Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 August 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७
ऑगस्ट २०२२ दुपारी १.०० वा.
****
देशाचे नवे
सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आयोजित
कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह
इतर केंद्रीय मंत्री यावेळी उपस्थित होते. सरन्यायाधीश उदय लळित यांचा कार्यकाळ आठ
नोव्हेंबर पर्यंत असेल.
****
चालू आणि
पुढच्या आर्थिक वर्षातही भारताचा अर्थव्यवस्था वाढीचा दर सात पूर्णांक चार दशांश टक्के
असेल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत
एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेनं देखील
पुढच्या दोन वर्षात भारताचा अर्थव्यवस्था वाढीचा दर सर्वात जास्त असल्याचा अंदाज व्यक्त
केला असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. भारतात आज नवनवीन गुंतवणुकदार आकर्षित होत
असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
देशात कोविड
प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २११ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २५ लाख ८६ हजार
८०५ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २११ कोटी ३९ लाख ८१ हजार ४४४
मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या नऊ हजार ५२० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १२ हजार
८७५ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ८७ हजार ३११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या मालिकेचा हा ९२वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
नागपुरात
तान्हा पोळा सणा निमित्त निघणाऱ्या मारबत मिरवणुकीला आज सकाळी सुरुवात झाली. पिवळी
मारबत नागोबा देवस्थान इथून तर काळी मारबत नेहरु पुतळा येथून निघाली. १४२ वर्षांची
परंपरा असलेली ही मिरवणूक 'इडा पिडा घेऊन जा रे मारबत' हा संदेश देत काढली जाते. या
मिरवणुकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या बडग्याच्या प्रतिकृतीद्वारे समाजातल्या अनिष्ट
रूढी, सामाजिक राजकिय मुद्यांवर लक्ष वेधलं जातं. गोंदिया मध्ये देखील मारबतचा जल्लोष
पहायला मिळाला.
****
नाशिकच्या
सार्वजनिक बांधकाम विभागाचा लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेश बागूल याला २८ ऑगस्ट पर्यंत
पोलिस कोठडी सुनावली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातल्या स्वयंपाक गृहाच्या
उभारणीसाठी ठेकेदाराकडून २८ लाख ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी त्यानं केली होती.
त्याच्या पुण्यातल्या घराच्या झडतीत ४८ लाख रुपये तर नाशिकच्या घरातून ९८ लाख रुपये
अशी एकूण एक कोटी ४६ लाख रुपयांची रोकडही विभागानं जप्त केली आहे.
****
भालाफेकपटू
नीरज चोप्रानं लुसाने डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावत इतिहास रचला
आहे. ८९ पूर्णांक शून्य आठ मीटर अंतरावर भाला फेकून त्यानं ही कामगिरी केली असून, ही
स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. या विजयामुळे नीरज डायमंड लीगच्या अंतिम
स्पर्धेसाठी पात्र ठरला असून, ही स्पर्धा सात आणि आठ सप्टेंबरला स्विज्झर्लंडमध्ये
होणार आहे.
****
टोकियो इथं
सुरु असलेल्या बी डब्ल्यू एफ बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज
रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं कांस्य पदक जिंकलं. आज झालेल्या उपान्त्य
फेरीच्या सामन्यात सात्विक - चिराग जोडीला मलेशियाच्या जोडीकडून २२ - २०, १८- २१, १६
- २१ असा पराभव पत्करावा लागला.
****
आंतरराष्ट्रीय
फुटबॉल महासंघ - फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघ - ए आय एफ एफ वर केलेली निलंबनाची
कारवाई मागे घेतली आहे. निलंबन मागे घेतल्यामुळे भारतात १७ वर्षांखालील महिला विश्वचषक
फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फिफाच्या या निर्णयावर क्रिडा
मंत्री अनुराग ठाकुर यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
****
आशिया चषक
टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा आजपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु होत आहे. श्रीलंका
आणि अफगाणिस्तान यांच्यात आज पहिला सामना होईल. भारताचा पहिला सामना उद्या पाकिस्तान
विरुद्ध होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी होणार आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरु करण्यात आला
आहे. धरणाचे दहा दरवाजे अर्धा फूट उघडून पाच हजार २४० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी
नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पहाता विसर्ग कमी अथवा जास्त
करण्यात येईल, असं पाटबंधारे विभागानं कळवलं आहे.
****
राज्यातला
पाऊस ओसरू लागला असला तरी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात उद्यापासून ३० ऑगस्टपर्यंत
काही भागांत जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
No comments:
Post a Comment