Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 August 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९
ऑगस्ट २०२२ दुपारी १.०० वा.
****
नोएडात बेकायदेशीरपणे
उभारण्यात आलेले दोन टॉवर पाडण्यात आल्यानंतर आता मुंबईतील बेकायदेशीर इमारती, मजल्यांवर
कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री
आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. या प्रकरणी कोणत्याही बिल्डरला माफी
देण्यात येऊ नये अशी मागणीही त्यांनी या पत्रात केली आहे.
मुंबईत पत्रकारांशी
बोलतांना सोमय्या यांनी मुंबई आणि परिसरात २५ हजारहून अधिक भाडेकरू, घरमालक घरांना
भोगवटा प्रमाणपत्र नसल्यानं चिंतेत असल्याचं सांगितलं. शहरातील अनेक टॉवर्सलादेखील
भोगवटा प्रमाणपत्र मिळालेलं नाही. या टॉवरमध्ये काही मजले बेकायदेशीरपणे उभारण्यात
आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. माजी
मंत्री अनिल परब यांच्या मालकीचा दापोलीतील रिसॉर्ट तोडण्यासंदर्भात रत्नागिरीच्या
जिल्हाधिकाऱ्यांनी आज बैठक बोलावली आहे. यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार
असल्याचं सोमय्या म्हणाले.
***
मुंबईत दादरमध्ये
शिवाजी पार्कवर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अद्याप मुंबई महापालिकेनं परवानगी
दिली नाही. यासाठी शिवसेनेच्यावतीनं परवानगी मागणारे दोन अर्ज महापालिकेला देण्यात
आले आहेत. गणेशोत्सावानंतर परवानगीबाबतचा निर्णय घेतला जाईल, अस महापालिकेच्या सूत्रानं
सांगितलं.
***
आज राष्ट्रीय
क्रिडा दिवस. हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
त्यांना अभिवादन केलं आहे. चालू वर्ष खेळांसाठी महत्त्वाचं ठरलं असल्याचं पंतप्रधानांनी
आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. पदक मिळवण्याचं सत्र आणि देशभरात खेळांप्रती आवड
अशीच वाढत राहील अशी अपेक्षा त्यांनी आपल्या संदेशात व्यक्त केली आहे. दरम्यान, युवा
कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान क्रीडा आणि
फिट इंडिया मोहिमेतल्या काही प्रतिनिधींसोबत आज संध्याकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून
संवाद साधणार आहेत. निरोगी जीवनाचं आणि क्रीडाक्षेत्राचं भारतातलं महत्त्व यावर ते
चर्चा करणार आहेत.
***
राष्ट्रीय
औषध विज्ञान मूल्य प्राधिकरण- एनपीपीएचा रौप्य महोत्सव आज नवी दिल्लीत साजरा होणार
आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात रसायन आणि खतं मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांच्या
हस्ते एकीकृत औषध विज्ञान डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली २ चं लोकार्पण होणार आहे. २०१३
च्या औषध मूल्य नियंत्रण आदेशानुसार विविध अर्ज दाखल करण्यासाठी एकच मार्ग उपलब्ध होईल
तसंच प्राधिकरणाचं कामकाज हे कागदविरहित होण्यास तसंच विविध भागधारकांना प्राधिकरणापर्यंत
पोहोचवण्यात मदत होणार आहे.
***
फेरनिविदांच्या
विरोधात दाखल याचिका न्यायालयानं फेटाळल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ-
एमएसआरडीसीनं वांद्रे-वरळी सागरी सेतूवर वाहनांचालकांकडून पथकर वसूल करण्यासाठी नव्या
कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. या नव्या कंत्राटदारानं पथकर वसुलीच्या कामाला सुरुवात
केली. यापूर्वी एमईपी कंपनीला पथकर वसूलीचं तीन वर्षांसाठी कंत्राट देण्यात आलं होतं.
हा कालावधी ३० जानेवारी २०२० रोजी संपुष्टात आला. त्यामुळे एमएसआरडीसीनं नव्या कंत्राटदाराची
१९ वर्षांसाठी नियुक्ती करण्याकरता निविदा मागवल्या होत्या. मात्र प्रतिसाद न मिळाल्यामुळे
ही निविदा रद्द करण्यात आली. त्यानंतर पुन्हा निविदा मागवण्यात आल्या, यात कंत्राटदाराची तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्याची
अट घालण्यात आली होती. एमईपी आणि अन्य एका कंपनीनं याविरोधात न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयानं सुनावणी अंती या याचिका फेटाळून लावल्या.
***
देशात कोविड
प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २११ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २४ लाख ७० हजार
नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २११ कोटी ९१ लाख मात्रा देण्यात
आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या सात हजारांहून अधिक कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ९
हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले. देशात सध्या ८४ हजार ९३१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
***
सोलापूर
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ हजार ६६ शेतकऱ्यांचं २५ हजार हेक्टर
क्षेत्राचं नुकसान झालं आहे. एका दिवसात ६५ मिलीमीटर पाऊस पडलेल्या भागांच्या नुकसानीची
पंचनामे पुर्ण झाले असून त्या नुकसानापोटी ४० कोटी ५३ लाख ४९ हजार ७८० रुपयांची मागणीचा
प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली
आहे.
***
अकोला शहरात
काल संत गाडगेबाबा सेवा समितीच्या वतीने शाडू माती पासून गणेश मूर्ती निर्मितीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली
होती. या कार्यशाळेत ७४८ कुटुंबातील गणेश भक्तांनी पर्यावरणपूरक मुर्त्या साकारल्या
आहेत.
***
No comments:
Post a Comment