Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 February
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२८ फेब्रुवारी २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या
सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड
प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन
साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ
ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५
या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी
संपर्क करू शकता.
****
·
मुलांमध्ये वैज्ञानिक वृत्ती विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्याचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सल्ला
·
मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून लेखी निर्णय आणि
भरीव अंमलबजावणी जाहीर केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा खासदार संभाजीराजे छत्रपती
यांचा निर्धार
·
दिशा सालियानची बदनामी केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण
राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
·
मास्कमुक्तीची घाई करुन चालणार नाही- आरोग्य मंत्री राजेश
टोपे
·
राज्यात कोविडचे ७८२ नवे रुग्ण, मराठवाड्यात दोन जणांचा मृत्यू
तर ३४ नवे रुग्ण
·
मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा
आणि
·
तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर सहा गडी
राखून विजय मिळवत भारतानं तीन- शून्यच्या फरकानं मालिका जिंकली
****
मुलांमध्ये
वैज्ञानिक वृत्ती विकसित करण्यासाठी लहान प्रयत्नांपासून सुरूवात करण्याचा सल्ला पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी पालकांना दिला. मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रम श्रृंखलेच्या
८६ व्या भागात, ते काल बोलत होते. राष्ट्रीय विज्ञान दिन आज साजरा होत आहे, यानिमित्त
मुलांमध्ये भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राबद्दल उत्सुकता निर्माण करण्याचं आवाहनही
त्यांनी केलं. कालच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पंतप्रधानांनी, मराठी नागरिकांना
मराठीतून शुभेच्छा दिल्या. आई आणि मातृभाषा आपल्या जगण्याचा पाया मजबूत करत असल्याचं,
त्यांनी मराठी भाषा दिनानिमित्त नमूद केलं. ज्येष्ठ साहित्यिक वि वा शिरवाडकर ऊर्फ
कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांचं स्मरण केलं. राष्ट्रीय शिक्षण
धोरणात स्थानिक भाषेतूनं शिकवण्यावर भर दिला गेला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमही स्थानिक
भाषांमधून शिकवले जावेत, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं ते म्हणाले.
****
युद्ध
परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याच्या ‘ऑपरेशन
गंगा’ या मोहीमेअंतर्गत, काल २५० विद्यार्थी
दिल्लीत दाखल झाले. यात महाराष्ट्रातल्या २७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकशे अट्ट्याण्णव
भारतीय नागरिकांना घेऊन बुखारेस्ट इथून निघालेलं चौथं विमानही, काल दिल्लीत दाखल झालं.
या सर्वांना आपापल्या घरी सुखरुप पोहोचता यावं, यासाठी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्यावतीनं
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. दिल्लीत
दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना राज्यातल्या त्यांच्या घराजवळच्या
विमानतळाच्या शहराची तिकीटं काढून देण्यात येत असल्याचं, सरकारनं सांगितलं आहे.
****
मराठा
समाजाच्या मागण्यांसाठी सरकारकडून लेखी निर्णय आणि भरीव अंमलबजावणी जाहीर केल्याशिवाय
उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काल पुन्हा एकदा
जाहीर केला. संभाजीराजेंनी उपोषण मागे घ्यावं, आणि मराठा समाजाच्या मागण्यांबाबतची
कोंडी फुटावी, यासाठी राज्य सरकारनं मराठा आरक्षणाच्या प्रश्नाशी संबंधित मंत्र्यांची
आज बैठक बोलावली आहे. या बैठकीला संभाजीराजेंच्या प्रतिनिधींना देखील उपस्थित राहण्याचं
निमंत्रण देण्यात आलं आहे.
दरम्यान,
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाकडे राज्य सरकार दुर्लक्ष
करत असल्याचा आरोप, कोल्हापूर इथल्या सकल मराठा समाजानं केला आहे. दोन दिवसांत मराठा
आरक्षणावर निर्णय न झाल्यास विविध पध्दतींनी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
याची सुरुवात परवा बुधवारी कोल्हापूर बंदची हाक देऊन करण्याचा निर्णय काल कोल्हापूर
इथं झालेल्या बैठकीत घेण्यात आला. संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी कोल्हापूरकर
आक्रमक झाले असून, हळदी बंदची हाक देत रस्ता रोको करण्यात येणार
असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
मराठा
आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषणाला पाठिंबा
देण्यासाठी तुळजापूर इथं भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल लाक्षणिक उपोषण
केलं.
****
अभिनेता
सुशांत सिंग राजपुत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिची बदनामी केल्याप्रकरणी केंद्रीय
मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल झाला आहे. १९ फेब्रुवारीला नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशाबाबत
आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानाला त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी दुजोरा देत
समाजमाध्यमांवर दिशाच्या मृत्यूविषयी बदनामीकारक संदेश प्रसारित केला. त्यांच्या या विधानामुळे दिशासह सालियन कुटुंबीयांची बदनामी झाली असून, लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा
दृष्टिकोन बदलला आहे. असं सांगत दिशाच्या आई वासंती सालियान यांनी तक्रार दाखल केली
होती. या तक्रारीची दखल घेत, राणे पिता-पुत्राविरुद्ध माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
****
कोरोना
विषाणू संसर्गाची तिसरी लाट आटोक्यात आली असली, तरीही मास्कमुक्तीची घाई करुन चालणार
नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते काल जालना इथं वार्ताहरांशी
बोलत होते. सरकार सध्या निर्बंधमुक्तीकडे वाटचाल करत आहे, मात्र मास्कमुक्तीचा निर्णय
घेताना विचार करावा लागेल, असं ते म्हणाले.
****
राज्यात
काल कोविड संसर्ग झालेले नवे ७८२ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची
एकूण संख्या ७८ लाख ६५ हजार २९८ झाली आहे. काल दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४३ हजार ६९७
झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल एक हजार ३६१ रुग्ण बरे झाले,
राज्यात आतापर्यंत ७७ लाख १० हजार ३७६ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून,
कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य दोन शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या सात
हजार २२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल ३४ नवे रुग्ण आढळले तर बीड आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात काल ११ नव्या रुग्णांची नोंद झाली. लातूर ९, बीड ५,
परभणी ४, नांदेड तीन, उस्मानाबाद जिल्ह्यात दोन नवे रुग्ण आढळले तर जालना आणि हिंगोली
जिल्ह्यात काल एकही नविन रुग्ण आढळला नाही.
****
देशभरात
कालपासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवण्यास सुरुवात झाली. या मोहिमेतून
शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या बालकांना पोलिओ लस दिली जात आहे. येत्या दोन मार्चपर्यंत
ही मोहीम चालणार आहे. या मोहिमेचं राज्यस्तरीय उदघाटन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या
हस्ते जालना इथल्या जिल्हा स्त्री रुग्णालयात करण्यात आलं. औरंगाबाद महानगरपालिकेनं काल एक लाख ५८ हजार २२५
मुलांना पोलिओ लस दिली. निर्धारित उद्दिष्टापैकी ७८ टक्के उद्दीष्ट काल साध्य झालं.
उस्मानाबाद इथं जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता कांबळे यांच्या हस्ते एका बालकाला
पोलिओ लसीचा डोस देऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
****
मराठी
भाषा गौरव दिन काल सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा झाला. औरंगाबाद इथं भारतीय स्वातंत्र्याच्या
अमृतमहोत्सवानिमित्त, एकदिवसीय श्री समर्थ साहित्य संमेलन काल मराठी भाषा दिनी घेण्यात
आलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत या साहित्य परिषदेचा समोराप झाला.
यावेळी बोलताना राज्यपालांनी, समर्थ रामदास स्वामी यांची शिकवण अखिल विश्वाला मार्गदर्शक
ठरणारी आहे. त्यादृष्टीनं चांगलं आयुष्य जगण्यासाठी सर्वांनी समर्थांची शिकवण आचरणात
आणण्याची गरज व्यक्त केली.
या
परिषदेत 'साहित्यातले राष्ट्रविचार` या विषयावर, ज्येष्ठ पत्रकार विवेक घळसासी यांनी,
`समर्थ साहित्य आणि व्यवस्थापन` विषयावर, श्रीनिवास रायरीकर यांनी, तर `समर्थांचा कुटुंब
संदर्भातला विचार` या विषयावर, डॉ. अपर्णा बेडेकर यांनी मार्गदर्शन केलं.
दरम्यान,
राज्यभरातल्या मराठी शाळा वाचवून माय मराठीचं अस्तित्व टिकवण्यासाठी, सरकारनं सकारात्मक
निर्णय घ्यावेत, अशी मागणी, भाजपा शैक्षणिक महासंघ तर्फे राज्यपालांना करण्यात आली.
भाजपचे औरंगाबाद शहरजिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांच्या नेतृत्वात महासंघानं राज्यपालांना
याबाबतचं निवेदन सादर केलं.
****
मराठीकरण
करण्याची राज्य सरकारची इच्छा शक्ती नसून सरकारवर परप्रांतीयांचं दडपण असल्याचा आरोप,
ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांनी केला आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या, मराठी भाषा आणि वाङ्गमय विभागातर्फे घेण्यात आलेल्या
व्याख्यानात, ‘मराठी भाषेपुढील समस्या’,
या विषयावर रसाळ बोलत होते. शासनामध्ये मराठीतूनच सगळे व्यवहार झाले पाहिजेत, तरंच
मराठीकरण होवू शकतं, असं त्यांनी नमूद केलं. मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी
सरकारला खर्चिक प्रयत्न करावे लागतील, चीनसारखी राष्ट्रं ज्या पद्धतीनं आपल्या मातृभाषेचा
आग्रह धरतात, त्या पद्धतीनं मराठी भाषिकांनीही मातृभाषेचा आग्रह धरला पाहिजे, असं रसाळ
म्हणाले.
मराठी
राजभाषा दिनानिमित्त शिवसेनेच्यावतीनं औरंगाबाद इथं कवी संमेलन घेण्यात आलं. काव्यप्रेमी,
रसिक प्रेक्षकांची या कार्यक्रमाला लक्षणीय उपस्थिती होती.
परभणी
जिल्ह्यात सेलू इथल्या नूतन विद्यालयात, कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा
गौरव दिनानिमित्त, मराठी विषयाचे सहशिक्षक अशोक लिंबेकर यांनी, मराठी भाषेची महती आपल्या
मनोगतातून विषद केली. मराठी भाषेला उज्ज्वल असा इतिहास आहे. त्यामुळेच मराठी ही अभिजात
भाषा असल्याचं मत, लिंबेकर यांनी व्यक्त केलं.
****
औरंगाबाद
इथं येत्या दोन मार्च रोजी होणाऱ्या नैसर्गिक वायूवाहिनी कामाच्या शुभारंभ सोहळ्यात,
केंद्रीय मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा, खासदार इम्तियाज जलील यांनी
दिला आहे. औरंगाबाद इथं काल पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहरातल्या ५२ हजार पात्र
लाभार्थ्यांना `पंतप्रधान आवास` योजनेचा लाभ मिळालेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
शहरातले रस्ते आताच दुरुस्त करुन नवे करण्यात आले आहेत. ही नैसर्गिक वायू वाहिनी टाकण्यासाठी
परत रस्ते खराब केले जाणार असल्याची शंका त्यांनी वर्तवली. औरंगाबाद शहरातल्या बेघरांना
नैसर्गिक वायू वाहिनीपेक्षा घरं आणि पाण्याची आवश्यकता असल्याचं खासदार जलील यांनी
सांगितलं.
****
गुणवत्तापूर्ण
शिक्षणासाठी शाळांना शासन स्तरावरून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असं नांदेड
जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीनं
सावित्रीबाई फुले पुरस्कार, नरहर कुरुंदकर पुरस्कार आणि जिल्हा शिक्षक पुरस्कारांचं
वितरण काल चव्हाण यांच्या हस्ते नांदेड इथे झालं, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात
वाचन चळवळ रुजावी यासाठी मराठी भाषा दिनाच्या औचित्यानं चव्हाण यांची ग्रंथतुला करण्यात
आली. ही पुस्तकं मराठी शाळांना वाटण्यात येणार असल्याचं संयोजकांनी कळवलं आहे.
दरम्यान,
चव्हाण यांच्या हस्ते काल परभणी तालुक्यात जांब इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या
इमारतीचं लोकार्पण, जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन, आणि नाबार्ड 36 अंतर्गत
बाभूळगाव ते मांडाखळी ग्रामीण रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलं.
****
परभणी
जिल्ह्यातल्या जिंतूर इथं औद्योगिक वसाहतीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी काल मतदान
झालं.
दरम्यान,
या मतदानावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि राष्ट्रवादी
काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली.
यावेळी झालेल्या दगडफेकीत पोलिस उपनिरीक्षकासह एक पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले.
पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांसह जमावाला पांगवलं.
****
औरंगाबाद
इथं विवेकानंद महाविद्यालयात आयोजित केंद्र सरकारच्या विज्ञान प्रसार महोत्सवामध्ये
काल सहाव्या दिवशी डॉक्टर जी. डी. यादव, डॉक्टर एस. डी. पवार, खगोल शास्त्रज्ञ श्रीनिवास
औंधकर तसंच गिरीशकुमार भसीन यांची व्याख्यानं झाली. या सप्ताहात घेण्यात आलेल्या विविध
स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्य विद्यार्थ्यांना पारितोषिकं देण्यात आली. आज विज्ञान दिनी या सप्ताहाचा समारोप होत आहे.
****
धरमशाला
इथं काल झालेल्या तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेवर सहा गडी
राखून विजय मिळवत, तीन सामन्यांची मालिका तीन - शून्य अशी जिंकली आहे. प्रथम फलंदाजी
करत श्रीलंकेनं दिलेलं १४७ धांवंचं लक्ष्य भारतीय संघानं सतराव्या षटकातच पूर्ण केलं.
मालिकेत सलग तीन अर्धशतके ठोकत नाबाद राहणाऱ्या श्रेयस अय्यरला सामनावीर आणि मालिकावीर
पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
****
तुळजापूर
तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने १० जागा जिंकत खरेदी विक्री
संघावर सत्ता मिळवली आहे. शिवसेनेचे सहा, काँग्रेसचे दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या
दोन उमेदवारांनी विजय मिळवला. या संघावर सत्ता असलेल्या भारतीय जनता पार्टीचे तीन उमेदवार
निवडून येऊ शकले.
****
उदगीर
इथं येत्या २३ आणि २४ एप्रिलला विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे सोळावं विद्रोही साहित्य
संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. काल उदगीर इथं झालेल्या राज्य कार्यकारिणी आणि स्थानिक
संयोजन समितीच्या बैठकीत संमेलन संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं.
****
No comments:
Post a Comment