Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 23 February 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ फेब्रुवारी २०२२ सायंकाळी
६.१०
****
कोरोना
विषाणूचं ओमायक्रॉन हे नवं रूप चिंताजनक आहे. आम्ही सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि
१५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं
आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा,
दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि
मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क
करा.
****
·
राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून
अटक.
·
दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये पारदर्शकपणासाठी प्रश्नपत्रिकेचं
प्रत्येक पाकीट विद्यार्थ्यांसमोर फोडण्याचा मंडळाचा निर्णय.
·
राज्य सरकारी तसंच निमसरकारी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी
पुकारलेला संप मागे.
·
आणि
·
जागतिक दर्जाच्या भारतीय विज्ञान परंपरेत वैश्विक कल्याणाचा
व्यापक विचार - विज्ञान सप्ताहात डॉ रंजन गर्गे यांचं मत.
****
राज्याचे
अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना सक्तवसुली
संचालनालय - ईडीने आज दुपारी अटक केली. ईडीचे अधिकारी आज पहाटेच चौकशीसाठी नवाब मलिक
यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर मलिक यांना ईडी कार्यालयात नेण्यात आलं. दाऊद इब्राहिम,
छोटा शकील, हसीना पारकर यांच्याशी मलिक कुटुंबीयांचे संबंध आणि एकूण चार मालमत्तांसंदर्भात
आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना प्रथम जेजे रुग्णालयात
वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आलं, त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आहे.
या
संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मलिक यांनी, अटक झाली असली तरी आपण घाबरणार नाही.
तसंच या विरोधात लढू आणि जिंकू असा विश्वास व्यक्त केला
हा
सत्तेचा दुरुपयोग करण्याचा आणखी प्रकार आहे, कोणतीही सूचना न देता राज्यातल्या मंत्र्यांना
घेऊन जाणं ही नियमांची पायमल्ली असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत
पाटील यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या मलिकांना ज्या पद्धतीनं
घरातून नेण्यात आलं, तो प्रकार म्हणजे राज्य सरकारला आव्हान दिलं असल्याची टीका शिवसेना
नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
****
इयत्ता
दहावी-बारावीच्या परीक्षा पारदर्शकपणे व्हाव्यात आणि पेपर फुटीच्या घटना घडू नयेत,
या उद्देशाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं या वर्षापासून
प्रश्नपत्रिकेचं प्रत्येक पाकीट विद्यार्थ्यांसमोर फोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच
प्रत्येक पाकिटात केवळ २५ प्रश्नपत्रिकाच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मंडळाच्या
अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मंडळातर्फे येत्या मार्च-एप्रिलमध्ये इयत्ता दहावी-बारावीच्या
लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यंदा परीक्षा केंद्रांची संख्या वाढल्यामुळे मुख्य
परीक्षा केंद्रातून उपपरीक्षा केंद्रांपर्यंत प्रश्नपत्रिकांची पाकिटे पोहोचवताना ती
फोडली जाऊ नये, यामुळे ही खबरदारी घेण्यात येत असल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान,
पुणे नाशिक महामार्गावर अहमदनगर जिल्ह्यात आज १०वी तसंच १२ वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन
जाणाऱ्या टेम्पोला आग लागून सगळ्या प्रश्नपत्रिका जळाल्या. चंदनपुरी घाटात ही दुर्घटना
झाली. पुणे मंडळाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले, त्यांच्यासमक्ष पंचनामा करण्यात
आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
थोर
समाज सुधारक संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केलं आहे.
महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र इथंही संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात
आली.
औरंगाबाद महानगरपालिका तसंच
परभणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात गाडगेबाबांना अभिवादन करण्यात आलं.
बीड
जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा पुरवठा अधिकारी
ओंकार देशमुख, यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
हिंगोली
इथं निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
राज्य
सरकारी तसंच निमसरकारी कर्मचाऱ्यांनी आज आणि उद्याचा संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं
आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संप मागे घेण्याचं आवाहन काल केलं होतं. समन्वय
समितीच्या घटक संघटनांच्या मुख्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आज दुपारी हा निर्णय घेण्यात
आला. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, किमान निवृत्ती वेतनामध्ये
केंद्रासमान वाढ करावी, आदी प्रलंबित मागण्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील तसंच आर्थिक
स्वरूपाच्या मागण्या २०२२ पर्यंत पूर्ण करण्यांचं आश्वासन पवार यांनी दिलं होतं.
****
मुस्लिम
मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे नियोजित १३ वं अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य
संमेलन काही अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आलं आहे. २५, २६ आणि २७ मार्च रोजी हे
संमेलन नाशिक इथं घेण्यात येणार होतं. या संमेलनाचे स्थळ आणि तारीख मंडळाच्या मार्च
महिन्यात होणाऱ्या बैठकीनंतर जाहीर करण्यात येईल, असं साहित्यिक डॉ. शेख इक्बाल मिन्ने
यांनी कळवलं आहे.
****
विदर्भ
पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात संतनगरी शेगाव इथं संत गजानन महाराजांचा
१४४वा प्रकट दिन उत्सव आज साध्या पध्दतीनं साजरा करण्यात आला. पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत
श्रींचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर पाच वाजेपासून ५०० दर्शन पास धारकांसाठी दर्शनाची
सोय करण्यात आली होती. मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत संत गजानन महाराजांच्या पालखीची
मंदिराभोवती परिक्रमा पार पडली. शासनाच्या सर्व नियम आणि अटींचे पालन करून भक्तांनी
संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. औरंगाबादसह विविध ठिकाणी यानिमित्तानं
अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
विज्ञान
सप्ताहात आज औरंगाबाद इथं ज्येष्ठ विज्ञान प्रसारक डॉ.रंजन गर्गे यांचं व्याख्यान झालं.
पाच हजार वर्षापासूनची अतिशय गौरवशाली आणि जागतिक दर्जाची भारतीय विज्ञान परंपरा ही
वैश्विक कल्याणाचा व्यापक विचार बाळगणारी असल्याचं डॉ. गर्गे यांनी सांगितलं. त्यांनी
अत्यंत सोप्या भाषेत भारतीय विज्ञानातले महान संशोधक आणि संशोधन संस्थांची वैशिष्ट्यपूर्ण
माहिती सर्व विद्यार्थ्यांना कथन केली. विवेकानंद महाविद्यालयात सुरू असलेल्या या कार्यक्रमात
प्रा. के. एस. होसाळीकर यांनी हवामानशास्त्र आणि शास्त्रज्ञ या विषयावर सविस्तर माहिती
दिली. तर दुपारच्या सत्रात विविध विषयांवरचे माहितीपट दाखवण्यात आले. इथं भरलेल्या
ग्रंथप्रदर्शन, सायन्स ऑन व्हील, मायक्रोबीअल सफारी इत्यादी उपक्रमांना विद्यार्थी,
पालक तसंच नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
****
परभणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीनं सेवा
ज्येष्ठते नुसार पात्र असलेल्या ७१ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, उपाध्यक्ष अजय चौधरी, शिक्षण सभापती
अंजली अनेराव यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. या बदल्यांच्या माध्यमातून
संबंधित प्राथमिक शिक्षक हे पदोन्नतीने उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणार
आहेत.
****
लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज
बी.पी. यांनी लातूर जिल्ह्यातल्या तूर पीक विमा धारक शेतकऱ्यांना २५ टक्के विमा नुकसान
भरपाई आगाऊ स्वरूपात देण्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. जिल्ह्यातल्या ६० महसूल
मंडळांसाठी ३९ कोटी १७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी स्थानिक नैसर्गिक
आपत्ती अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे, ती रक्कम समयोजित करून
एक लाख ३९ हजार ९६५ शेतकऱ्यांना आतापर्यंत २० कोटी ४८ लाख रुपये वाटप करण्यात आल्याचं,
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment