Friday, 25 February 2022

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 February 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 February 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ फेब्रुवारी २०२ सायंकाळी ६.१०

****  

कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. आम्ही सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.

****

** आर्थिक घडामोडींना चालना देण्यासाठी कोविड निर्बंध शिथील करण्याची गरज केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्याकडून व्यक्त

** उद्योजकता तसंच रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध  - केंद्रीय मंत्री नारायण राणे

** बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोळीबार; एक जण जखमी

** हिंगोली जिल्ह्यात दोन बालविवाह रोखण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश

आणि

** निरोगी जीवनशैलीचे मूळ पारंपारिक भारतीय आहारशास्त्रात असल्याचं आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचं प्रतिपादन

****

देशात आर्थिक घडामोडींना चालना देण्यासाठी कोविड निर्बंध शिथील करण्याची गरज केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी व्यक्त केली आहे. यासाठभ देशभरात सांस्कृतिक तसंच धार्मिक कार्यक्रम आणि सण उत्सव साजरे करण्यास परवानगी द्यावी, व्यावसायिक निर्बंध हटवावेत, रात्रीची संचारबंदी रद्द करावी, असं भल्ला यांनी राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. यासंदर्भातला निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक पातळीवर कोविड स्थितीचा आढावा घ्यावा तसंच कोविड प्रतिबंधक नियमांचं पुरेपूर पालन करावं, असंही भल्ला यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

उद्योजकता आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. ते आज सिंधुदूर्ग जिल्ह्यात ओरोस इथं एमएसएमई परिषदेच्या उद्घाटनपर सत्रात बोलत होते. महाराष्ट्रात, विशेषतः कोकणात रोजगार निर्मितीसाठी प्रचंड वाव आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्फूर्ती अर्थात पारंपारिक उद्योगांच्या पुनरुत्थानासाठी निधी पुरवठा योजना, मधु अभियान आणि कुंभार सशक्तीकरण योजनेची काटेकोर अंमलबजावणीची ग्वाही राणे यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एमएसएमई तंत्रज्ञान केंद्र स्थापन करणार असल्याची घोषणा राणे यांनी यावेळी केली. २०० कोटी रुपये खर्चून हे केंद्र उभारण्यात येणार आहे. राणे यांनी या प्रसंगी एमएसएमई रूपे कार्डची देखील सुरुवात केली. उपस्थित एमएसएमई उद्योजकांना या एमएसएमई रुपेच्या पहिल्या संचातल्या कार्डांच वितरण राणे यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

देश आत्मनिर्भर करण्यात संपूर्ण योगदान देण्याचा संकल्प करण्याचं आवाहन विद्यापीठांचे कुलपती आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचा ७१ वा दीक्षांत समारंभ काल पार पडला, त्यावेळी अध्यक्षीय भाषणातून राज्यपाल मार्गदर्शन करत होते. कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव यांनी विद्यापीठात कोरोना काळातील अध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कामाचं कौतुक करून विद्यापीठातल्या अनेक उपक्रमांची माहिती दिली.

****

शिक्षक पात्रता परीक्षा - टीईटी गैरप्रकाराच्या तपासात आतापर्यंत १ हजार ७७८ शिक्षक अपात्र असल्याचं निष्पन्न झालं आहे. हे सर्वजण अपात्र असूनही त्यांना पात्र ठरवल्याचं चौकशीतून समोर आलं आहे. या गुन्ह्यात आणखी बारा जणांचा सहभाग समोर आला असून, सायबर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

****

बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज गोळीबार होऊन एक जण जखमी झाला. नोंदणी कार्यालयात जमीन खरेदी-विक्रीच्या कारणावरून दोन गटात वाद झाले, त्यातूनच हा गोळीबार झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी अद्याप कोणासही अटक झालेली नाही

****

हिंगोली जिल्ह्यात दोन बालविवाह रोखण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आलं आहे. कळमनुरी तालुक्यातील बेलथर इथं होत असलेल्या या दोन बालविवाहांपैकी एका विवाहातले वधुवर तर एका विवाह सोहळ्यातली वधू अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली होती. बालविवाह प्रतिबंधक समिती आणि बाळापूर पोलिस या गावात पोहोचतात वऱ्हाडी मंडळी आणि वधू-वराचे नातेवाईक पसार झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज औरंगाबाद इथल्या क्रांती चौकात महाविकास आघाडीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले.

****

निरोगी जीवनशैलीचे मूळ पारंपारिक भारतीय आहारशास्त्रात असल्याचं प्रतिपादन आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं विवेकानंद महाविद्यालयात सुरू असलेल्या विज्ञान सप्ताहात डॉ दीक्षित बोलत होते. निरोगी जीवनासाठी दिवसभरातून फक्त दोन वेळा जेवण करणं उपयोगी आहे, हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी प्राचीन तसंच आधुनिक अशा दोन्ही संशोधनांचा दाखला दिला. दिल्ली इथल्या दीनदयाल संशोधन संस्थेचे डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना, प्राचीन काळातल्या समृद्ध आणि वातावरणाला अनुरुप जीवनशैलीपासून दूर गेल्यामुळे आज कॅन्सर आणि इतर अनेक आजार वाढत असल्याचं नमूद केलं.

या सप्ताहात आज दुपारच्या सत्रात वायू प्रदूषणाला पर्याय असणारी इलेक्ट्रिक वाहनं तसंच भारताच्या भू विज्ञान संशोधनाची प्रगती दाखवणाऱ्या माहितीपटांचं प्रसारण करण्यात आलं.

****

येत्या सोमवारी २८ फेब्रुवारीला सर्व शासकीय, निमशासकीय, आश्रम शाळा, खाजगी शाळा, महाविद्यायल आणि खाजगी शिकवणी वर्गांनी तंबाखूमुक्त शपथ घ्यावी, असे निर्देश नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तंबाखू मुक्तीसाठी विविध उपक्रमांचं आयोजन केलं असून, हा उपक्रमही त्याचाच भाग आहे. तंबाखूमुक्त शपथ घेतल्याचा अहवाल २ मार्च पर्यंत सादर करावा, अशी सूचना जिल्हा प्रशासनानं केली आहे.

****

परभणी रेल्वे स्थानकावरील माल धक्क्यावर उतरवलेल्या सार्वजनिक वितरण योजनेच्या धान्य साठ्याची डुकरांनी नासधूस केली आहे. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा करण्याकरता मालगाडीतून काल धान्याचा साठा दाखल झाला. मालगाडीतून थेट ट्रकद्वारे धान्याचा साठा गोदामांमध्ये हलवणं आवश्यक होतं, परंतू याकडे दुर्लक्ष झाल्याने ही नासाडी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने आज धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा इथं एका वाहनातून नेण्यात येणारा ३३५ किलो गांजा जप्त केला आहे. त्याची अदाजे किंमत ३० लाख २६ हजार ७९० रुपये इतकी आहे. याप्रकरणी तीन संशयीतांच्या विरुध्द दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

No comments: