आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२६ फेब्रुवारी २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
युद्धग्रस्त
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी चेर्नित्सीहून रोमानियाच्या
सीमेकडं रवाना झाल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. भारतीयांच्या
सुटकेसाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून, परराष्ट्र मंत्रालयाचं शिबीर कार्यालय
पश्चिम युक्रेनमधील एलव्हिव्ह आणि चेरनिव्हत्सी शहरांमध्ये कार्यरत झाले आहेत. या शहरांमध्ये
पोहोचलेल्या भारतीय नागरिकांना युक्रेनलगतच्या अन्य देशांच्या सीमा ओलांडून तिथं सुरक्षित
ठिकाणी पोहोचवण्यात येत आहे. युक्रेनमधल्या भारतीयांच्या सुटकेसाठीचा सर्व खर्च सरकार
करणार असल्याचंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.
****
स्वातंत्र्यवीर
विनायक दामोदर सावरकर यांचा आज स्मृतिदिन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावरकरांना
अभिवादन केलं आहे. वीर सावरकर हे त्याग आणि चिकाटीचे प्रतीक होते, त्यांनी आपलं आयुष्य
मातृभूमीसाठी समर्पित केलं, सावरकर हे देशवासियांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहतील,
असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
संरक्षण
साहित्य उत्पादन क्षेत्रातील देशांतर्गत उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने
वर्ष २०२२-२३ मध्ये आर्थिक तरतूद ६८ टक्क्यांपर्यंत वाढवली असून, संशोधनासाठी खासगी
संस्था, स्टार्टअप्स यांनाही प्रोत्साहन देण्यात येत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ
सिंह यांनी या वेबिनारमध्ये सांगितलं. या क्षेत्रात भारताचा ब्रँड निर्माण होण्यासाठी
आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादने भारतात तयार होण्याकरता कठोर चाचण्या तसंच परीक्षण
होणं आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं.
****
राज्याचे
अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ
काल औरंगाबाद इथल्या क्रांती चौकात महाविकास आघाडीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं.
नांदेड इथंही महाविकास आघाडीच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन
करण्यात आलं.
****
मराठवाड्यात
काल ३८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. परभणी दहा, लातूर आठ, औरंगाबाद सात, बीड सहा,
नांदेड चार, तर हिंगोली जिल्ह्यात तीन नव्या रुग्णांची नोंद झाली. जालना आणि उस्मानाबाद
जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नाही.
****
No comments:
Post a Comment