Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 24 February 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ फेब्रुवारी २०२२ सायंकाळी
६.१०
****
कोरोना
विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. आम्ही सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि
१५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं
आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा,
दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि
मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क
करा.
****
·
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू
·
महाराष्ट्राच्या युक्रेनमधील नागरिकांना सुखरूप घेऊन येण्यासाठी
मुख्यमंत्र्यांच्या सूचना
·
शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जात गेल्या सात वर्षात अडीच
पटीनं वाढ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती
आणि
·
अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ
महाविकास आघाडीची निदर्शनं तर भारतीय जनता पक्षातर्फे मलिक यांच्या राजिनाम्याची मागणी
****
रशियानं
युक्रेनच्या पूर्वेकडील भागात आज लष्करी कारवाईला सुरुवात केल्यानंतर या दोन देशांमध्ये
युद्ध सुरू झालं आहे. युक्रेनच्या लष्करानं शस्त्र खाली ठेवावी, असा इशाराही पुतीन
यांनी दिला आहे. भारतीयांची, विशेषतः विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षेवर लक्ष केंद्रित
केलं जात असून, परराष्ट्र मंत्रालयाचा नियंत्रण कक्ष पूर्ण क्षमतेनं सुरु करण्यात आला
असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
युक्रेनमधील
युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांची काय
व्यवस्था आहे तसंच त्यांना परत महाराष्ट्रात सुखरूप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी
व्यवस्थित समन्वय साधावा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना केल्या
आहेत. महाराष्ट्रातून उद्योग, शिक्षण, व्यवसायनिमित्त तिथं गेलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत
मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. मुख्य सचिवांना केंद्र शासनाशी समन्वय साधून
या नागरिकांशी सातत्यानं संपर्कात राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. दरम्यान,
महाराष्ट्रातले बाराशे विद्यार्थी युक्रेनमध्ये असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री
डॉ.भागवत कराड यांनी प्रसार माध्यमांना बोलतांना दिली.
****
रशियानं
युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळं जगभरातल्या रोखे व्यवहारात हाहाकार उडाला. कच्च्या
तेलाचे दर मात्र तेजीत आहेत. देशातल्या रोखे व्यवहाराही मोठ्या प्रमाणावार कोसळला.
व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स अठराशे हून अधिक तर निफ्टी ५०० हून अधिक अंकांनी
कोसळला. नंतर व्यवहारादरम्यान थोडीफार सुधारणा दिसली. मात्र, दुपारनंतर बाजारात सुरू
असलेली घसरण मोठ्या प्रमाणात वाढत गेली.
****
किसान
सन्मान निधीच्या माध्यमातून आतापर्यंत अकरा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ७५ हजार कोटी
रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या दूरदृष्टीमुळे शेतकऱ्यांसाठी
दिल्या जाणाऱ्या कर्जात गेल्या सात वर्षात अडीच पटीनं वाढ झाली असल्याची माहिती पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते आज `किसान सन्मान` निधीच्या तीसऱ्या वर्धापनदिना निमित्त
`स्मार्ट शेती` या विषयावर दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमामध्ये
बोलत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात आधुनिक शेतीसाठी विशेष पावलं उचलली गेली आहेत. त्याचाच
एक भाग म्हणून गंगा नदीच्या किनाऱ्यावर पाच किलोमिटरच्या परिसरात शेती आणि फलोत्पादनावर
भर दिला जाणार आहे. त्या बरोबरंचं तेलबियांच्या आयातीवरचं अवलंबित्त्व कमी करण्यासाठी
विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
****
अल्पसंख्याक
विकास मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीनं मंत्री,
खासदार, आमदारांनी मुंबईत मंत्रालयातल्या महात्मा गांधी स्मारक परिसरात निदर्शनं केली.
औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड इथंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी
मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ निदर्शनं केली. दरम्यान, भारतीय जनता पक्षातर्फे मलिक
यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर तसंच खुल्ताबाद, सिल्लोड इथं, नांदेड, परभणी इथं निदर्शनं करण्यात आली.
बॉम्बहल्ले करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम
याचे नवाब मलिक हे हस्तक असून त्यांना सत्तेच्या लाचारीसाठी मंत्रीपदावर ठेवणं हा राज्याचा
अपमान असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार अतुल सावे यांनी केली
आहे. त्यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन मलिक यांना मंत्रिमंडळातून काढून
टाकण्याची मागणीही केली.
****
लता
मंगेशकर यांच्या कार्याचा यथोचित गौरव करणारं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक राज्य शासनातर्फे
उभारण्यासाठी मंगेशकर कुटुंबियांनी मार्गदर्शन करावं, अशी विनंती सांस्कृतिक कार्य
मंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. देशमुख यांनी मंगेशकर कुटुंबियांची मुंबईत घरी
जाऊन सांत्वना भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. लतादीदींच्या कार्याचा उचित सन्मान
करण्यासाठी उत्कृष्ट असं संगीत संग्रहालय शासनाला उभारता येईल, त्याबाबत देशमुख यांनी
मंगेशकर कुटुंबियांचा मानस जाणून घेतला. याबाबतच्या सूचना कुटुंबियांकडून शासनाला पत्राद्वारे
कळवण्यात येतील, असं हृदयनाथ मंगेशकर यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीची पहिली मात्रा घेणाऱ्यांची संख्या ८२ टक्के झाली
असून दुसरी मात्रा घेणाऱ्यांचं प्रमाण ५० टक्के झालं आहे. यामध्ये २८ लाख ४१ हजार ३५६
जणांनी लसीची पहिली मात्रा घेतली. तर १७ लाख ५२ हजार ५२१ जणांनी लसीची दुसरी मात्रा
घेतली आहे. वर्धक मात्रा घेणाऱ्यांची संख्या ३६ हजार ३६५ झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या कोवीड कक्षातर्फे देण्यात आली.
****
औरंगाबाद
शहरातल्या चिकलठाणा परिसरातल्या एका गावात आज होणारा बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे
रोखण्यात आला. अल्पवयीन मुलीच्या पालकांचं यावेळी समुपदेशन करण्यात आलं. चिकलठाणा पोलीस
ठाण्याचे कर्मचारी, बालविकास अधिकारी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच यांच्या
सतर्कतेमुळं हा बालविवाह टळला.
****
उत्तम
प्रश्न विचारणारा, उत्तराचा शोध घेणारा, निरिक्षण आणि चिकित्सा करणारा खरा शास्त्रज्ञ
असतो. या निकषावर लहान मूलं हे सर्वोत्तम शास्त्रज्ञ असतात, असं मत पुणे विद्यापीठातील
सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे वरिष्ठ संशोधक डॉ. आर. एल. देवपूरकर यांनी व्यक्त केलं
आहे. शहरातल्या विवेकानंद महाविद्यालयात होत असलेल्या विज्ञान सप्ताहात व्याख्यान देतांना
ते आज बोलत होते.
****
परभणी
शहरात महसूल विभागामार्फत नियमबाहय पध्दतीनं अकृषीक कर वसुली होत असल्याचा आरोप प्रहार
जनशक्ती पक्षानं केला आहे. याची चौकशी करून तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी
जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधनं यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
//************//
No comments:
Post a Comment