Sunday, 27 February 2022

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 February 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 February 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

आज `मन की बात` या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मराठी बंधू भगिनींना मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या मालिकेतला हा श्यहाऐंशीवा भाग होता. हा दिवस मराठी कविवर्य विष्णु वामन शिरवाडकर, कुसुमाग्रज यांना समर्पित आहे. आजच कुसुमाग्रज यांची जयंतीही आहे. कुसुमाग्रज यांनी मराठीमध्ये कविता केल्या, अनेक नाटकं लिहली आणि मराठी साहित्याला नवी उंची दिली, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. राष्ट्रीय शिक्षण धोरणात स्थानिक भाषेतूनं शिकण्यावर भर दिला गेला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमही स्थानिक भाषांमधून शिकवले जावेत, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं ते म्हणाले. उद्या राष्ट्रीय विज्ञान दिन, यानिमित्त मुलांमध्ये वैज्ञानिक वृत्ती विकसित करण्यासाठी लहान प्रयत्नांपासून सुरूवात करावी. मुलांमध्ये भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राबद्दल उत्सुकता निर्माण करावी, असं आवाहन पंतप्रधानांनी पालकांना केलं. सामाजिक संपर्क माध्यमांवर गाजत असलेले टांझानिया इथले किली पॉल आणि त्यांची बहिण नीमा यांचा उल्लेख त्यांनी केला. या दोघांनी हिंदी भाषेतली अनेक गाणी ओठांच्या हालचालींवर गाऊन त्यांचं चित्रण केलं आहे. आपणही असे प्रयोग करुन `एक भारत-श्रेष्ठ भारत`चा अनुभव घेऊ शकतो. यामुळं आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वेगळ्या पद्धतीनं साजरा करू शकतो असं त्यांनी नमुद केलं. देशातल्या विविध भाषांमधली जी लोकप्रिय गीतं आहेत, त्यावर आपण आपल्या पद्धतीनं चित्रफीत बनवा, आपण खूप लोकप्रिय होऊन जाल आणि देशातल्या वैविध्याची ओळख नव्या पिढीला होईल, असं ते नवतरुणांना उद्देशून म्हणाले. चोरुन विदेशात नेलेल्या दोनशेहून जास्त अत्यंत मौल्यवान मूर्तिंना सरकारनं गेल्या सात वर्षांत यशस्वीपणे मायदेशी परत आणलं असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या आठ मार्चला साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं बोलताना त्यांनी मुलांना आणि मुलींना समान अधिकार देऊन लग्नाचं वय समान करण्याचा देश प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. स्थानिकांसाठी आग्रह धरण्याच्या माध्यमातून आपण आपले सण साजरे करावेत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आयुर्वेदीक वनस्पतींची शेती करून त्याचा लाभ अधिकाधिक लोकांना देण्याकरता पूर्ण प्रयत्न करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

****

युद्ध परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याच्या ‘ऑपरेशन गंगा’ या मोहीमेअंतर्गत आज २५० विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले. यात महाराष्ट्रातल्या २७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १७७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २४ लाख ५ हजार पेक्षा अधिक नागरीकांचं लसीकरण झालं. दरम्यान, देशात काल नव्या १४ हजार १४८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, २४३ रुग्णांचा मृत्यू झाला, तर जवळपास २० हजार रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत चार कोटी २२ लाख ९० हजार ९२१ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, सध्या एक लाख ११ हजार ४७२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज पाच वर्षांखालील दोन लाख ६७ हजार बालकांना पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत मात्रा दिली जात आहे. यासाठी २ हजार ८३ केंद्र उभारण्यात आली आहेत. औरंगाबाद शहरात या लसीकरण मोहिमेंतर्गत पाच वर्षांपर्यंतच्या १ लाख ९८ हजार ६१४ बालकांना पोलिओची मात्रा देण्यात येतील. यासाठी ६६१ केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. उद्यापासून घरोघरी जाऊन ही मात्रा देण्यात येणार आहे.

****

चीनसारख राष्ट्र ज्या पद्धतीनं आपल्या मातृ भाषेचा आग्रह धरतात त्या पद्धतीनं मराठी भाषिकांनीही मातृभाषेचा आग्रह धरला पाहिजे, असं मत ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांनी आज व्यक्त केलं. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा आणि वाङमय विभागातर्फे त्यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं, त्यावेळी रसाळ बोलत होते. ‘मराठी भाषेपुढील समस्या’ हा व्याख्यानाचा विषय होता. शासनामध्ये मराठीतूनच सगळे व्यवहार झाले पाहिजे, तरंच मराठीकरण होवू शकतं, असं त्यांनी नमुद केलं. मराठीकरण करण्याची राज्य सरकारची इच्छा शक्ती नसून सरकारवर परप्रांतीयांचं दडपण असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

*********


No comments: