Thursday, 24 February 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.02.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 February 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना तीन मार्चपर्यंत सक्तवसुली संचालनालयाची कोठडी

·      राज्य सरकारी तसंच निमसरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

·      राज्यातल्या सर्व दुकानांवर मराठीत पाट्या लावण्याच्या निर्णयाविरोधातली याचिका, मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली, याचिकाकर्त्या संघटनेला २५ हजारांचा दंड

·      सर्व राज्यातल्या दहावी - बारावीच्या परिक्षा ऑफलाईनच होणार -सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण 

·      राज्यात कोविड संसर्गाचे एक हजार १५१ तर मराठवाड्यात ६० नवे रुग्ण

·      बीड जिल्ह्यातील अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य गुन्हेगार डॉ. सुदाम मुंडेला आठ वर्ष कारावासाची शिक्षा

आणि

·      भारत आणि श्रीलंकेत आज तीन सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना

****

राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा न्यायालय- पीएमएलएनं तीन मार्चपर्यंत सक्तवसुली संचालनालय - ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीनं काल दुपारी मलिक यांना अटक केली. ईडीचे अधिकारी काल पहाटेच चौकशीसाठी नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर तयंना ईडी कार्यालयात नेण्यात आलं. दाऊद इब्राहिम, छोटा शकील, हसीना पारकर यांच्याशी मलिक कुटुंबीयांचे कथित संबंध, आणि एकूण चार मालमत्तांसंदर्भात आठ तास चौकशी केल्यानंतर मलिक यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना प्रथम जेजे रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आलं, आणि नंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.

या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मलिक यांनी, अटक झाली असली तरी आपण घाबरणार नाही. तसंच या विरोधात लढू आणि जिंकू असा विश्वास व्यक्त केला.

नवाब मलिक हे जाहीरपणे बाहेर बोलतात, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल, असं वाटतंच होतं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात कोणतं प्रकरण काढलं, याची माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं.

हा सत्तेचा दुरुपयोग करण्याचा आणखी एक प्रकार आहे, कोणतीही सूचना न देता राज्यातल्या मंत्र्यांना घेऊन जाणं ही नियमांची पायमल्ली असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या मलिकांना ज्या पद्धतीनं घरातून नेण्यात आलं, तो प्रकार म्हणजे राज्य सरकारला आव्हान दिलं असल्याची टीका, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

दरम्यान, ईडीच्या या कारवाईच्या विरोधात आज महाविकास आघाडीच्या वतीनं मुंबईत महात्मा गांधी स्मारक परिसरात निदर्शनं करणार असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितलं. मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेणार नसल्याचंही महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं.

भाजपनं मात्र मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मलिक यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही नैतिक आणि कायदेशीर अधिकार नसल्यानं, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

****

अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांची काल ठाणे पोलिसांनी आठ तास चौकशी केली. नवी मुंबईतल्या सद्गुरु बार परवाना प्रकरणी वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

****

राज्य सरकारी तसंच निमसरकारी कर्मचाऱ्यांनी नियोजित संप मागे घेत असल्याचं काल दुपारी जाहीर केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी परवा बैठक घेत, संप मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, किमान निवृत्ती वेतनामध्ये केंद्रासमान वाढ करावी, आदी प्रलंबित मागण्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील तसंच आर्थिक स्वरूपाच्या मागण्या २०२२ पर्यंत पूर्ण करण्यांचं आश्वासन पवार यांनी दिलं होतं.

****

मुंबई आणि राज्यातल्या सर्व दुकानांवर पाट्या या मराठी कराव्यात, या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका, मुंबई उच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली. तसंच याचिका करणाऱ्या संघटनेला २५ हजारांचा दंड आकारत दंडात्मक रक्कम आठवड्याभरात मुख्यमंत्री मदत निधीत जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यासह मुंबईतल्या सर्व दुकानांवरील नामफलक अथवा पाट्या मराठीत असाव्यात, हा राज्य सरकारचा निर्णय मनमानी असून, त्यामुळे दुकानदार आणि व्यापारी वर्गाच्या मुलभूत अधिकारांवर गदा येत असल्याचा दावा करत, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेटर्स संघटनेचे अध्यक्ष विरेन शहा यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासमोर काल सुनावणी पार पडली.

****

सर्व राज्यातल्या दहावी - बारावीच्या परिक्षा ऑफलाईनच होतील, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. न्यायमूर्ती ए एम खानवीलकर आणि न्यायमूर्ती जे के महेश्वरी यांच्या पीठानं ऑनलाईन परिक्षेसंदर्भात दाखल याचिका फेटाळून लावली. प्रत्यक्ष परिस्थितीची अधिकाऱ्यांना उत्तम जाण असते, आणि निर्णय घेण्यासहीत  समर्थ आहेत, त्यात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असं न्यायालयानं सांगितलं.

****

इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा पारदर्शकपणे व्हाव्यात आणि पेपर फुटीच्या घटना घडू नयेत, या उद्देशानं, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं, या वर्षापासून प्रश्नपत्रिकेचं प्रत्येक पाकीट विद्यार्थ्यांसमोर फोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच प्रत्येक पाकिटात केवळ २५ प्रश्नपत्रिकाच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

दरम्यान, पुणे- नाशिक महामार्गावर अहमदनगर जिल्ह्यात काल १०वी तसंच १२ वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग लागून सगळ्या प्रश्नपत्रिका जळाल्या. चंदनपुरी घाटात ही दुर्घटना झाली. पुणे मंडळाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले, त्यांच्यासमक्ष पंचनामा करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार १५१ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ६१ हजार ४६८ झाली आहे. काल २३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४३ हजार ६५६ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल दोन हजार ५९४ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख दोन हजार २१७ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९६ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ११ हजार ६०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात काल ओमायक्रॉन संसर्गाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

मराठवाड्यात काल ६० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात १६ नव्या रुग्णांची नोंद झाली. बीड १३, औरंगाबाद ११, नांदेड आठ, उस्मानाबाद सहा, हिंगोली चार, तर परभणी जिल्ह्यात दोन रुग्णांची नोंद झाली. जालना जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

बीड जिल्ह्यातील अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य गुन्हेगार डॉ. सुदाम मुंडे याला अंबाजोगाईच्या न्यायालयानं एकूण आठ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयानं मुंडे याला वैद्यकीय व्यवसाय न करण्याच्या अटीवर जामीन दिला होता, या आदेशाचं उल्लंघन करून त्याने व्यवसाय सुरू केला, तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केलेल्या मनाईच्या विरोधात जाऊन मुंडे यानं, शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. या गुन्ह्यात मुंडे हा दोषी ठरल्यानं, न्यायालयानं त्याला कलम ३५३ अन्वये चार वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंड, वैद्यकीय व्यवसाय कायद्याच्या कलम तेहतीस - दोन अन्वये तीन वर्षे शिक्षा आणि इंडियन मेडिकल कौन्सिल कायद्याच्या कलम १५-२ अन्वये एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

****

राज्य मराठी हौशी संगीत नाट्य स्पर्धेचं, ‘संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा असं नामकरण करण्यात आलं आहे. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येणारी राज्य हौशी मराठी संगीत नाट्य स्पर्धा, ही एक राज्यस्तरीय स्पर्धा आहे. या स्पर्धेस संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त हे नाव देण्यात आलं आहे.

नांदेड इथं येत्या २८ फेब्रुवारीपासून ६०व्या ‘हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेला सुरूवात होत आहे. राज्यात ही स्पर्धा १९ केंद्रांवर २१ फेब्रुवारीपासूनच सुरु झाली आहे. नांदेड, परभणी आणि बीड जिल्ह्यातल्या १५ नाट्य प्रयोगांचं सादरीकरण नांदेड शहरातल्या कुसुम सभागृहात येत्या सोमवारपासून दररोज सायंकाळी सात वाजता होणार आहे.

****

केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार राज्य सरकारनं ऊसाची किमान आधारभूत किंमत - एफआरपी दोन टप्प्यात अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल परभणी आणि जालना जिल्ह्यात आंदोलन करुन या निर्णयाची होळी करण्यात आली.

****


श्रावण बाळ, संजय गांधी निराधार, विधवा- परित्यक्त्या, अपंग लाभार्थींचं मंजुर असलेलं अनुदान बँक खात्यात जमा करण्यासाठी ३१९ महिलांनी परभणी जिल्ह्यात सेलू इथल्या तहसिल कार्यालयासमोर सोमवार पासून उपोषण सुरु केलं आहे. यातल्या दोन ज्येष्ठ महिलांची प्रकृती ढासळल्यानं त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

****

विज्ञान सप्ताहात काल औरंगाबाद इथं ज्येष्ठ विज्ञान प्रसारक डॉ. रंजन गर्गे यांचं व्याख्यान झालं. पाच हजार वर्षापासूनची अतिशय गौरवशाली आणि जागतिक दर्जाची भारतीय विज्ञान परंपरा, ही वैश्विक कल्याणाचा व्यापक विचार बाळगणारी असल्याचं, डॉ. गर्गे यांनी सांगितलं. त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत भारतीय विज्ञानातले महान संशोधक, आणि संशोधन संस्थांची वैशिष्ट्यपूर्ण माहिती, सर्व विद्यार्थ्यांना कथन केली. विवेकानंद महाविद्यालयात सुरू असलेल्या या कार्यक्रमात, प्राध्यापक के. एस. होसाळीकर यांनी हवामानशास्त्र आणि शास्त्रज्ञ या विषयावर सविस्तर माहिती दिली. तर दुपारच्या सत्रात विविध विषयांवरचे माहितीपट दाखवण्यात आले.

****

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मालिकेतला पहिला सामना आज लखनऊ इथल्या, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना सायंकाळी ७ वाजता सुरू होईल. टी-ट्वेंटी क्रमवारीत भारत दुसऱ्या तर श्रीलंका नवव्या क्रमांकावर आहे, यापुढील सामने २६ आणि २७ तारखेला खेळवले जाणार आहे.

****


परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध ईडीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ ईडीच्या मुंबई इथल्या कार्यालयासमोर परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आणि परभणी शहर महानगर पालिकेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली.

नांदेड शहर तसंच ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अटकेचा निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरनारे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी, कुटुंबातल्या महिलेला मारहाण केल्याप्रकरणी, भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षकांना एक निवेदन सादर करून, कारवाईची मागणी करण्यात आली. भाजपच्या कार्यक्रमात जाऊन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा सत्कार केल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आल्याचं सांगितलं जातं. या महिलेला न्याय मिळावा अन्यथा आंदोलनाचा इशारा भाजपनं दिला आहे.

****

 

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...