Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 February 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ फेब्रुवारी २०२२ दुपारी १.०० वा.
****
देशाच्या
संरक्षण उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्षमता असून, या क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यासाठी
सरकार महत्वाचे निर्णय घेत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ‘संरक्षणात
आत्मनिर्भरता - कृतीसाठी आवाहन’, या वेबिनारमध्ये ते आज बोलत होते. संरक्षण क्षेत्रात
केंद्र सरकारनं सुरु केलेल्या विविध योजना आणि प्रकल्पांमध्ये या क्षेत्रातल्या कंपन्यांनी
पुढाकार घ्यावा, हा या वेबिनारचा उद्देश आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी
असलेल्या एकूण निधीपैकी ७० टक्के निधी देशांतर्गत उद्योगांसाठी देण्यात आला असल्याचं
पंतप्रधान म्हणाले. संरक्षण मंत्रालयातर्फे केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी
हे वेबिनार आयोजित करण्यात आलं होतं.
****
राष्ट्रीय
युद्ध स्मारकाचा तिसरा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. यानिमित्तानं नौदल प्रमुख अॅडमिरल
आर. हरी कुमार आणि वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर.चौधरी यांनी आज राष्ट्रीय
युद्ध स्मारकावर आदरांजली वाहिली. यादरम्यान संरक्षण सचिव अजय कुमार यांनीही राष्ट्रीय
युद्ध स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली. स्वातंत्र्यानंतरच्या शूर सैनिकांच्या बलिदानाची
साक्ष म्हणून राष्ट्रीय युद्ध स्मारक २५ फेब्रुवारी २०१९ ला देशाला समर्पित करण्यात
आलं होतं.
****
राष्ट्रीय
शेअर बाजारातील अनियमिततेच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं, नॅशनल
स्टॉक एक्सचेंजच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण यांचे माजी ग्रुप ऑपरेटिंग
ऑफिसर आणि सल्लागार, आनंद सुब्रमण्यम यांना अटक केली आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनियामक
मंडळ - सेबीच्या अहवालानुसार, एन एस ई मध्ये आनंद सुब्रमण्यम यांची नियुक्ती, एका अध्यात्मिक
गुरुच्या सांगण्यावरुन झाली होती. सुब्रमण्यम यांना शेअर बाजाराचा कुठलाही अनुभव नसताना,
त्यांचा वार्षिक पगार १५ लाखांवरुन सुमारे साडेचार कोटी करण्यात आला होता. एक्सचेंजचा
आर्थिक डेटा अज्ञात त्रयस्थ व्यक्तीला लीक केल्याचा सुब्रम्हण्यम यांच्यावर आरोप आहे.
****
मुंबई
महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या माझगाव इथल्या घरावर
आयकर विभागानं छापा टाकला आहे. जाधव यांच्या पत्नीचीही या विभागामार्फत चौकशी होणार
आहे. कोलकत्त्याच्या कंपनीमार्फत आर्थिक गैरव्यवहार करून १५ कोटी रुपये रुपये दुबईत
गुंतवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. जाधव यांच्या माझगाव इथल्या घराच्या परिसरात पोलीस
बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उत्पन्नाची माहिती लपवून कर चुकवल्याचा आरोप त्यांच्यावर
ठेवण्यात आला आहे.
****
देशात
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १७६ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३२
लाख चार हजार ४२६ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १७६ कोटी ८६
लाख ८९ हजार २६६ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या १३ हजार १६६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ३०२ रुग्णांचा
मृत्यू झाला, तर २६ हजार ९८८ रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख ३४ हजार २३५ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
बीड
इथल्या निबंधक कार्यालयात आज सकाळी जमीन खरेदी-विक्रीच्या कारणावरून दोन गटात वाद होऊन
गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला. फारूख सिद्दीकी असं जखमीचं
नाव असून, बीड इथल्या जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस अधीक्षक
राजा रामास्वामी यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली असून, या प्रकरणी अद्याप कोणासही
अटक झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उत्तम
प्रश्न विचारणारा, उत्तराचा शोध घेणारा, निरीक्षण आणि चिकित्सा करणारा खरा शास्त्रज्ञ
असतो, या निकषावर लहान मुलं हे सर्वोत्तम शास्त्रज्ञ असतात, असं मत, पुणे विद्यापीठातील
सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे वरिष्ठ संशोधक, डॉ. आर. एल. देवपूरकर यांनी व्यक्त केलं
आहे. ते औरंगाबादच्या विवेकानंद महाविद्यालयात, विज्ञान सप्ताहानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत
बोलत होते. शास्त्रात आवड असणं, त्याची उत्सुकता असणं ही आजच्या काळाची नितांत आवश्यकता
असल्याचंही ते म्हणाले.
****
गोंदियामधून
प्रवासी विमान वाहतूक सेवेला येत्या तेरा मार्च पासून आरंभ होत आहे. बिर्शी विमानतळावरून
सुरु होणाऱ्या या विमान वाहतूक सेवेचं उद्घाटन, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य
शिंदे, दूरदृश्य प्रणालीद्वारे करतील, अशी माहिती भंडारा गोंदियाचे खासदार सुनील मेंढे
यांनी दिली. केंद्र सरकरच्या ‘उडान’ योजनेंतर्गत ही हवाई सेवा सुरू होत आहे.
****
भारत
आणि श्रीलंका संघादरम्यान तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना
उद्या लखनौ इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. तीन
सामन्यांच्या मालिकेत भारत एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
No comments:
Post a Comment