेत.
यावर कोणत्याही प्रकारची औषधे घेण्यास संभाजीराजेंनी नकार दिला आहे.
आरक्षणाचा
हा दीर्घकालीन लढा आहे, त्यामुळे ज्या २२ मागण्यांपैकी
सहा मागण्या कमीत कमी मार्गी लागाव्यात, या मागण्यांना न्यायालयाचे निर्बंध आहेत असं
काही नाही, असं खासदार संभाजीराजे आज वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.
दरम्यान,
खासदार संभाजीराजे यांच्यावतीने जाणाऱ्या शिष्टमंडळासोबत मराठा आरक्षण उपसमितीची मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षेखाली आज बैठक होत आहे.
****
इतर मागासवर्ग
- ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली असून, परवा बुधवारी ही
सुनावणी होणार आहे. निवडणुकीशी संबंधित दोन प्रकरणांवर एकाच वेळी सुनावणी करणार असल्याचं
न्यायालयानं सांगितलं. मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम अहवालानुसार आरक्षण लागू करण्याची
परवानगी राज्य सरकारने मागितली आहे.
****
वीज दर कमी
करा आणि वीज जोडणी तोडण्याची मोहीम थांबवण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं
सूरु केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज इथल्या
एम एस ए बी चं कार्यालय काल पेटवण्यात आलं. पहाटे अग्निशमन विभागाला आग आटोक्यात आणण्यात
यश आलं. उर्जा मंत्र्यांनी वेळीच दखल घेतली नाही तर सांगली जिल्ह्यात आणखीन तीव्र आंदोलन
करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. दिवसा दहा तास वीज देणं, वाढी वीज दर रद्द करणं,
आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे आंदोलन सुरु केलं आहे.
****
यवतमाळच्या
राळेगाव तालुक्यात रावेरी इथं आठवं अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन काल पार
पडलं. शेतीविषयाच्या सखोल अभ्यासक आणि स्तंभलेखिका प्रज्ञा बापट संमेलनाच्या अध्यक्षस्थानी
होत्या. उद्योजिका मधुरा गडकरी यांचे हस्ते संमेलनाचं उदघाटन झालं. सामान्य माणसाची
शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, शेती व्यवसायाला भेडसावणाऱ्या दाहक
समस्यांची जाणीव मराठी साहित्यविश्वाला करून देण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आलं
होतं.
****
No comments:
Post a Comment