Wednesday, 31 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.08.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 August 2022

Time 07.10 AM to 07.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      दहा दिवसीय गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात, कोविड निर्बंध हटल्यामुळे भक्तांमध्ये उत्साह

·      मुंबईत कुलाबा-वांद्रे-सिप्झ कॉरिडोर मेट्रो ३ प्रकल्पाची पहिली चाचणी

·      राज्य परीवहन महामंडळाच्या ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात

·      उस्मानाबादचे शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड शिंदे गटात सहभागी

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार ४४४ रुग्ण, मराठवाड्यात २३ बाधित

·      कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेतील बारा शिक्षकांकडे शिक्षक पात्रता परिक्षेचे बनावट प्रमाणपत्र आढळल्याचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांचा आरोप 

·      जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंबडचे माजी नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी यांचं दीर्घ आजारानं निधन

आणि

·      आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा हाँगकाँग विरुद्ध सामना

 

सविस्तर बातम्या

दहा दिवसीय गणेशोत्सवाला आजपासून सुरवात होत आहे. कोविड काळातल्या दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदा गणेशोत्सव धामधुमीनं साजरा करण्याचा उत्साह राज्यभरात दिसून येत आहे. कोविड प्रसाराला बऱ्यापैकी आळा बसल्यानं उत्सवावर गेली दोन वर्षं घातलेले निर्बंध राज्य सरकारनं यंदा हटवले आहेत. अनेक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या मोठ्या गणेशमूर्ती मंडपात आणल्या असून आज त्यांची विधीवत प्रतिस्थापना करण्यात येईल. गणेशमूर्ती, आकर्षक मखरं, पूजा, रोषणाई तसंच सजावटीचं सामान, इत्यादी साहित्याची बाजारपेठेत रेलचेल दिसून येत आहे. घरगुती तसंच सार्वजनिक गणपतीच्या पूजा साहित्यासह इतर खरेदीसाठी गणेश भक्तांच्या गर्दीनं बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. गणपतीपाठोपाठ येणाऱ्या महालक्ष्मी अर्थात गौरीपूजनाची तयारी करण्यासाठी महिलावर्गाची बाजारपेठांमधून गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे.

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गणपतीला विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती मानलं जातं, असं सांगून  राष्ट्रपतींनी, लोकांना सौहार्द राखण्यासाठी भगवान गणेशाकडे प्रार्थना करायला सांगितलं आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही जनतेला गणेश चतुर्थीच्या  शुभेच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपतींनी सर्व देशवासियांच्या उत्तम आरोग्य, सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गणरायाचे स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करू या. त्यासाठी आपण सर्व एकजुटीने आणि कोणत्याही आव्हानाची तमा न बाळगता प्रयत्न करूया,’ असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव जोरदार साजरा करताना सामाजिक दायित्वाचं पालन करावं पर्यावरणाची हानी होऊ नये, याची काळजी घ्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे.

****

मुंबईत कुलाबा-वांद्रे-सिप्झ कॉरिडोर मेट्रो ३ या प्रकल्पाची काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पहिली चाचणी घेण्यात आली. राज्य सरकार सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन राज्याला प्रगतीपथावर नेणाऱ्या कामांना प्राधान्य देत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. येत्या सहा महिन्यात या मार्गावरच्या चाचण्या वेगानं पूर्ण करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या चाचणीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. हा प्रकल्प म्हणजे मुंबईतल्या वाहतुक कोंडीवरचा रामबाण उपाय आहे. आता या प्रकल्पात कोणतंही विघ्न येणार नाही असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्याच्या विकासकामात कोणीही अडथळे आणू नयेत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

****

मागास भागांत रोजगार निर्मिती होण्यासाठी उद्योग वाढीकरिता आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. इंडो रामा कंपनीच्या शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. इंडोरामा कंपनी मार्फत राज्यात नव्यानं साडेचार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या माध्यमातून सुमारे चार हजार प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर इथं वस्त्रोद्योगाशी निगडीत व्यवसायात नवी गुंतवणूक प्रस्तावित आहे. आगामी तीन ते चार वर्षांत टप्प्या-टप्प्याने ही गुंतवणूक केली जाणार आहे.

****

मद्य विक्रीच्या दुकानांना अनुकूल अबकारी धोरण बनवल्याबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्ली राज्य सरकारवर टीका केली आहे. याबाबत अण्णांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक पत्र लिहिलं आहे. ज्यावेळी आपण आमच्या आंदोलनाशी निगडीत होतात, त्यावेळी आपली भूमिका दारुच्या व्यसनाविरोधात होती, असं हजारे यांनी या पत्रात म्हटलं आहे. याबाबत अण्णांनी या शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली...

Byte

त्याने दारुबंदीची जी पॉलिसी केलीय, ती पॉलिसी अत्यंत चुकीची आहे. म्हणजे प्रत्येक वॉर्डमध्ये दारुचं दुकान उघडायचं. आणि दारू पिण्याऱ्यांना २५ वर्ष वय होतं, दारू पिण्याऱ्यांचं ते २१ वरती आणलं. म्हणजे तुम्ही दारुला प्रोत्साहन देताय. अरे ती बरबाद होतील ना. म्हणून मला ते फील झालं. आणि पहिल्यांदा मी अरविंदच्या विरोधात अशा प्रकारची नोट काढली.

****

राज्य परीवहन -एसटी महामंडळाकडून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. ही सवलत फक्त महाराष्ट्राच्या सीमेपुरतीच आहे. पात्र  नागरिकांना आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, तहसीलदार यांनी दिलेले ओळखपत्र, राज्य परिवहन महामंडळाद्वारे देण्यात येणारी स्मार्ट कार्ड, डीजी लॉकर, मोबाईल-आधारकार्ड यापैकी कोणतंही ओळखपत्रं दाखवून या सेवेचा लाभ घेता येणार आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन एसटी महामंडळाने केलं आहे.

२६ ते २९ ऑगस्ट या गेल्या चार दिवसांत राज्यभरातून सुमारे १ लाख ५१ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी ही माहिती दिली.

****

राज्यात मतदानाविषयी अधिक जनजागृती निर्माण व्हावी आणि मतदारांनी आपल्या मतदानाच्या कर्तव्याचं चोख पालन करावं  यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी यांनी ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार ही गणेशात्सव देखावा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. या विषयी उत्कृष्ट देखावा, सजावट करणाऱ्या विजेत्या स्पर्धकांना बक्षीसं दिली जाणार आहेत. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून यंदाच्या स्पर्धेत घरगुती गणेशोत्सव सजावटी सोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानाही या स्‍पर्धेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत मतदार ओळखपत्राला आधार कार्डची जोडणी, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्‍ती, प्रसार-प्रचार करावा असं आयोगातर्फे सांगण्यात आलं.

****

शिवसेनेचे उस्मानाबादचे माजी खासदार रवींद्र गायकवाड हे शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाले आहेत. गायकवाड यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. गायकवाड यांच्या शिंदे गटात प्रवेश करण्यात आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या शिष्टाईची महत्त्वाची भूमिका असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. आमदार चौगुले यांनी गुवाहाटी इथं असतांना, याबाबतचे संकेत दिले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी गायकवाड यांना पक्षकार्य करत राहण्याची सूचना केली असून, त्यांना सन्मान पूर्वक वागणूक मिळेल अशी ग्वाही दिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

औरंगाबादच्या महिला कला महाविद्यालयाचे प्राचार्य तथा साहित्यिक डॉ. रामकिशन दहिफळे यांना पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा माधुरी वैद्य पुरस्कृत श्रीवत्स प्रकाशन पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘परिवर्तनवादी साहित्य संकल्पना आणि स्वरुप या ग्रंथासाठी डॉ. दहिफळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे इथं एस.एम जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन सभागृहात १२ सप्टेंबरला हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

****

समर्थ रामदास स्वामींचं जन्मगाव असलेल्या जालना जिल्ह्यातल्या जांबसमर्थ इथल्या राम मंदिरातल्या पंचधातूच्या एैतिहासिक मूर्ती चोरी प्रकरणाचा दहा दिवस उलटूनही तपास लागलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी काल मुख्य रस्त्यावर दोन तास ठिय्या आंदोलन केलं. समर्थ रामदासांचे अकरावे वंशज भूषण महारूद्र स्वामी यांनीही आंदोलनात सहभाग घेत समर्थ स्वत: पूजा करत असलेल्या राम, लक्ष्मण, सीता, हनुमंतांच्या मूर्तींची चोरी करणाऱ्यांचा पोलिसांनी तातडीनं शोध घेण्याची मागणी केली. यावेळी पोलीस अधिक्षकांनी आंदोलकांशी संवाद साधून मूर्ती चोर लवकरच पकडले जातील, असं सांगितलं.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ४४४ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ९८ हजार ७३८ झाली आहे. काल या संसर्गानं राज्यात आठ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार २३७ झाली असून मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल दोन हजार सहा रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ३९ हजार ५९४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य दोन शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १० हजार ९०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल २३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात औरंगाबाद जिल्ह्यातल्या सहा, लातूर चार, उस्मानाबाद- नांदेड- बीड- जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन, आणि हिंगोली जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

****

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेतील बारा शिक्षकांकडे शिक्षक पात्रता परिक्षा- टीईटीचे बनावट प्रमाणपत्र आढळल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये काल पत्रकारांशी बोलतांना त्यांनी मंत्री सत्तार यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली. या प्रकरणात मंत्री सत्तार यांच्या मुलींची नावे देखील आहेत तसंच त्यांच्या वेतनाची कागदपत्रं आपल्याकडे असल्याचा दावा आमदार दानवे यांनी केला असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

****

जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अंबडचे माजी नगराध्यक्ष भवानीदास उर्फ बाबूराव भालचंद्र कुलकर्णी यांचं काल सायंकाळी दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांनी आपल्या कारकीर्दीत काँग्रेस पक्षात विविध पदांवर काम केलं, अंबड नगरपरिषदेचे अनेक वर्ष ते अध्यक्ष होते. त्यांच्या निधनाबद्दल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. या स्पर्धेतला भारतीय संघाचा हा दुसरा आणि अखेरचा साखळी सामना असेल. संध्याकाळी साडे सात वाजता हा सामना सुरु होईल.

दरम्यान, काल अफगाणिस्तान संघानं बांग्लादेश संघावर ७ गडी राखत विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्तान संघानं सुपर ४ फेरीत प्रवेश केला आहे.  

****

केंद्र शासनाच्या वतीने सप्टेंबर महिना हा “राष्ट्रीय पोषण महिनाम्हणून साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी विविध कार्यक्रमांची प्रभावी अमंलबजावणी करण्याच्या सूचना नांदेडचे जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये राष्ट्रीय पोषण महिना या विषयावर काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

****

No comments: