Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 26 February 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ फेब्रुवारी २०२२ सायंकाळी
६.१०
****
कोरोना
विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. आम्ही सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि
१५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं
आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा,
दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि
मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क
करा.
****
**
औरंगाबाद शहरात घरगुती तसंच व्यावसायिक वापरासाठी नैसर्गिक वायू वाहिनी कामाचा येत्या
दोन मार्चला शुभारंभ
**
राज्य सरकारचा २ हजार ८८ शिक्षक पदांची भरती करण्याचा निर्णय
**
युक्रेनमधल्या २१९ भारतीयांना घेऊन एअर इंडियाच्या विमानाचं रोमानियाहून मुंबईकडे उड्डाण
**
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या बेमुदत उपोषणाला
प्रारंभ
आणि
**
उद्या मराठी भाषा गौरवदिन; विविध कार्यक्रमांचं आयोजन
****
औरंगाबाद
शहरात घरगुती तसंच व्यावसायिक वापरासाठी नैसर्गिक वायू वाहिनी कामाचा शुभारंभ येत्या
दोन मार्चला होणार आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज पत्रकार
परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदिपसिंग पुरी
यांच्या हस्ते या वायू वाहिनीच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. सुमारे चार हजार कोटी
रुपये खर्चून २१८ किलोमीटरहून औरंगाबादसाठी ही नैसर्गिक वायू वाहिनी टाकण्यात आली असल्याचं
डॉ. कराड यांनी सांगितलं. शहरातल्या दोन लाख घरापर्यंत हा गॅस पोहोचवण्याचं उद्दिष्ट
आहे. गंगापूर आणि वाळूज औद्योगिक क्षेत्रालाही या वाहिनीद्वारे गॅस पुरवठा करण्यात
येणार असून भविष्यात जालना आणि परभणीलाही या वाहिनीद्वारे पुरवठा होणार असल्याचं डॉ.
कराड यांनी यावेळी सांगितलं. या वाहिनीमुळे नैसर्गिक वायूची गळती आणि स्फोट होण्याचा
धोका कमी असतो. हा वायू हवेत विरघळत असल्यानं घरगुती वापरासाठी अत्यंत फायदेशीर असं
हे इंधन आहे. त्यामुळे घरा-घरापर्यंत गॅस पुरवठा करून वापरानुसार देयकं आकारण्याचं
नियोजन असल्याचं डॉ.कराड यांनी सांगितलं.
****
राज्य
सरकारने २ हजार ८८ शिक्षक पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण
मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. ते आज जळगाव इथं कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर
महाराष्ट्र विद्यापीठात झालेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीत विद्यापीठ कार्यक्षेत्रातील
जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्हयातून ३४० निवेदनं प्राप्त झाले असून यापैकी पीएच.डी.
वेतनवाढ, शिष्यवृत्ती सवलत, रिफ्रशेर कोर्स, कालबध्द पदोन्नती, सातवा वेतन आयोग आदी
संदर्भातल्या ३०९ अर्जांवर सकारात्मक निर्णय झाल्याचं सामंत यांनी सांगितलं.
****
स्वातंत्र्यवीर
विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू तसंच पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी सावरकरांना अभिवादन केलं आहे. जातीभेद आणि अस्पृश्यता यांविरुध्द
सावरकर यांनी आवाज उठवला. स्वातंत्र्यासाठी त्यांचं बलिदान सदैव स्मरणात राहील, असं
नायडू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
वीर
सावरकर हे त्याग आणि चिकाटीचे प्रतिक होते, त्यांनी आपलं आयुष्य मातृभूमीसाठी समर्पित
केलं, सावरकर हे देशवासियांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहतील, असं पंतप्रधानांनी अभिवादनपर
ट्विट संदेशात म्हटलं आहे.
औरंगाबाद
इथं सावरकरांना अभिवादन करण्यात आलं. समर्थनगर परिसरात स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्याला
विविध संस्था संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
****
युक्रेनमधून
२१९ भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं विमान रोमानियाहून निघालं असून आज रात्री आठ वाजेपर्यंत
ते मुंबईत पोहोचणार आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एका ट्विट संदेशात ही माहिती
दिली. केंद्रीय मंत्री पियूष गोयल हे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर
या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या विद्यार्थ्यांसाठी विमानतळावर
स्वतंत्र राखीव कक्ष तयार करण्यात आला असून या सर्व विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी
करण्यात येणार आहे. युक्रेनमधल्या भारतीयांच्या सुटकेसाठीचा सर्व खर्च सरकार करणार
असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.
युक्रेन
आणि रशियात अडकून पडलेल्या भारतीयांमध्ये नांदेड जिल्ह्याचे ३० विद्यार्थी आहेत. या
विद्यार्थ्यांशी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे
प्रत्यक्ष संवाद साधून धीर दिला.
****
मराठा
आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईत आझाद मैदानावर
आजपासून बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. त्याआधी खासदार संभाजी राजे यांनी वार्ताहरांशी
बोलताना, राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन पूर्ण केलं
नाही, असं नमूद केलं आहे.
दरम्यान,
या उपोषणाला पाठिंबा दर्शवत कोल्हापूर इथं दसरा चौकात मराठा समाजाच्या वतीनं साखळी
उपोषण सुरु करण्यात आलं आहे.
धुळे
शहरातही जिल्हा मराठा क्रांती मोर्चासह मराठा समाजाच्या विविध संघटनांनी जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.
जालना
शहरात गांधीचमन चौकात मराठा महासंघाच्यावतीनं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणी वरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या मालिकेचा हा ८६ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
संस्कृती,
कला, इतिहास अशा विविध विषयांवरील वैविध्यपूर्ण, आणि दुर्मिळ अश्या ५३ पुस्तकांचे लोकार्पण
उद्या मराठी भाषा गौरवदिनी करण्यात येणार आहे. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या
सचिव मिनाक्षी पाटील यांनी हि माहिती दिली.
दरम्यान,
उद्या असलेल्या मराठी भाषा दिनानिमित्त मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा
गौरव आणि त्यांना पुरस्कार प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
मराठी
भाषा गौरव दिन उद्या विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा आणि वाङ्गमय विभागाच्या वतीनं ज्येष्ठ समीक्षक
प्राध्यापक सुधीर रसाळ यांच्या विशेष व्याख्यानाचं तर संध्याकाळी सहा वाजता गझल संध्या
कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. एमजीएम अभिमत विद्यापीठाच्या वतीनं निमंत्रितांच्या
कविसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
नांदेड
इथं मराठवाडा साहित्य परिषद आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नांदेड शाखेसाठीच्या
कार्यालयांना स्वतंत्र जागा दिली असून दिलेल्या वचन पूर्तीचा आनंद होत असल्याची भावना
जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. आज नांदेड इथल्या स्वर्गीय डॉ.
शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह संकुल परिसरातील या दोन्ही संस्थेच्या कार्यालयांचं उद्घाटन
त्यांच्या हस्ते करण्यात आलं,त्यावेळी ते बोलत होते.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या कन्नडच्या बारामती ॲग्रो साखर कारखान्यानं रास्त आणि किफायतशीर भाव
- एफआरपी प्रमाणे ऊसाचा दर जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि
किसान पंचायत संघटनेच्या वतीनं आज धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या
मागण्यांसंदर्भात घोषणा देत फळक झळकावले.
****
No comments:
Post a Comment