Wednesday, 23 February 2022

Text : आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.02.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ फेब्रुवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात नऊ जिल्ह्यांमधल्या ५९ जागांचा समावेश आहे. या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी ६२४ उमेदवार रिंगणात आहेत.

****

अन्नधान्याची देशातंर्गत उपलब्ध वाढवण्यासाठी आणि त्यांचे दर स्थिर राखण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक उपाययोजना केल्या, त्यामुळे तूरडाळीच्या दरात मोठी घट दिसून येत आहे, असं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. अधिकृत आकडेवारीनुसार काल तूरडाळीचा सरासरी घाऊक दर नऊ हजार ५२९ रुपये प्रति क्विंटल होता.

****

राज्यात पोलीस पाटलांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याबरोबरच पोलीस पाटलांचं मानधन वेळेत अदा करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. पोलीस पाटील यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पोलीस पाटलांचं नूतनीकरण करण्यासंदर्भात सर्व बाबींचा अभ्यास करून धोरणत्मक निर्णय घेण्यात यावा. तसंच महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील आदेशात योग्य त्या सुधारणा करण्यात येतील, असं गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

औरंगाबाद शहराजवळच्या तीसगाव इथली ८६ हेक्टर शासकीय जमीन, प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरे या योजनेसाठी प्रदान करण्यास राज्य शासनानं मंजूरी दिली आहे. याबाबतचं पत्र जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसंच महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना पुढील कार्यवाहीसाठी देण्यात आलं आहे. जमीनीचा ताबा मिळाल्यापासून तीन वर्षांच्या आत या जागेचा वापर प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरे या योजनेसाठी करणं, बंधनकारक असल्याचं, या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

****

मराठवाड्यात काल ४७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. तर औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात काल १९ नवे रुग्ण आढळले. लातूर नऊ, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी सहा, परभणी तीन, तर जालना आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही. 

****

No comments: