Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 28 February 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ फेब्रुवारी २०२२ सायंकाळी
६.१०
****
कोरोना
विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. आम्ही सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि
१५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं
आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा,
दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि
मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क
करा.
****
** सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर मराठा आरक्षणा संदर्भात मुंबईत
आझाद मैदानात तीन दिवसांपासून सुरु असलेलं खासदार संभाजी राजे छत्रपती यांचे उपोषण मागे
**
अहमदनगर जिल्ह्यातील राम गणेश गडकरी साखर
कारखान्याची बेकायदेशिर लिलावातील १३ कोटी ४१ रूपयांची मालमत्ता
सक्त वसुली संचालनालयाकडून जप्त
** कोळशाचा तुटवड्यामुळे राज्यात भारनियमन करावं लागण्याचे
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे संकेत
**
इतर मागासवर्ग आरक्षण संदर्भात येत्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात
सुनावणी
आणि
**
संजय पांडे यांची मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी नियुक्ती
****
मराठा आरक्षणा संदर्भात मुंबईत आझाद मैदानात तीन
दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण खासदार संभाजी राजे छत्रपती
यांनी सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर थोड्या वेळापूर्वी
मागे घेतलं. खासदार संभाजीराजे यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी
त्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर खासदार संभाजी राजे यांनी उपोषण मागे घेण्याची
घोषणा केली. यावेळी बोलतांना मंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजे
यांनी मराठा समाजाला न्याय
मिळवून देण्याचा प्रयत्न केला असल्याचं सांगितलं. अण्णासाहेब
पाटील महामंडळाला १०० कोटी रुपये अतिरिक्त निधी देण्याची तसंच
सारथी संस्थे मधील रिक्त पदे २०२२ पर्यंत भरण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचं
त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मराठा
समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात येणाऱ्या सर्व वसतीगृहांचं
उद्धाटन करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. मराठा
आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील तसंच मृतांच्या वारसांना नोकरी मिळणार
असल्याचंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
****
अहमदनगर जिल्ह्यातील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची
बेकायदेशिर लिलावातील १३ कोटी ४१ रूपयांची मालमत्ता सक्त
वसुली संचालनालय- ईडीनं जप्त केली आहे. ट्विटरवर ट्वीट करुन ईडीनं
ही माहिती दिली. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या लिलावात हा साखर
कारखाना अतिशय कमी किंमतीत विकला गेला होता. राज्यमंत्री
प्राजक्त तनपुरे यांनी हा साखर कारखाना विकत घेतला होता. या कारवाईत ईडीनं साखर
कारखान्याच्या मालकीची ९० एकर शेत जमिन आणि जवळपास साडेचार एकर अकृषिक जमिनही जप्त केली आहे.
****
राज्यातील औष्णिक वीज उत्पादन प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्यानं राज्यात
भारनियमन करावं लागू शकतं असे संकेत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.
अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू, बार्शी टाकळी
तालुक्यातील कोथळी आणि घोटा इथल्या वीज उपकेंद्राचं लोकार्पण
आज करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात सध्या ६ लाख
७५ हजार मेट्रिक टन कोळसा शिल्लक आहे. राज्यातील ७ वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये रोज एक ते दीड लाख मेट्रिक टनापर्यंत कोळसा लागतो मात्र
तुटवडा झाल्यास भारनियमन होऊ शकतं तसंच ग्राहकांनी वीज देयकं त्वरीत भरावीत अन्यथा
वीज पुरवठा खंडित करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
इतर मागासवर्ग - ओबीसी आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर
येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, हा निकाल ओबीसी घटकांच्या बाजूने येईल आणि
ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण पूर्ववत होईल असा विश्वास
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन
भुजबळ यांनी व्यक्त केला. ते आज नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. भारत सरकारच्या
यंत्रणांपासून ते राज्याच्या विविध विभागाच्या डाटा मधून राज्य मागासवर्गीय
आयोगानं अंतरिम अहवाल तयार केला असून सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेल्या
त्रिस्तरीय चाचणीचा बराच भाग राज्य सरकारनं पूर्ण केला असल्याची माहिती मंत्री छगन
भुजबळ यांनी यावेळी दिली.
****
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटका करण्याच्या, ऑपरेशन गंगा मोहीमेअंतर्गत सहाव्या विमानानं बुडापेस्ट इथून आज आणखी २४० भारतीय नागरिकांना दिल्लीत आणण्यात आलं.
****
सध्या
राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून काम पाहणारे संजय पांडे यांची
मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यमान पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज गृह मंत्रालयाने
याबाबतचे आदेश जारी केले.
****
हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूरला तालुक्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी
तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीनं आज नांदेड - हिंगोली रस्त्यावर रास्ता रोको
आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाच्यावेळी विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव, आमदार संतोष बांगर यांनी भेट देत तालुका
निर्मितीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासान दिलं. या
आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती.
****
सोलापूर इथं राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयासमोर आज विषारी ताडी विक्री
विरुध्द गोदुताई परुळेकर संस्थेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. ताडी विक्री
केंद्र बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी दिला
आहे.
****
धुळे पंचायत समितीच्या माध्यमातून घरकुल, पेयजेल,
इंधन विहीर, कृषी, आरोग्य
अशा विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी आज
घेतला. पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजना अशा विविध
घरकुल योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात दिरंगाई होत
असल्याबाबत संबंधितांना त्यांनी जाब विचारला. तसंच केंद्र सरकारच्या घर घर नल योजनेत
तालुक्यातील समाविष्ट गावांना पाईपलाईन जोडणी देण्याच्या कामाचाही त्यांनी यावेळी
आढावा घेतला.
****
राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील जेष्ठ नागरीकांना
साधन साहित्याचं वितरण सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाचे मंत्री डॉ विरेद्र
कुमार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात करण्यात आलं. देशात ज्येष्ठ नागरिक आणि
दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र सशक्त विभाग सुरू करण्यात आला असून, त्यांना आवश्यक साधन साहित्याची निर्मिती देशात सुरू
करून केंद्र सरकारनं आत्मनिर्भरतेचं आणखी एक पाउल पुढे टाकलं
असल्याचं डॉ विरेद्र कुमार यांनी यावेळी बोलतांना सांगितलं.
जिल्ह्यातील ३७ हजार जेष्ठ नागरीकांना ३७ कोटी ९५ लाख रुपयांचं साधन साहित्य मोफत देण्यात येणार असून यापैकी आज
८९५ पात्र लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आलं.
****
राष्ट्रीय विज्ञान दिन आज सर्वत्र साजरा करण्यात आला. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
सर सी. व्ही. रामन यांनी रामन परिणामांचा शोध लावल्याच्या स्मरणार्थ २८ फेब्रुवारी
हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.
****
No comments:
Post a Comment