Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 February 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ फेब्रुवारी २०२२ दुपारी १.०० वा.
****
एक
भारत एक आरोग्य या भावनेनं मोठ्या शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही आरोग्य पायाभूत सुविधा
निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी असलेल्या तरतुदींविषयी आयोजित वेबिनारमध्ये
ते आज बोलत होते. हा अर्थसंकल्प गेल्या सात वर्षांत आरोग्य सेवा प्रणालीमध्ये सुधारणा
आणि परिवर्तन करण्याच्या प्रयत्नांचा विस्तार करतो, असं ते म्हणाले. खेड्यांमध्ये अत्यावश्यक
आरोग्य सुविधा पोहोचवण्यावर त्यांनी भर दिला. आधुनिक वैद्यकीय विज्ञान पायाभूत सुविधांचा
विस्तार आणि मानवी संसाधनं, वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन एकत्रित करणं, आणि उत्तम आणि
परवडणाऱ्या आरोग्यसेवेसाठी आधुनिक आणि भविष्यकालीन तंत्रज्ञान विकसित करणं, या आरोग्य
क्षेत्रातल्या तीन प्रमुख स्तंभांवर केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ मध्ये लक्ष केंद्रीत
केलं असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. देशातल्या आरोग्य सेवा क्षेत्राला वैद्यकीय
उपकरणं आणि औषधं तयार करण्यात आत्मनिर्भर होणं, यावर भर देण्याची गरज पंतप्रधानांनी
व्यक्त केली.
****
युक्रेनमधल्या
भारतीयांना सोडवण्यासाठी गेलेलं एअर इंडियाचं विमान रोमानियामार्गे आज दुपारी चार वाजता
भारतीय विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीला घेऊन, मुंबईत येणार आहे. केंद्रीय मंत्री
पीयूष गोयल छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर या प्रवाशांचं स्वागत करण्यासाठी
उपस्थित राहणार आहेत. भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून,
परराष्ट्र मंत्रालयाचं शिबीर कार्यालय पश्चिम युक्रेनमधील एलव्हिव्ह आणि चेरनिव्हत्सी
शहरांमध्ये कार्यरत झाले आहेत. युक्रेनमधल्या भारतीयांच्या सुटकेसाठीचा सर्व खर्च सरकार
करणार असल्याचंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.
****
पल्स
पोलिओ लसीकरण मोहिम उद्या देशभर राबवण्यात येणार आहे. शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या
बालकांना पोलिओ लस दिली जाणार आहे. या मोहिमेचा देशव्यापी शुभारंभ आज केंद्रीय आरोग्य
मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते एका बालकाला लस देऊन करण्यात आला.
****
मराठा
आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन राज्य सरकारनं पूर्ण केलं नाही, असं खासदार
संभाजी राजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार
संभाजीराजे यांनी आज मुंबईत आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. त्याआधी ते वार्ताहरांशी
बोलत होते. आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला ४०० कोटी रुपये निधीची घोषणा केली,
मात्र, थोडेच पैसे आले. जेवढा आरक्षणाचा विषय महत्वाचा आहे, तेवढाच सारथीचा विषय महत्त्वाचा
आहे. यात अनेक ठिकाणी केंद्र सुरु केली. मात्र, तिथल्या अडचणी सोडवल्या नाहीत, असंही
त्यांनी नमूद केलं. उपोषणाला बसण्यापूर्वी त्यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं.
आझाद मैदानात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे.
****
वातावरणीय
बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं गेल्या वर्षी जाहीर केलेल्या सुधारित इलेक्ट्रिक
वाहन धोरणाच्या अंमलबजावणीची, निती आयोगानं दखल घेतली आहे. आयोगाचे उपाध्यक्ष राजीव
कुमार यांनी याबाबत राज्य शासनाची, तसंच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नांची,
ट्विटरच्या माध्यमातून प्रशंसा केली आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ
कांत यांनी देखील, यापूर्वी १४ सप्टेंबर २०२१ रोजी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत
मुंबईत झालेल्या बैठकीत राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाचं कौतुक केलं होतं. महाराष्ट्रानं
भविष्याचा वेध घेऊन इलेक्ट्रिक वाहन धोरण आणलं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
****
कोरोना
प्रादुर्भावातून अर्थव्यवस्थेने उभारी घेण्यासाठी मूलभूत सेवा सुविधांची पुनर्बांधणी,
शिक्षण आणि आरोग्य सुविधा तसंच डिजिटल साक्षरता या तीन गोष्टी महत्त्वाच्या असल्याचं,
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. पुणे आंतरराष्ट्रीय केंद्रातर्फे
आयोजित आशिया आर्थिक संवाद २०२२ परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात त्या काल दूरदृश्य
प्रणालीद्वारे बोलत होत्या. अर्थ व्यवस्थेच्या उभारणीसाठी उत्पादन क्षमता, संशोधन विकास
यांना प्राधान्य देणं आवश्यक असल्याचं सीतारामन यावेळी म्हणाल्या.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणी वरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहे. या मालिकेचा ८६ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
भारत
आणि श्रीलंका संघादरम्यान तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना
आज धरमशाला इथं खेळवला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. तीन
सामन्यांच्या मालिकेत भारत एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
No comments:
Post a Comment