Thursday, 24 February 2022

Text : आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.02.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ फेब्रुवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीनं मुंबईत मंत्रालयात महात्मा गांधी स्मारक परिसरात निदर्शनं करण्यात येत आहेत. राज्य मंत्रिमंडळातले मंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, राजेश टोपे, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह इतर मंत्री यावेळी उपस्थित आहेत. मलिक यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेणार नसल्याचंही महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, मलिक यांनी राजीनामा देण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनंही आज आंदोलन करण्यात येत आहे.

****

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत घरगुती वापराच्या गॅस वितरणाद्वारे सुमारे एक लाख लोकांना रोजगार मिळाला आहे, असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री रामेश्वर तेली यांनी म्हटलं आहे. जनकल्याण योजना अधिक प्रभावी करण्याच्या आणि विकासाला गती देण्याच्या उद्देशानं आयोजित हर घर उज्ज्वला योजनेवर अंदाजपत्रकानंतर होणाऱ्या वेबिनारमध्ये ते बोलत होते. कोविड साथीच्या काळात प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत १४ कोटींहून अधिक लाभार्थ्याना गॅस सिलिंडर्स मोफत भरून देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात उस्मानाबाद जिल्ह्याने ८१ पूर्णांक ६६ शतांश टक्के गुण मिळवून राज्यभरात तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर उमरग्यातल्या तालुका क्षयरोग पथकाने ७५ पूर्णांक २२ शतांश टक्के गुण मिळवून तालुकास्तरीय पुरस्कार प्राप्त केला आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला-पूर्णा या २५० किलोमीटर अंतराच्या लोहमार्गापैकी लोहगड ते वाशिम या ५४ किलोमीटर अंतराच्या मार्गावर विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालं असून, काल या मार्गावरून विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी यशस्वी पार पडली.

****

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महावितरण विरोधातल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. कोल्हापूर इथल्या महावितरण कार्यालयासमोर गेले दोन दिवस संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या धरणे आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्यानं संतप्त अज्ञात शेतक-यांनी कागल इथं महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांचं कार्यालय पेटवलं. अग्निशमन दलाच्या पथकानं आग आटोक्यात आणली.

****

No comments: