Sunday, 27 February 2022

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 February 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 February 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ फेब्रुवारी २०२ सायंकाळी ६.१०

****  

कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. आम्ही सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.

****

** आई आणि मातृभाषा जगण्याचा पाया मजबूत करत असल्याचं नमुद करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा

** राज्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी ६ कोटी ६७ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लसीच्या दोन मात्रा

** युद्धग्रस्त युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनातर्फे दिल्लीत सहकार्य कक्ष 

आणि

** सदाचार असेल तर देश आणि जग सुधारेल- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं प्रतिपादन 

****

आई आणि मातृभाषा आपल्या जगण्याचा पाया मजबूत करत असल्याचं नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रख्यात कवी आणि लेखक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीला साजऱ्या होणाऱ्या या दिवशी कुसुमाग्रज यांचं स्मरण करत, त्यांनी मराठी साहित्याला नवी उंची प्राप्त करून दिली, असं पंतप्रधानांनी आपल्या या संदर्भातल्या संदेशात म्हटलं आहे.

****

‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं असून राज्यातल्या जनतेला तसंच जगभरातील मराठी भाषाप्रेमींना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिजात भाषेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकर मिळावा, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्धार असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे.

****

युद्धग्रस्त युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना सुखरुप स्वगृही पोहचता यावं, यासाठी दिल्लीतल्या महाराष्ट्र शासनाच्या, महाराष्ट्र सदनाच्यावतीनं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना राज्यातल्या त्यांच्या घराजवळ पोहचवण्यासाठी विमानाचं तिकीट काढून देण्यात येत असल्याचं सरकारनं कळवलं आहे. दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटका करण्याच्या, ऑपरेशन गंगा या, मोहीमेअंतर्गत चौथ्या विमानानं आज अजून एकशे अट्ट्याण्णव भारतीय नागरिक बुखारेस्ट इथून दिल्लीसाठी निघाले आहेत.

****

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणाअंतर्गत राज्यात आज सकाळपासून दुपारपर्यंत ६ हजार नागरिकांचं लसीकरण झालं. लाभार्थ्यांना आतापर्यंत दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १५ कोटी ५५ लाखांच्या वर गेली आहे. त्यात ६ कोटी ६७ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लसीच्या दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर १५ लाख १४ हजारापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना एकूण ५३ लाख ६५ हजारापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत.

****

राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद, अर्थात `नॅक`च्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर भूषण पटवर्धन यांची निवड करण्यात आली आहे. प्रा. जगदेशकुमार यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर `नॅक`चं अध्यक्षपद रिक्त होतं. डॉक्टर पटवर्धन सध्या आयुष मंत्रालयात राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

****

सदाचार असेल तर देश आणि जग सुधारेल, असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या अनुशंगानं आज औरंगाबाद इथं आयोजित समर्थ साहित्य परिषदेचा समोराप त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला, त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या अणि संस्कृतीच्या रक्षणासाठी `राम राज्या`ची आवश्यकता असल्याचं त्यांनी यावेळी नमुद केलं. `समर्थ साहित्यातले राष्ट्रविचार` या विषयावर ज्येष्ठ पत्रकार विवेक घळसासी यांनी तर `समर्थ साहित्य आणि व्यवस्थापन` या विषयावर श्रीनिवास रायरीकर यांनी आणि `समर्थांचा कुटुंब संदर्भातला विचार` या विषयावर डॉ. अपर्णा बेडेकर यांनी या परिषदेत मार्गदर्शन केलं.

****

औरंगाबाद मधल्या ५२ हजार पात्र लाभार्थ्यांना `पंतप्रधान आवास` योजनेचा लाभ मिळालेला नाही. शहरातल्या बेघरांना व्यावसायिक आणि स्वयंपाकाच्या नैसर्गिक वायू वाहिनीची गरज नसून घरांची आणि पाण्याची आवश्यकता असल्यानं दोन मार्चला औरंगाबाद इथं या कामाच्या उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. औरंगाबाद इथं आज एका पत्रकार परिषदेत त्यांनी या संदर्भातली माहिती दिली. शहरातले रस्ते आताच दुरुस्त करुन नवे करण्यात आले आहेत. ही नैसर्गिक वायू वाहिनी टाकण्यासाठी परत रस्ते खराब केले जाणार असल्याची टीका त्यांनी केली. सर्व पात्र नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करत रहाणार असल्याचंही जलील यांनी यावेळी सांगितलं.

****

पल्स पोलिओ लसीकरण राज्य स्तरीय मोहीमेचं उदघाटन आज जालना इथं आरोग्य तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जिल्हा स्त्री रुग्णालयात झालं. उस्मानाबाद इथं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते लस देऊन मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. येत्या २ मार्चपर्यंत ही लसीकरण मोहीम चालणार आहे.

****

ग्रामीण भागात विद्यार्थी शाळेत टिकून रहाण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळांना शासन स्तरावरून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असं नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीनं सावित्रीबाई फुले पुरस्कार, नरहर कुरुंदकर पुरस्कार आणि जिल्हा शिक्षक पुरस्कारांचं वितरण आज त्यांच्या हस्ते नांदेड इथे झालं, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात वाचन चळवळ रुजावी यासाठी मराठी भाषा दिनाच्या औचित्यानं त्यांची यावेळी ग्रंथतुला करण्यात आली. ही पुस्तकं मराठी शाळांना वाटण्यात येणार असल्याचं संयोजकांनी कळवलं आहे.

****

औरंगाबाद जिल्हयातील पर्यटन स्थळं खुली करण्यात आल्यानं आज सुटीच्या दिवशी पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी झाली होती. दरम्यान, पर्यटनस्थळांसाठीची तिकीटविक्री केवळ `ऑनलाईन` न ठेवता आता प्रत्यक्षही केली जावी, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.

****

No comments: