आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२५ फेब्रुवारी २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
युक्रेनवर
हल्ला केल्याबद्दल रशियाला अद्दल घडवण्याच्या हेतूनं अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन
यांनी काल रशियाविरोधात नवीन निर्बंध जारी केले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन
हे आक्रमक असून, त्यांच्या देशाला त्याचे परिणाम भोगावं लागतील, असा इशारा बायडेन यांनी
दिला. पूर्व आघाडीवर सैन्य आणि हवाई दलाची कुमक पाठवली जाणार असली तरी अमेरिकेचे सैन्य
प्रत्यक्ष लष्करी कारवाईत सहभाग घेणार नाही, असं बायडेन यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान,
रशिया आणि युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत काल चर्चा केली. सर्व भारतीयांना
सुरक्षितपणे मायदेशी आणण्यावर भारताचा भर असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
मुंबई
महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरावर आयकर
विभागानं छापा टाकला आहे. त्यांचे निकटवर्तीयांवर तसंच काही कंत्राटदारांवरही आयकर
विभागाच्या पथकानं छापे घातले आहेत. जाधव यांच्या पत्नीचीही या विभागामार्फत चौकशी
होणार आहे. कोलकत्त्याच्या कंपनीमार्फत आर्थिक गैरव्यवहार करून १५ कोटी रुपये रुपये
दुबईत गुंतवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. जाधव यांच्या माझगाव इथल्या घराच्या परिसरात
पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उत्पन्नाची माहिती लपवून कर चुकवल्याचा आरोप
त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
****
गडचिरोली
जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी लपवलेली स्फोटकं आणि शस्त्रास्त्रं पोलिसांनी जप्त केली आहेत.
विशेष अभियान पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून राबवण्यात येत असलेल्या, नक्षलविरोधी
अभियानादरम्यान, ही कारवाई करण्यात आली.
****
परभणी
शहरात महसूल विभागामार्फत नियमबाह्य पध्दतीनं अकृषीक कर वसुली होत असल्याचा आरोप प्रहार
जनशक्ती पक्षानं केला आहे. याची चौकशी करून तातडीनं कारवाईची मागणी पक्षाचे जिल्हा
प्रमुख शिवलिंग बोधने यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मालमत्ताधारकांना
वार्षिक अकृषीक कर किती आहे, किती कर थकलेला आहे आणि तो किती वर्षांपासूनचा आहे, याबाबत
कुठलीही योग्य सूचना न देता वसुली होत असल्याचं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment