Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 February 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ फेब्रुवारी २०२२ दुपारी १.०० वा.
****
रशियाचे
राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केल्यानंतर
रशिया - युक्रेन युद्ध सुरु झालं आहे. युक्रेनच्या लष्करानं शस्त्र खाली ठेवावी, असा
इशाराही पुतीन यांनी दिला आहे.
दरम्यान,
रशियाच्या या हल्ल्याचा अमेरिकेसह जगभरातल्या अनेक देशांनी निषेध नोंदवला आहे. संयुक्त
राष्ट्रांच्या बैठकीत अनेक देशांनी रशियानं पुकारलेल्या युद्धाविरोधात आवाज उठवला असून,
युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे.
युक्रेनमधल्या
वेगानं बदलणाऱ्या परिस्थितीवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारतीयांची, विशेषतः विद्यार्थ्यांची
सुरक्षा आणि सुरक्षेवर लक्ष केंद्रित केलं जात असून, परराष्ट्र मंत्रालयाचा नियंत्रण
कक्ष पूर्ण क्षमतेनं सुरु करण्यात आला असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
कृत्रिम
बुद्धिमत्ता आणि ड्रोन सारख्या तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रात लक्षणीय परिवर्तन
घडवेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. स्मार्ट कृषी या
कृषी संबंधित वेबिनारमध्ये ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. २०२२
- २३ या वर्षाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी असलेल्या तरतुदींविषयी त्यांनी माहिती
दिली. कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या विकासासाठी अॅग्री स्टार्टअप्सना प्रोत्साहन
देण्याचं त्यांनी यावेळी आवाहन केलं. गेल्या सहा वर्षात कृषी अर्थसंकल्पात अनेक पट
वाढ करण्यात आली असून, गेल्या सात वर्षात कृषी कर्जात अडीचपट वाढ झालीअसल्याचं पंतप्रधानांनी
नमूद केलं.
****
अल्पसंख्याक
विकास मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीनं मुंबईत
मंत्रालयात महात्मा गांधी स्मारक परिसरात निदर्शनं करण्यात येत आहेत. राज्य मंत्रिमंडळातले
मंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, राजेश टोपे, जयंत पाटील, सुभाष देसाई
खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह इतर मंत्री यावेळी उपस्थित आहेत. मलिक यांच्या मंत्रिपदाचा
राजीनामा घेणार नसल्याचंही महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं आहे.
सोलापुरात
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात
निदर्शनं करण्यात आली. आंदोलनानंतर पोलिसांनी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं.
दरम्यान,
मलिक यांनी राजीनामा देण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनंही आज आंदोलन
करण्यात येत आहे.
औरंगाबाद
इथं भाजपच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. दाऊद इब्राहिम,
छोटा शकील, हसीना पारकर यांच्याशी मलिक कुटुंबीयांचे कथित संबंध, आणि एकूण चार मालमत्तांसंदर्भात
सक्तवसुली संचालनालय - ईडीनं मलिक यांना काल अटक केली असून, त्यांना आठ दिवसांची ईडी
कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
देशात
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १७६ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३०
लाख ४९ हजार ९८८ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १७६ कोटी ५२ लाख
३१ हजार ३८७ मात्रा देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एक कोटी ९५ लाख ६६ हजार ७२९ पात्र
नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे.
दरम्यान,
देशात काल नव्या १४ हजार १४८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ३०२ रुग्णांचा
मृत्यू झाला, तर ३० हजार नऊ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत चार कोटी २२ लाख १९ हजार
८९६ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, सध्या एक लाख ४८ हजार ३५९ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या रविवारी २७ फेब्रुवारीला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८६ वा भाग असेल.
****
परभणी
जिल्ह्यात गंगाखेड पोलिस ठाण्यातले कर्मचारी नवनाथ लोखंडे यांच्या विरोधात ८० हजार
रुपयांची लाच मागितल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गंगाखेड पोलिस ठाण्यात तक्रार
दाखल केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलिस उपअधीक्षक किरण बिडवे यांना तक्रारकर्त्यानं
१७ फेब्रुवारी ला एक तक्रार नोंदवून त्याचे जेसीबीवर गुन्हा दाखल न करण्याकरता तसंच
त्याच्या भावाला अटक न करण्याकरता पोलिस नाईक लोखंडे यानं एक लाख रुपयांची लाच मागितल्याचं
नमूद केलं. या आधारे पथकाने महातपूरी फाट्यावर सापळा रचला परंतू, संबंधित पोलिस कर्मचार्यास
संशय आल्यानं, त्याने लाचेची रक्कम स्विकारली नाही. त्यानंतर पडताळणी केली असता, लोखंडे
यानं तडजोडीतून ८० हजार रुपये स्विकारल्याचं कबूल केलं. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
****
भारत
आणि श्रीलंका संघादरम्यान तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना
आज लखनौ इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment