Monday, 28 February 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.02.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२८ फेब्रुवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रीय विज्ञान दिन आज साजरा होत आहे. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी रामन परिणामांचा शोध लावल्याच्या स्मरणार्थ २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. रामन परिणामांच्या शोधाबद्दल रामन यांना नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मानवी जीवनात विज्ञानाचं महत्त्व आणि त्याचा वापर याचा प्रसार करण्याचा या दिवसाचा उद्देश असतो. शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातला एकात्मिक दृष्टिकोन ही यावर्षीच्या विज्ञान दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. यानिमित्तानं विविध कार्यक्रम आज देशभरात आयोजित केले जात आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत २२ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या विज्ञान सर्वत्र पूज्यते या साप्ताहिक कार्यक्रमाची सांगताही आज होणार आहे. या निमित्ताने यावर्षीच्या विज्ञान संज्ञापन पुरस्कारांचं वितरण आणि विविध स्पर्धांमधल्या विजेत्यांचा गौरव दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात केला जाणार आहे.

****

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपलं सामूहिक वैज्ञानिक दायित्व पूर्ण करण्यासाठी आणि विज्ञानाच्या शक्तीचा वापर मानवी विकासासाठी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवं असं त्यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे.

****


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. आरक्षणाचा हा दीर्घकालीन लढा आहे,  त्यामुळे ज्या २२ मागण्यांपैकी सहा मागण्या कमीत कमी मार्गी लागाव्यात, या मागण्यांना न्यायालयाचे निर्बंध आहेत असं काही नाही, असं खासदार संभाजीराजे आज वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.

दरम्यान, खासदार संभाजीराजे यांच्यावतीने जाणाऱ्या शिष्टमंडळासोबत मराठा आरक्षण उपसमितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षेखाली आज बैठक होणार आहे.

****

मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली. सहा जिल्ह्यांमधल्या ३८ जागांसाठी मतदान होत आहे.

****

No comments: