Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 February
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२५ फेब्रुवारी २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या
सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड
प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन
साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ
ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५
या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी
संपर्क करू शकता.
****
·
युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी
आणण्यावर भारताचा भर - पंतप्रधान नरेंद्र मोदी
·
रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे जगभरातल्या शेअर,
रोखे आणि कमोडिटी बाजारात मोठी घसरण
·
अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ
महाविकास आघाडीची निदर्शनं तर भारतीय जनता पक्षाची मलिकांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची
मागणी
·
राज्यात कोविड संसर्गाचे एक हजार १८२ नवे रुग्ण, मराठवाड्यात
दोन जणांचा मृत्यू तर ६८ बाधित
·
बारावी परिक्षेच्या पाच आणि सात मार्च रोजीच्या भाषा विषयांच्या
परीक्षा, आता पाच आणि सात एप्रिलला घेणार
आणि
·
पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा श्रीलंकेवर
६२ धावांनी विजय
****
युक्रेनमध्ये
अडकलेल्या सर्व भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यावर भारताचा भर असल्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर
पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत काल चर्चा केली,
त्यावेळी ते बोलत होते. नाटो सैन्य आणि रशियामध्ये असलेले मतभेद हे केवळ पारदर्शक संवादाच्या
माध्यमातून सुटू शकतात असं पंतप्रधान म्हणाले. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या
सुरक्षेबाबत पंतप्रधानांनी यावेळी चिंता व्यक्त केली.
दरम्यान,
रशियानं युक्रेनविरोधात लष्करी कारवाई सुरु केल्यानंतर तिथली हवाई सीमा बंद करण्यात
आली आहे. त्यामुळे युक्रेनमधे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणायला गेलेलं एअर इंडियाचं
विमान काल पुन्हा दिल्लीला परतलं. युक्रेनमधली परिस्थिती तणावपूर्ण असल्याच्या पार्श्वभूमीवर,
भारताचे युक्रेनमधले राजदूत पार्थ सत्पथी यांनी, तिथं अडकलेल्या नागरिकांनी संयम बाळगत
परिस्थितीचा सामना करावा, असं आवाहन केलं आहे. केयिव्ह इथलं भारताचं दुतावास कायम कार्यरत
राहील, अत्यावश्यक मदतीसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांकांवर दूरध्वनी करावा, अशा शब्दांत
त्यांनी तिथं अडकलेल्या भारतीयांना आश्वस्त केलं आहे. यासाठी युक्रेनमधल्या दुतावासानं,
अधिक ३८० - ९९ ७३ ०० ४२ ८, आणि ३८० - ९९ ७३ ०० ४८ ३ हे मदत क्रमांक उपलब्ध करून दिले
आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं देखील नागरिकांच्या मदतीसाठी, दिल्लीत नियंत्रण
कक्ष स्थापन केला आहे. याअंतर्गत नागरिकांना, १८ ०० ११ ८७ ९७, अधिक ९१ ११ २३ ०१ २१
१३, आणि अधिक ९१ ११ २३ ०१ ४१ ०४ हे मदत क्रमांक, तसंच situationroom@mea.gov.in हा
ईमेल आयडी उपलब्ध करून दिला आहे.
****
युद्धपरिस्थितीच्या
पार्श्वभूमीवर, युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांची सुरक्षा आणि त्यांच्या परतीच्या व्यवस्थेसाठी, परराष्ट्र
व्यवहार मंत्रालयाशी समन्वय साधण्याचे निर्देश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला
दिले आहेत. उद्योग, व्यवसाय तसंच शिक्षणानिमित्त अनेक महाराष्ट्रीयन युक्रेनमध्ये आहेत.
राज्याच्या मुख्य सचिवांनी केंद्र सरकारच्या माध्यमातूम या नागरिकांशी संपर्क ठेवावा,
विशेषतः विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
****
रशियानं
युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे जगभरातल्या शेअर, रोखे आणि कमोडिटी बाजारात काल मोठी
घसरण झाली. यामुळे देशातल्या शेअर बाजारातल्या गुंतवणुकदारांचं १० लाख कोटी रुपयांचं
नुकसान झालं. कच्च्या तेलाचे दर मात्र तेजीत आहेत. देशातले शेअर बाजार काल सात महिन्यातल्या
निचांकी पातळीवर पोहोचले. बाजार बंद झाले, तेव्हा सेन्सेक्स तब्बल दोन हजार ७०२ अंकांनी
कोसळून, ५४ हजार ५३० अंकांवर बंद झाला होता. निफ्टीनंही ८१५ अंकांची घसरण नोंदवली आणि
१६ हजार २४८ अंकांवर बंद झाला. कच्च्या तेलाचे दर मात्र सात वर्षातल्या उच्चांकी पातळीवर
पोहोचले. लंडनच्या बाजारात २०१४ नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलानं १०५ डॉलर प्रति बॅरलची
पातळी ओलांडली होती.
****
यंदा
भारताच्या आर्थिक वाढीबाबत मूडीज या अमेरिकी पत मानांकन संस्थेनं आपला अंदाज सात टक्क्यावरुन
साडे नऊ टक्के केला आहे. २०२० मध्ये देशभर लागू केलेली टाळेबंदी आणि गेल्या वर्षी आलेल्या
कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर, अपेक्षेपेक्षा अधिक सुदृढ आर्थिक सुधारणाचा दाखला देत,
मुडीजनं, भारताच्या आर्थिक वाढीबाबत आपल्या अंदाजात दुरुस्ती केली आहे. पुढच्या वर्षीसाठीचा
अंदाज मात्र साडेपाच टक्केच कायम ठेवला आहे.
****
अल्पसंख्याक
विकास मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं मंत्री,
खासदार, आमदारांनी मुंबईत मंत्रालयातल्या महात्मा गांधी स्मारक परिसरात काल निदर्शनं
केली. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड इथंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी
मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ निदर्शनं केली. दरम्यान, भारतीय जनता पक्षातर्फे मलिक
यांच्या राजिनाम्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर तसंच खुलताबाद, सिल्लोड, नांदेड, परभणी इथं निदर्शनं करण्यात आली. भारतीय
जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार अतुल सावे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद
घेऊन मलिक यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली.
****
राज्यात
काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार १८२ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ६२ हजार ६५० झाली आहे. काल १९ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४३ हजार
६७५ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल दोन हजार ५१६ रुग्ण बरे
झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख चार हजार ७३३ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९९ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या
१० हजार २५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल ६८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. तर औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी
एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हिंगोली
जिल्ह्यात २२ नव्या रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद १२, उस्मानाबाद नऊ, लातूर आणि परभणी
जिल्ह्यात प्रत्येकी आठ, बीड पाच, नांदेड तीन, तर जालना जिल्ह्यात एक रुग्ण आढळला.
****
राज्य
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं बारावी परिक्षेच्या वेळापत्रकात किंचित
बदल केला आहे. बारावीच्या पाच आणि सात मार्च या दिवशी होणार असलेल्या भाषा विषयांच्या
परीक्षा, पाच एप्रिल आणि सात एप्रिलला घेण्यात येतील, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा
गायकवाड यांनी म्हटलं आहे. नव्या वेळापत्रकानुसार पाच मार्चची हिंदी तसंच जर्मन, जपानी,
चिनी, पर्शियन या विषयांची परीक्षा, आता पाच एप्रिलला नियोजित वेळेत होईल. सात मार्चला
नियोजित असलेली मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, अरेबिक, मल्याळम, तमिळ, तेलुगु, पंजाबी,
बंगाली आणि उर्दू, फ्रेंच, स्पॅनिश आणि पाली या विषयांची परीक्षा, आता सात एप्रिलला
नियोजित वेळेत होईल. याव्यतिरिक्त इतर परिक्षांच्या तारखा तसंच वेळांमध्ये कोणताही
बदल करण्यात आलेला नाही.
****
नांदेड,
जालना, पुणे आणि गडचिरोली इथं जिल्हा रुग्णालयांत हृदयरोगा संबंधित उपचारांसाठी अत्याधुनिक
प्रयोगशाळा स्थापन करण्याकरता, कामाचं अंदाजपत्रक आणि आराखड्यांना प्रशासकीय मान्यता
काल देण्यात आली. याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. याकरता ३२ कोटी २३ लाख
वीस हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या चारही रुग्णालयांत, स्थापत्यविषयक कामकाज
करण्यासाठी सहा कोटी, आणि यंत्रसामग्री आणि साहित्य खरेदीसाठी, २६ कोटी २३ लाख आणि
वीस हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या नळदुर्ग शहरात `प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत`, सार्वजनिक - खाजगी भागीदारी
तत्वावर एक हजार घरकुल उभारण्यासाठी प्राथमिक कार्यवाही करण्याच्या सूचना, आमदार राणाजगजितसिंह
पाटील यांनी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांना दिल्या आहेत. जनता दरबारादरम्यान
त्यांनी ही सूचना केली. शहराच्या पाणी पुरवठ्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. शहरात
अर्धवट राहिलेल्या विकास कामांची पाहणी करून, या कामांना नियमानुसार मुदतवाढ देत ते
तातडीनं करण्याबाबतही, पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना
सूचना केल्या.
****
हिंगोली
जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं श्री नागनाथ मंदिराची महाशिवरात्रीची यात्रा कोविड संसर्गाच्या
पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काल यासंदर्भातले
आदेश जारी केले आहेत. भाविकांना दर्शनासाठी मंदिर उघडं ठेवणार असल्याचं संस्थानच्या
वतीनं कळवण्यात आलं आहे.
****
लखनौ
इथं झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेवर ६२ धावांनी विजय
मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतानं निर्धारित षटकात १९९ धावा करत, श्रीलंका संघासमोर
२०० धावांचं लक्ष्य ठेवलं. हे लक्ष्य गाठताना श्रीलंकेचा संघ २० षटकात सहा बाद १३७
धावाच करु शकला. भुवनेश्वर कुमार आणि व्यंकटेश अय्यरनं प्रत्येकी दोन, यजुवेंद्र चहल
आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. १० चौकार आणि तीन षटकारांसह ८९
धावा करणारा इशान किशन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयाबरोबरच भारतानं तीन
सामन्यांच्या मालिकेत एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे.
****
औरंगाबाद
शहरातल्या चिकलठाणा परिसरातल्या एका गावात काल होणारा बालविवाह, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे
टळला. अल्पवयीन मुलीच्या पालकांचं यावेळी समुपदेशन करण्यात आलं. चिकलठाणा पोलीस ठाण्याचे
कर्मचारी, बालविकास अधिकारी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच यांच्या सतर्कतेमुळे,
हा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं.
****
No comments:
Post a Comment