Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 February 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ फेब्रुवारी २०२२ दुपारी १.०० वा.
****
ग्रामीण
भागातल्या लोकांना नवीन तंत्रज्ञान आणि शेतीच्या नवीन पद्धतींबद्दल शिक्षित करून, ग्रामीण
भारताची नवीन प्रतिमा रेखाटण्याची गरज असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. ग्रामीण भागासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात असलेल्या तरतुदींविषयी आयोजित वेबिनारमध्ये
ते आज बोलत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण क्षेत्र, ईशान्य भारत आणि आकांक्षित
जिल्ह्यांच्या विकासासाठी विशेष तरतुद करण्यात आली असून, प्रधानमंत्री आवास योजना,
ग्रामीण सडक योजना आणि जल जीवन मिशन यांसारख्या विविध योजना राबवण्यासाठी योग्य दिशा
ठरवण्यात आल्याचं पंतप्रधान म्हणाले. ब्रॉडबँड जोडणीमुळे खेड्यांमध्ये केवळ सुविधा
उपलब्ध होणार नाहीत, तर खेड्यांमध्ये कुशल तरुणांचा मोठा समूह तयार करण्यातही मदत होईल.
सीमावर्ती गावांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात जाहीर केलेला व्हायब्रंट ग्राम कार्यक्रम
अत्यंत महत्त्वाचा आहे, असं ते म्हणाले. नारी शक्ती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रमुख
आधारस्तंभ असून, बचत गटांच्या माध्यमातून महिलांचा सहभाग अधिक वाढवण्याची गरज पंतप्रधानांनी
यावेळी व्यक्त केली.
****
उत्तर
प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात नऊ
जिल्ह्यांतल्या ५९ विधानसभा जागांवर एकूण ६३४ उमेदवार रिंगणात आहेत. ११ वाजेपर्यंत
२२ पूर्णांक ६२ टक्के मतदान झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्याचे
अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची सक्तवसुली
संचालनालयाकडून आज चौकशी सुरु आहे. पहाटेच ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घऱी पोहोचले
होते. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आलं. एका जमिनीच्या व्यवहारासंबंधी
ही चौकशी सुरु आहे.
हा
सत्तेचा दुरुपयोग करण्याचा आणखी प्रकार आहे, कोणतीही सूचना न देता राज्यातल्या मंत्र्यांना
घेऊन जाणं ही नियमांची पायमल्ली असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत
पाटील म्हटलं आहे.
****
थोर
समाज सुधारक संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.
हिंगोली इथं निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
शासकीय
कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्त योजनेसाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचं अर्थ राज्यमंत्री
शंभूराज देसाई यांनी सांगितलं. राज्य शासनाच्या सेवेत वर्ष २००५ रोजी किंवा त्यानंतर
नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतल्या
त्रुटीचा अभ्यास करण्यासाठी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या अभ्यास गटासोबत
कर्मचारी संघटनेची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र शासनाच्या सेवानिवृत्ती
योजनाप्रमाणे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनाही योजना लागू करण्यासंदर्भात अभ्यासगटाद्वारे
साकल्यानं विचार करून शासनाला शिफारस केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२२ - २३ या आर्थिक वर्षासाठी मंजुर केलेल्या निधीत आणखी
पाच कोटी रुपयांची वाढ करुन तो ३०० कोटी रुपये करण्यात आला आहे. याबाबतचं पत्र नियोजन
विभागानं जिल्हा प्रशासनाला पाठवलं आहे. गेल्या महिन्यात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत
अर्थमंत्री अजित पवार यांनी जिल्हासाठी २९५ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर केला होता.
त्यावेळी आकांक्षित जिल्हा म्हणून उस्मानाबादचा निधी वाढवावा, अशी विनंती पालकमंत्री
शंकरराव गडाख यांनी केली होती. त्यानुसार हा निधी वाढवण्यात आला आहे.
****
राज्यातल्या
सर्व जिल्ह्यात येत्या रविवारी, २७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवली
जाणार आहे. आरोग्य सेवा आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी यांसंदर्भात झालेल्या बैठकीत
ही माहिती दिली. यावर्षीच्या मोहिमेत एक कोटी पंधरा लाख मुलांना पल्स पोलिओचा डोस देण्याचं
नियोजन करण्यात आलं असल्याचं त्यानी सांगितलं.
****
उस्मानाबाद
जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात आवश्यकतेनुसार कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचं
आयोजन करावं, शाळा, महाविद्यालयांमधल्या १५ ते १८ वयोगटातल्या विद्यार्थ्यांच्या जास्तीत
जास्त लसीकरणासाठी त्यांना प्रेरित करून लसीकरण पूर्ण करावं, असे निर्देश जिल्हाधिकारी
कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. यापुढे
महामारीपासून संरक्षणासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्यानं, लॉकडाऊन टाळायचं असल्यास
ज्यांनी अद्याप लस घेतली नाही त्यांना आणि दुसरी मात्रा देय असणाऱ्या सर्व पात्र नागरिकांचं
लसीकरण करून घ्यावं, असं जिल्हाधिकारी म्हणाले.
****
No comments:
Post a Comment