Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 25 August 2022
Time
7.10 AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· मुंबईत विधान भवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की,
शिवीगाळ केल्याचाही आरोप
· राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्यात येणार
· नांदेडचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार डॉ. केशवराव धोंडगे यांच्या
शतकपूर्तीनिमित्त विधानभवनात गौरव
· शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भात
दाखल केलेल्या याचिकांवरच्या आजच्या सुनावणीबाबत अस्पष्टता
· मुंबईतील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये अडोतीस कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी सुजित
पाटकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
· मराठी भाषेतल्या बाल साहित्यासाठी संगीता बर्वे यांच्या ‘पियुची वही’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा
पुरस्कार जाहीर
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार ९१३ रुग्ण, मराठवाड्यात ४९ बाधित
आणि
· नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार बापूसाहेब देशमुख
गोरठेकर यांचं निधन
****
सविस्तर बातम्या
विधान भवन परिसरात काल सत्ताधारी तसंच विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की
झाली. विधानभवनाच्या पायर्रांवर सत्ताधारी शिंदे गटातले आणि महाविकास आघाडीचे आमदार
घोषणा देत आमनेसामने उभे राहीले. त्यावेळी या दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की झाली. विरोधी
पक्षाचे लोक रोज आमच्या विरोधात घोषणाबाजी करत असतात, आज आम्ही घोषणाबाजी केली तर त्यांनी
धक्काबुक्की केल्याचं, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं, तर, सत्ताधारी
पक्ष सदनात आमचा आवाज उमटू देत नाही आणि सदनाच्या बाहेरही आमचा आवाज बंद करतो, असा
आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांनी केला. यावेळी एका आमदाराने शिवीगाळ
केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्याकडे केली आहे.
या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपापल्या
पक्षाच्या आमदारांना शांत करत सभागृहात घेऊन गेले.
****
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांना धक्काबुक्की होणं हे दुर्दैवी असून, हे
चित्र पाहिल्यानंतर शेतकरी आणि जनतेचा अपेक्षाभंग होईल, असं काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते
बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. आंदोलन करणं हा विरोधी पक्षांचा अधिकारच आहे, पण
आता सत्ताधारीच आंदोलन करत आहेत. सत्ताधारी पक्षाने जबाबदारीने वागलं पाहिजे, असंही
थोरात यांनी नमूद केलं.
****
राज्यात कुटुंब न्यायालयांच्या संख्येत आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येईल, असं
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं.
पाच वर्षांच्या कालावधीसाठी स्थापन करण्यात आलेल्या, लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद,
परभणी, आदी ठिकाणची प्रत्येकी एक, याप्रमाणे एकूण चौदा कुटुंब न्यायालयं कायमस्वरूपी
सुरू ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आल्याची माहिती, फडणवीस यांनी दिली.
****
राज्यातल्या गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात
आले आहेत. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत एका लक्षवेधी
सूचनेस उत्तर देताना ही माहिती दिली. पोलीस दलात मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन
लवकरच आणखी सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या
सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. एका अधिकाऱ्यांस एकाच पदावर अथवा शहरात जास्त
काळ नियुक्ती दिली जाऊ नये, याबाबत दक्षता घेतली जाईल, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
****
मराठवाड्यातल्या वीज वितरण यंत्रणेतल्या फिडर सेपरेशनचं काम प्राधान्यानं ठराविक
कालावधीत पूर्ण करणार असल्याची माहिती, फडणवीस यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात
दिली. लातूर जिल्ह्यात सिंगल फेज रोहित्र दुरूस्त करून अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी
विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
मौजे सकनेवाडी शिवारात उच्चदाब वाहिनीच्या विद्युत खांबाचा ताण तुटून खांब पडल्याची
घटना घडली आहे. यासंदर्भात तत्काळ वस्तुस्थिती तपासून कारवाई करण्यात येणार असल्याचं,
त्यांनी जाहीर केलं.
लातूर विमानतळाच्या विकासाबाबत लवकरच सगळ्या संबंधितांची बैठक घेतली जाईल आणि
तोडगा काढला जाईल असं मंत्री दीपक केसरकर यांनी, याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना
सांगितलं.
****
राज्यात धर्मांतरबंदी कायदा अस्तित्वात आहे, त्यात काही त्रुटी असतील तर त्या
दूर करू, असं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांनी दिलं आहे. सदस्य नितेश राणे
यांनी मांडलेल्या एका लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार
यांनीही चर्चेत भाग घेतला होता.
महाराष्ट्र सदन घोटाळ्यात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या दोषमुक्तीच्या, कनिष्ठ
न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात, वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याच्या विधि आणि
न्याय विभागाच्या निर्णयाला, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अधिकारात
स्थगिती दिल्याची माहिती, फडणवीस यांनी दिली. हे प्रकरण पुन्हा उघडण्यासाठी पुनर्विलोकन
याचिका दाखल करण्याच्या कायदेशीर तरतुदी पडताळून पाहू, वेळप्रसंगी महाधिवक्त्यांचं
मत घेऊ आणि कायदेशीर कारवाई करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
****
विधानभवनाच्या प्रवेशद्वारासामोर आत्मदहनाचा प्रयत्न करणारे उस्मानाबादचे शेतकरी
सुभाष देशमुख यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल मुंबईतल्या जे.जे.
रुग्णालयात जाऊन भेट घेतली. कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नका, कोणतंही टोकाचं पाऊल
उचलू नका अशी विनंती करत, शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी विरोधी पक्षाच्या वतीनं सर्वतोपरी
मदत करण्याचं आश्वासनही पवार यांनी त्यांना दिलं. देशमुख यांनी परवा विधानभवनाबाहेर
आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.
****
नांदेडचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार डॉ. केशवराव धोंडगे यांच्या
शतकपूर्तीनिमित्त काल विधानभवनात त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष डॉ. राहुल नार्वेकर,
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कष्टकरी, कामगार आणि दीनदुबळ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आयुष्य समर्पित करणारे
धोंडगे, यांना दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या. धोंडगे यांनी
आपल्या कार्यातून विधिमंडळाची परंपरा अधिक समृद्ध केली, असे गौरवोद्गार, विधानसभा अध्यक्ष
नार्वेकर यांनी काढले.
धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त विधानसभेत काल अर्ध्या तासांची चर्चा झाली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, बाळासाहेब
थोरात, अशोक चव्हाण, हरीभाऊ बागडे यांची त्यांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे केली.
****
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भात
दाखल केलेल्या विविध याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे सुनावणी होईल
की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. न्यायालयाच्या दैनंदिन कामकाजात या याचिकांवरच्या
सुनावणीचा आजच्या कामकाजात समावेश करण्यात आला नसल्यामुळे ही अस्पष्टता निर्माण झाली
आहे. मात्र घटनापीठ ऐनवेळी हे प्रकरण सुनावणीस घेऊ शकते. मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये
हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या पीठाकडे सोपवण्यात आलं होतं. त्याचवेळी यावरची सुनावणी गुरुवारी होणार
असल्याचं सांगण्यात आलं होतं.
****
मुंबईतील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये अडोतीस कोटी रुपयांच्या फसवणूक आणि घोटाळा
प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे व्यावसायिक मित्र सुजित पाटकर यांच्या विरोधात
फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर
ही कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेनं मुंबईतल्या वेगवेगळ्या जंबो कोविड केंद्रांना
वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी काढलेल्या निविदा मिळवण्यासाठी, जाणीवपूर्वक कंपनीच्या
भागीदारीची बनावट कागदपत्रं सादर केली, आणि वरळी तसंच दहिसर जम्बो कोविड केंद्राचं
कंत्राट प्राप्त केलं, यासह इतर आरोप सोमय्या यांनी या तक्रारीत केले आहेत.
****
एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना युपीआय, क्यु आर कोड, आदी डिजिटल पेमेंटच्या
माध्यमातून तिकिट काढता येणार आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालक
शेखर चन्ने यांनी ही माहिती दिली. या 'डिजिटल' प्रणालीद्वारे तिकिट खरेदी करता येईल
अशी पाच हजार ॲण्ड्राईड तिकिट यंत्रं महामंडळानं घेतली आहेत. चन्ने यांच्या हस्ते महामंडळाच्या
मुख्यालयात काल या तिकीट यंत्रांचा शुभारंभ करण्यात आला. ही डिजिटल तिकीट वाटप यंत्र
पहिल्या टप्प्यात लातूर, अकोला, यवतमाळ, बुलढाणा,
चंद्रपूर तसंच भंडारा या विभागांना वितरीत करण्यात आली आहेत.
****
साहित्य अकादमीचे बालसाहित्यासाठीचे पुरस्कार काल जाहीर झाले. मराठी भाषेतल्या
बाल साहित्यासाठी संगीता बर्वे यांच्या ‘पियुची वही’ या कादंबरीची निवड झाली आहे. विविध २३ भाषांमधल्या साहित्यासाठी दरवर्षी हे
पुरस्कार दिले जातात. मराठीसाठी साहित्याची निवड साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ भारत
सासणे, प्राध्यापक प्रवीण बांदेकर आणि साहित्यिक प्रेमानंद गज्वी यांच्या समितीनं केल्याचं,
अकादमीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. यंदाचे युवा साहित्यिक पुरस्कारही अकादमीनं
जाहीर केले, मात्र मराठी भाषेसाठीचा पुरस्कार काल जाहीर झाला नाही. हा पुरस्कार स्वतंत्रपणे
जाहीर केला जाईल, असं अकादमीकडून सांगण्यात आलं आहे.
****
येत्या गणेश चतुर्थीपूर्वी शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांचे पगार देण्याबाबत
वित्त विभागानं काल शासन निर्णय जारी केला. यंदा गणेशचतुर्थी ३१ ऑगस्टला असल्यामुळे
ऑगस्ट महिन्याचं वेतन २९ ऑगस्टपूर्वी व्हावं याकरता शिक्षक भारती या संघटनेनं वित्त
आणि शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार केला होता, अशी माहिती या संघटनेनं एका पत्रकाद्वारे
दिली आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ९१३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ८९ हजार ३८९ झाली आहे. काल या संसर्गानं राज्यात
पाच रुग्णांचा मृत्यू झाला, तर एक हजार १८५ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९
लाख २८ हजार ६०३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक
शून्य एक शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १२ हजार ५७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ४९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात नांदेड जिल्ह्यातल्या
१२, लातूर ११, उस्मानाबाद दहा, औरंगाबाद आठ, जालना चार, बीड दोन, तर परभणी आणि हिंगोली
जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या नगर परिषदा आणि नगर पंचायती प्लास्टिक आणि कचरा
मुक्त करण्याचा निर्णय, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी घेतला आहे. जागतिक कीर्तीचे
कचरा विघटन तज्ज्ञ रामदास कोकरे आता लातूर जिल्ह्याच्या नगर परिषद प्रशासन विभागाचे
सहआयुक्त म्हणून रुजू झाले आहेत. त्यांनी काल निलंगा नगर परिषद आणि शिरूर अनंतपाळ नगर
पंचायतीपासून या कामाची सुरुवात केली. येत्या सतरा सप्टेंबरला म्हणजे मराठवाडा मुक्ती
दिनी ही शहरं कचरा मुक्त होतील, असं नियोजन करण्यात आलं आहे. उद्यापासून लातूर जिल्ह्यातल्या
सगळ्या शाळांमधून कचरा मुक्ती अभियान सुरू होणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ
करण्यात आली आहे. धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटावरुन एक फुटावर स्थिर करुन नऊ हजार
४३२ आणि सांडव्यद्वारेदेखील नऊ हजार ४३२, असं एकूण १८ हजार ८६४ घनफूट प्रतिसेकंद वागेनं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे
नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे.
****
पुणे जिल्हा परिषदेच्या धर्तीवर आता औरंगाबाद जिल्हा परिषद देखील, महाराष्ट्र
नॉलेज कॉर्पोरेशन - एम के सी एल सोबत करार करत, व्यवसाय व्यवस्थापन शाखा - बीबीए च्या
१५ उमेदवारांना, इंटर्नशिपची संधी देणार आहे. महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत अभ्यासक्रमाला
प्रवेश घेतलेले विद्यार्थी यास पात्र असतील. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
नीलेश गटणे यांनी ही माहिती दिली. हे उमेदवार जिल्हा परिषदेतल्या जुन्या अधिकारी कर्मचाऱ्यांना
टेक्नोसेव्ही म्हणून सहाय्य करतील, या काळासाठी त्यांना किमान दहा हजार रुपये विद्यावेतन
दिलं जाणार असल्याचं, गटणे यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बापूसाहेब
ऊर्फ श्रीनिवासराव देशमुख गोरठेकर यांचं काल रात्री निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते.
गोरठेकर हे दोन वेळा भोकर विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. ते नांदेड जिल्हा
परिषदेचे माजी अध्यक्ष होते, तसंच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही
त्यांनी काम केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी
काही काळ काम केलं होतं.
****
सीटूशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र ऊसतोडणी आणि वाहतूक कामगार संघटनेच्या वतीनं,
बीड जिल्ह्यात माजलगाव इथं राज्यस्तरीय ऊसतोडणी कामगार परिषदेला कालपासून प्रारंभ झाला.
शहरातून मोटारसायकल फेरी काढून परिषदेला सुरुवात झाली. सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष
डॉ.डी.एल.कराड यांच्यासह अन्य नेते या परिषदेला उपस्थित आहेत. प्रदीर्घ संघर्षानंतर
ऊसतोडणी कामगारांचं कल्याणकारी महामंडळ घोषित झालं, पण त्याची अंमलबजावणी अजून झालेली
नाही, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी, तसंच या कामगारांच्या इतर प्रमुख मागण्यांसाठी ही
परिषद आयोजित करण्यात आली आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकरता या खरीप हंगामासाठी पीक स्पर्धा घेण्यात
येणार आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल
या पिकांसाठी, येत्या एकतीस ऑगस्टपूर्वी इच्छुक शेतकऱ्यांना अर्ज करता येणार असल्याचं,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं
आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य कृषी विभागातर्फे ही पीक स्पर्धा
योजना राबवण्यात येते.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरग्याचे तहसीलदार राहुल पाटील याला वीस हजार रुपयांची
लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं काल अटक केली. तक्रारदाराच्या घराच्या
बांधकामासाठी लागणारी चार ट्रक वाळू मध्यस्थामार्फत देण्यासाठी आणि त्या वाहनांवर कारवाई
न करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
No comments:
Post a Comment