Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 February
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२६ फेब्रुवारी २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या
सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड
प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन
साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ
ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५
या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी
संपर्क करू शकता.
****
·
महाराष्ट्रातले १२०० विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; मराठवाड्यातल्या
९१ जणांचा समावेश
·
मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र
समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
·
पोलिस शिपायांना सेवा कालावधीत उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीबाबत
शासन निर्णय जारी
·
राज्यात ओमायक्रॉनचे नवे ६२ तर कोविडचे नवे ९७३ रुग्ण; मराठवाड्यात
३८ रुग्णांची नोंद
·
उद्योजकता आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र
सरकार वचनबद्ध-केंद्रीय मंत्री नारायण राणे
·
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोळीबार; एक जण जखमी
·
हिंगोली जिल्ह्यात दोन बालविवाह रोखण्यात प्रशासकीय यंत्रणेला
यश
·
नांदेड जिल्हा परिषदेचे साहित्य पुरस्कार जाहीर; उद्या वितरण
आणि
·
सिंगापूर आंतरराष्ट्रीय भारोत्तालन स्पर्धेत, भारताच्या मीराबाई
चानूला सुवर्णपदक
****
महाराष्ट्रातले
सुमारे १२०० विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून, या सर्वांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी
प्रयत्न सुरू असल्याचं, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या विद्यार्थ्यांपैकी
३०० जणांचा पालकांशी संपर्क झाला असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान,
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मराठवाड्यातल्या ९१ जणांचा समावेश आहे.
यामध्ये नांदेड जिल्ह्यातले २९, लातूर २८, उस्मानाबाद १२, औरंगाबाद तसंच जालना जिल्ह्यातले
प्रत्येकी सात, परभणी सहा तर बीड आणि हिंगोली जिल्ह्यातला प्रत्येकी एक विद्यार्थी
आहे.
****
मराठा
समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग
गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षण उपसमितीची काल बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजासाठी
घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी आणि शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी,
सहसचिव दर्जाच्या विशेष अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करण्याचा निर्णय देखील, घेण्यात
आला आहे. 'सारथी' संस्थेसाठी आवश्यक असलेल्या, २७३ पदांसाठी भरती प्रक्रिया महिन्याभरात
केली जाईल, मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या १८ नागरिकांच्या वारसांना राज्य परिवहन
मंडळात रुजू करून घेण्यात आलं असून, उर्वरित प्रकरणांवरही तातडीने निर्णय घेण्याचे
निर्देश, या बैठकीत देण्यात आले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासह विविध महामंडळांची
संचालक तसंच व्यवस्थापकीय संचालकांची रिक्त पदं, आवश्यकतेनुसार तातडीने भरण्याचा निर्णय
या बैठकीत घेण्यात आला.
राज्य
शासन आणि मंत्रिमंडळ उपसमितीने मराठा समाजाबाबत आजवर घेतलेल्या विविध निर्णयांच्या
अंमलबजावणीचा या बैठकीत विस्तृत आढावा घेण्यात आला. तसंच प्रलंबित प्रकरणांवर तातडीने
कालबद्ध रितीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
****
मराठी
भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
लोकसत्ता वृत्तपत्राच्या वर्धापनदिन समारंभात ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्र्यांची
मुलाखत घेतली, त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या मागणीकडे लक्ष वेधलं. अभिजात दर्जासाठी
केंद्राकडे मागणी करावी लागत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी खंत व्यक्त केली. भाजपला
सगळी सत्ता स्वत:कडे हवी असल्याचं सांगत ठाकरे यांनी भाजपच्या धोरणांवर कडाडून टीका
केली.
****
पोलिस
शिपायांना सेवा कालवधीत आश्वासित प्रगती योजनेनुसार पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती
देण्यासंदर्भात, शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पोलीस शिपाई संवर्गातल्या
कर्मचाऱ्यांना, सेवा कालावधीत पदोन्नतीच्या तीन संधी मिळून, अधिकारी पदावरून सेवानिवृत्त
होता येईल. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस महासंचालक स्तरावर सुकाणू
समिती गठित करण्यात येणार आहे. याशिवाय पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उप निरीक्षक, या
पदोन्नती साखळीमधील पोलीस नाईक या संवर्गातली ३८ हजार १६९ पदं, पोलीस शिपाई, पोलीस
हवालदार आणि सहायक पोलीस उप निरीक्षक या संवर्गात वर्ग करण्यात येणार आहेत.
****
एसटी
कर्मचारी संपाबाबत त्रिसदस्यीय समितीच्या अहवालावर दोन आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत
चर्चा करून निर्णय घेऊन कळवावा, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. काल झालेल्या
सुनावणीत न्यायालयानं हे निर्देश दिले. या प्रकरणी आता पुढची सुनावणी ११ मार्चला होणार
आहे.
****
देशात
आर्थिक घडामोडींना चालना देण्यासाठी कोविड निर्बंध शिथील करण्याची गरज, केंद्रीय गृहसचिव
अजय भल्ला यांनी व्यक्त केली आहे. यासाठी देशभरात सांस्कृतिक तसंच धार्मिक कार्यक्रम
आणि सण उत्सव साजरे करण्यास परवानगी द्यावी, व्यावसायिक निर्बंध हटवावेत, रात्रीची
संचारबंदी रद्द करावी, असं भल्ला यांनी, राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या
पत्रात म्हटलं आहे. यासंदर्भातला निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक पातळीवर कोविड स्थितीचा
आढावा घ्यावा, तसंच कोविड प्रतिबंधक नियमांचं पुरेपूर पालन करावं, असंही त्यांनी या
पत्रात म्हटलं आहे.
****
राज्यात
काल ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या नव्या ६२ रुग्णांची नोंद झाली. हे सर्व रुग्ण पुणे
जिल्ह्यातले आहेत. राज्यात ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या चार हजार ६२९ झाली
असून, त्यापैकी चार हजार ४५६ रुग्ण बरे झाले आहेत.
****
राज्यात
काल कोविड संसर्ग झालेले नवे ९७३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची
एकूण संख्या ७८ लाख ६३ हजार ६२३ झाली आहे. काल १२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४३ हजार ६८७ झाली असून,
मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल दोन हजार ५२१ रुग्ण बरे झाले, राज्यात
आतापर्यंत ७७ लाख सात हजार २५४ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड
मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य एक शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या जवळपास १० हजार
रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल ३८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. तर लातूर जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला.
परभणी
जिल्ह्यात दहा रुग्णांची नोंद झाली. लातूर आठ, औरंगाबाद सात, बीड सहा, नांदेड चार,
तर हिंगोली जिल्ह्यात तीन नव्या रुग्णांची नोंद झाली. जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात
काल एकही रुग्ण आढळला नाही.
****
शिक्षक
पात्रता परीक्षा - टीईटी गैरप्रकाराच्या तपासात, आतापर्यंत १ हजार ७७८ शिक्षक अपात्र
असल्याचं निष्पन्न झालं आहे. हे सर्वजण अपात्र असूनही त्यांना पात्र ठरवल्याचं चौकशीतून
समोर आलं आहे. या गुन्ह्यात आणखी बारा जणांचा सहभाग समोर आला असून, सायबर पोलिसांकडून
त्यांचा शोध सुरू आहे.
****
मुंबई
महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या माझगाव इथल्या घरावर
आयकर विभागानं काल छापा टाकला. जाधव यांच्या पत्नीचीही या विभागामार्फत चौकशी होणार
आहे. कोलकत्त्याच्या कंपनीमार्फत आर्थिक गैरव्यवहार करून १५ कोटी रुपये रुपये दुबईत
गुंतवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. जाधव यांच्या माझगाव इथल्या घराच्या परिसरात पोलीस
बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उत्पन्नाची माहिती लपवून कर चुकवल्याचा आरोप त्यांच्यावर
ठेवण्यात आला आहे.
****
उद्योजकता
आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं, केंद्रीय
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. ते काल सिंधुदूर्ग
जिल्ह्यात ओरोस इथं, एम एस एम ई परिषदेच्या उद्घाटनपर सत्रात बोलत होते. महाराष्ट्रात,
विशेषतः कोकणात रोजगार निर्मितीसाठी प्रचंड वाव आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम,
स्फूर्ती अर्थात पारंपारिक उद्योगांच्या पुनरुत्थानासाठी निधी पुरवठा योजना, मधु अभियान
आणि कुंभार सशक्तीकरण योजनेच्या काटेकोर अंमलबजावणीची ग्वाही, राणे यांनी यावेळी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एमएसएमई तंत्रज्ञान केंद्र स्थापन करणार असल्याची घोषणा त्यांनी
केली. २०० कोटी रुपये खर्चून हे केंद्र उभारण्यात येणार आहे. राणे यांनी या प्रसंगी
एमएसएमई रूपे कार्डची देखील सुरुवात केली. उपस्थित एमएसएमई उद्योजकांना या एमएसएमई
रुपेच्या पहिल्या संचातल्या कार्डांच वितरण करण्यात आलं.
****
बीड
इथं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काल गोळीबार होऊन एक जण जखमी झाला. नोंदणी कार्यालयात
जमीन खरेदी-विक्रीच्या कारणावरून दोन गटात वाद झाले, त्यातूनच हा गोळीबार झाल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी पथकासह घटनास्थळी
भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी अद्याप कोणासही अटक झालेली नाही.
****
हिंगोली
जिल्ह्यात दोन बालविवाह रोखण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आलं आहे. कळमनुरी तालुक्यातल्या
बेलथर इथं होणाऱ्या या दोन बालविवाहांपैकी एका विवाहातले वधुवर तर एका विवाह सोहळ्यातली
वधू अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली होती. बालविवाह प्रतिबंधक समिती आणि बाळापूर पोलिस
या गावात पोहोचतात वऱ्हाडी मंडळी आणि वधू-वराचे नातेवाईक पसार झाल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
निरोगी
जीवनशैलीचं मूळ पारंपारिक भारतीय आहारशास्त्रात असल्याचं प्रतिपादन, आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ
दीक्षित यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं विवेकानंद महाविद्यालयात सुरू असलेल्या विज्ञान
सप्ताहात ते काल बोलत होते. निरोगी जीवनासाठी दिवसभरातून फक्त दोन वेळा जेवण करणं उपयोगी
आहे, हे स्पष्ट करण्यासाठी, त्यांनी प्राचीन तसंच आधुनिक अशा दोन्ही संशोधनांचा दाखला
दिला. दिल्ली इथल्या दीनदयाल संशोधन संस्थेचे डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना,
प्राचीन काळातल्या समृद्ध आणि वातावरणाला अनुरुप जीवनशैलीपासून दूर गेल्यामुळे, आज
कॅन्सर आणि इतर अनेक आजार वाढत असल्याचं नमूद केलं. या सप्ताहात आज दुपारच्या सत्रात
वायू प्रदूषणाला पर्याय असणारी इलेक्ट्रिक वाहनं, तसंच भारताच्या भू विज्ञान संशोधनाची
प्रगती दाखवणाऱ्या माहितीपटांचं प्रसारण करण्यात आलं.
****
नांदेड
जिल्हा परिषदेचे साहित्य पुरस्कार काल जाहीर झाले. २०२०-२१ चा नरहर कुरूंदकर पुरस्कार
लेखक कवी देविदास फुलारी यांना तर सावित्रीबाई फुले पुरस्कार डॉ. भारती मढवई यांना
जाहीर झाला आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी काल पत्रकार परिषदेत
या पुरस्कारांची घोषणा केली. दोन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या दोन्ही पुरस्कारांचं
स्वरूप आहे. हे पुरस्कार उद्या मराठी भाषा दिनी नांदेड इथं कुसूम सभागृहात समारंभपूर्वक
प्रदान केले जाणार आहेत. गेल्या दोन वर्षांचे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारही यावेळी प्रदान
केले जाणार आहेत.
****
सिंगापूर
आंतरराष्ट्रीय भारोत्तालन स्पर्धेत, महिलांच्या ५५ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई
चानू हीनं सुवर्णपदकाची कमाई केली आहे. मीराबाई हीनं एकूण १९१ किलो वजन उचलत सुवर्णपदक
निश्चित केलं. याबरोबरच ती २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरली आहे. टोक्यो
इथं झालेल्या २०२०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाईने रौप्य पदक जिंकलं आहे.
****
भारत
आणि श्रीलंका संघादरम्यान तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना
आज लखनौ इथं खेळवला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या
मालिकेत भारत एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
जायकवाडी-जालना
पाणीपुरवठा योजनेसाठी, जालना आणि अंबड नगरपालिकेनं जायकवाडी पाटबंधारे विभागाशी केलेल्या
कराराची मुदत नोव्हेंबर २०२० मध्ये संपली असून, अद्यापही कराराचं नूतनीकरण करण्यात
आलेलं नाही. दरम्यान, जालना नगरपालिकेकडे पाणी वापराची तीन कोटी ९८ लाख रुपयांची रक्कम
थकली आहे. येत्या पाच मार्चपर्यंत कराराचं नूतनणीकरण करून थकित रक्कम न भरल्यास, जायकवाडी-जालना
योजनेचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असं जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी
अभियंत्यांनी कळवलं आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यात दोन ठिकाणी अफूची लागवड केल्याप्रकरणी दोन शेतकऱ्यांवर
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी परिसर आणि इंदापूर गावालगत असणाऱ्या शेतात अफूची
झाडे असल्याची माहिती मिळताच, वाशी पोलीसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत
चारशे किलो अफू जप्त केली. वाशी इथले नरसिंग वेताळ यांच्या शेतातून २५० किलो, तर इंदापूर
इथले विश्वंभर पारडे याच्याकडून २०० किलो अफू जप्त करण्यात आली. या दोघांविरोधात एनडीपीएस
कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
येत्या
सोमवारी २८ फेब्रुवारीला सर्व शासकीय, निमशासकीय, आश्रम शाळा, खाजगी शाळा, महाविद्यायल
आणि खाजगी शिकवणी वर्गांनी तंबाखूमुक्त शपथ घ्यावी, असे निर्देश नांदेड जिल्हाधिकारी
कार्यालयाने दिले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तंबाखू मुक्तीसाठी विविध उपक्रमांचं
आयोजन केलं असून, हा उपक्रमही त्याचाच भाग आहे. तंबाखूमुक्त शपथ घेतल्याचा अहवाल २
मार्च पर्यंत सादर करावा, अशी सूचना जिल्हा प्रशासनानं केली आहे.
****
No comments:
Post a Comment