Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 24 April 2022
Time
7.10 AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ एप्रिल २०२२ सकाळी ७.१० मि.
****
·
पहिला लता दीनानाथ मंगेशकर
पुरस्कार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईत प्रदान करण्यात येणार
·
'केबल
टेलिव्हिजन नेटवर्क नियमन कायद्या'चं
पालन करण्याचं सर्व खाजगी दूरचित्रवाणी
वाहिन्यांना सरकारचं आवाहन
·
सत्ताधारी शिवसेनेच्या
दहशतीमुळे राज्यात अराजकाची स्थिती निर्माण झाल्याचा भारतीय जनता पक्षाचा आरोप
·
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा
इशारा देणाऱ्या राणा दाम्पत्याला अटक
·
उदगीर इथं सुरु असलेल्या
९५वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप
·
राज्यात १९४ तर मराठवाड्यात पाच नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण
·
पाच हजार ५६९ कोटी रुपयांच्या
सात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं आज औरंगाबादमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते
लोकार्पण आणि भूमिपूजन
आणि
·
बीड जिल्ह्यात लातूर-अंबाजोगाई महामार्गावर झालेल्या
अपघातात आठ जणांचा मृत्यू
****
पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईत
प्रदान करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता हा समारंभ होणार आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ सुरु करण्यात आलेला हा
पुरस्कार राष्ट्र उभारणीमध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या एका व्यक्तीला हा पुरस्कार या वर्षीय पासून दिला जाणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या
मालिकेचा हा ८८ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी
११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
देशातल्या सर्व खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांनी 'केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियमन कायद्या'चं पालन करावं, अशी
सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक
उपग्रह वाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये भडक, सनसनाटी, भ्रामक, तसंच दिशाभूल करणारी वादग्रस्त वक्तव्य यांचं प्रमाण वाढलं
आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विशेषतः
रशिया-युक्रेन युद्ध आणि दिल्लीत झालेल्या घटनांचं वार्तांकन करताना विहित
संहितेचं उल्लंघन झाल्याचं या सूचनांमध्ये म्हटलं आहे. कोणत्याही कार्यक्रमातून
सामाजिक धार्मिक शांतता बिघडणार नाही, याची दक्षता घ्यावी असे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत.
****
सत्ताधारी शिवसेनेच्या दहशतीमुळे राज्यात अराजकाची स्थिती निर्माण झाल्याचा
आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा, आमदार आशिष शेलार, भाजपा मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी
बोलतांना केला.
ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी आंदोलकांना तातडीने
पकडण्यात आलं, मात्र भाजपच्या पोलखोल
यात्रेवरचा हल्ला, भाजप
कार्यकर्ते मोहित कंभोज यांच्या वाहनावर तसंच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी
राणा यांच्या घरावर हल्ला करणारे मात्र मोकाट आहेत, हल्लेखोरांना वेगळा न्याय का असा सवालही या पत्रकार परिषदेतून करण्यात आला.
****
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या
निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा इशारा देणाऱ्या राणा दाम्पत्याला त्यांच्या
मुंबईत खार इथल्या राहत्या घरातून पोलिसांनी काल सायंकाळी अटक केली. कायदा आणि
सुव्यवस्था राखण्यासाठी ही अटक केल्याचं गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी
वार्ताहरांना सांगितलं. शिवसैनिकांनी काल राणा यांच्या घराबाहेर निदर्शने केली
तसंच बॅरिकेड तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला, या पार्श्वभूमीवर राणा यांच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे, तसंच उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास स्थानाभोवतालची
सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.
****
राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे, मात्र ती अस्थिर असल्याचं भासवून राज्याची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरु
आहे, असं गृहमंत्री दिलीप वळसे
पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एखाद्या ठिकाणी
अनुचित घटना घडल्यास त्यावरून संपूर्ण राज्यात कायदा सुव्यवस्था नाही, असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे, असं ते म्हणाले. सामाजिक तेढ निर्माण करणं आणि कायद्याच्या विरोधात वर्तन
करण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस योग्य ती कारवाई करतील असं ते म्हणाले.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर इथं सुरु असलेल्या ९५वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलनाचा आज केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत समारोप होत आहे. या संमेलनात काल दुसऱ्या दिवशी
प्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली बालकुमार मेळावा पार पडला. या मेळाव्यात लक्ष्मीबाई टिळक, शांताबाई शेळके, सिंधूताई सपकाळ, बालकवीं, पु.
ल. देशपांडे आदी मान्यवरांच्या वेशभूषेतली मुलं सर्वाचं लक्ष वेधून घेत होते. “संवाद- आजच्या कादंबरीकारांशी”,
“प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता आज शून्यावर येऊन ठेपली आहे”, मराठी साहित्यात निसर्ग चित्रणच आहे, पर्यावरण नाही” या विषयावर परिसंवाद, आणि अन्य कार्यक्रम काल पार पडले. मुलांच्या मोबाईल वेडाला पालकच जबाबदार
असल्याचं मत बालसाहित्यिक आबा महाजन यांनी संमेलनात
घेण्यात आलेल्या मुलाखतीत व्यक्त
केलं.
दरम्यान, महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांचा
कार्यकाळ संपल्यामुळे मुंबई साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा उषा तांबे यांनी काल साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा
कार्यभार स्वीकारला.
या साहित्य संमेलनात माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचं दालन उभारण्यात आलं
आहे. या दालनात महासंचालनालयाची विविध प्रकाशनं उपलब्ध आहेत.
सोळाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनालाही काल उदगिर इथं सुरूवात झाली. गणेश विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली सुरू
झालेल्या संमेलनात काल विचार फेरी काढण्यात आली. त्यानंतर सनातनवाद आणि लिंगायत
वचन साहित्यातील विद्रोह या विषयावर परिसंवाद, आदीवासी नृत्य, महात्मा
फुले यांच्या सत्याचा अखंडचे सामुदायिक गायन, संत कबिर यांचे दोहा गायन, पावरी
वादन हे कार्यक्रम घेण्यात आले.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १९४ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७६ हजार ६९७ झाली आहे. या संसर्गानं काल एका
रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची
संख्या एक लाख ४७ हजार ८३२ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल १४१ रुग्ण बरे झाले, आतापर्यंत ७७ लाख २७ हजार ९९६ रुग्ण या संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८
पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ८६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल पाच कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद
जिल्ह्यात तीन तर नांदेड बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
जालना, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद
आणि परभणी जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज
औरंगाबाद इथं पाच हजार ५६९ कोटी रुपयांच्या आणि दोनशे किलोमीटर लांबीच्या सात
राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे. यामध्ये सोलापूर
- धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आणि पैठण - औरंगाबाद
रस्त्याच्या चौपदरीकरण कामाचा समावेश आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत
कराड यांनी काल ही माहिती दिली. शहरातल्या बीड बायपास जवळील जबिंदा लॉन्स इथं
सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
****
बीड जिल्ह्यातील लातूर-अंबाजोगाई महामार्गावर रस्ता अपघातात आठ जणांचा मृत्यू
तर नऊ जण जखमी झाले. काल सकाळी
सायगाव जवळ हा अपघात झाला. लातूर जिल्ह्यातील आर्वी इथलं एक कुटुंब अंबाजोगाई
तालुक्यातील राडी इथं घरगुती कार्यक्रमासाठी जात असतांना समोरुन येणाऱ्या ट्रकनं
जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. मृतांमध्ये सहा महिलांसह चालकाचा समावेश आहे. जखमींना अंबाजोगाई इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल
करण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सविस्तर माहिती
घेऊन जखमीवर तातडीने आवश्यक ते उपचार करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
दरम्यान, याच ठिकाणी यापूर्वी बस आणि
ट्रक चा देखील भीषण अपघात झाला होता, त्यामुळे या मार्गावर अधिक खबरदारीची उपाय योजना करावी अशी मागणी नागरिकांनी
केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नागपूर -मुंबई राष्ट्रीय महामार्गावर बुलडाणा जिल्ह्यातील खंडाळा देवी गावाजवळ
काल सकाळी झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत. खाजगी बस
आणि एक चारचाकी वाहन यांच्यात समोरासमोर धडक होवून हा अपघात झाला. चारचाकी गाडी ही
चाळीसगाव इथली असून त्यातील प्रवासी डिग्रस इथं जात होते तर खाजगी बस नागपूर हून
पुण्याला जात होती.
****
मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी कारवायांना निधी पुरवल्या प्रकरणी मुंबईतल्या
विशेष न्यायालयानं मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत सहा मे पर्यंत वाढ
केली आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनाल - ईडीनं गुरुवारी मलिक यांच्याविरोधात
आरोपपत्र दाखल केलं. काळा पैसा वैध केल्याच्या आरोपावरून ईडीनं २३ फेब्रुवारीला
मालिक यांना अटक केली आहे.
****
महा आवास अभियानांतर्गत २०२०-२१ या कालावधीत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री
आवास योजना आणि इतर राज्य पुरस्कृत विविध आवास योजनेमध्ये उत्कृष्ट कामगिरी
केल्याबद्दल नांदेड जिल्हा परिषदेला तीन पुरस्कार मिळाले आहेत. ग्राम विकास
मंत्रालयाने या पुरस्कारांची घोषणा केली. मुंबईत या पुरस्कारांचं वितरण केलं
जाणार आहे. या अभियान कालावधीत राबवण्यात आलेल्या उपक्रमात घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे
मंजूरी देणे या उपक्रमात व्दितीय क्रमांक, मुलभूत नागरी सुविधा देवून आदर्श घरांची निर्मिती या उपक्रमात तृतीय तर
लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी वित्तीय संस्थांचे कर्ज मिळवून देण्यासाठी
जिल्हा परिषदेला व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
****
आपल्याला चारही बाजूने शत्रू घेरतील अशी भीती वाटल्यानं, रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं, असं आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या ज्येष्ठ अभ्यासक
आणि मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. उत्तरा सहस्रबुद्धे
यांनी म्हटलं आहे. काल नांदेड इथं 'नरहर
कुरूंदकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्राच्या वतीने रशिया-युक्रेन युद्ध:
शीतयुद्ध आणि अलिप्ततावादाचे पुनरागमन या विषयावरील व्याखानात त्या बोलत होत्या.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे खलनायक असल्याचं माध्यमं भासवत असून
याकडे भारतीयांनी आपल्या दृष्टिकोनातून पहायला हवं असं त्या यावेळी म्हणाल्या.
****
परभणी जिल्हा महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा २०२२ चं आज जिल्हाधिकारी
आंचल गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आज या स्पर्धेचा समारोप होणार आहे.
****
मराठवाड्यात
आज ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची
शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नांदेड, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात काल मध्यरात्री
हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment