Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29
August 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ ऑगस्ट २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
पायाभूत सुविधांचे प्रकल्प कालबद्धरित्या पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांचे निर्देश.
·
मंत्रालयासमोर पेटवून घेतलेले सुभाष देशमुख यांचा मुंबईत उपचारादरम्यान
मृत्यू.
·
मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्कच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात
रोजगार निर्मिती -केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी.
आणि
·
औरंगाबाद शहरात सीएनजी गॅस पंप तत्काळ सुरु करण्याची सार्वजनिक
वाहतुकदारांची मागणी.
****
राज्यातल्या
पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीनं आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर
संबंधित विभागांनी काम करावं, तसंच प्रलंबित बाबी आणि आवश्यक परवानग्या तातडीनं मिळवून
घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रालयातील वॉर रूम मधून राज्यातल्या महत्त्वाच्या पायाभूत
सुविधांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला, त्यावेळी हे निर्देश दिले. अहमदाबाद-मुंबई हायस्पीड
रेल्वेशी संबंधित भूसंपादन, मोबदला, जागा हस्तांतरण हे विषय ३० सप्टेंबर पूर्वी मार्गी
लावण्याचे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले. पंढरपूर, तुळजापूर मंदिरांचा विकास आराखडा
दोन महिन्यात सादर करावा, जेणेकरुन या ठिकाणी भाविकांना मोठ्या प्रमाणावर सुविधा देता
येणं शक्य होईल असं सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन विभागाच्या समन्वयानं या संदर्भातील
कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
****
मुंबईत
मंत्रालयासमोर पेटवून घेतलेले सुभाष देशमुख यांचा आज मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला.
उस्मानाबाद इथले रहिवासी असलेले सुभाष देशमुख यांनी २३ तारखेला मंत्रालयासमोर पेटवून
घेतलं होतं. सुमारे ४५ टक्के भाजलेल्या अवस्थेत त्यांना जेजे रुग्णालयात उपचारासाठी
दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान आज त्यांचं निधन झालं.
****
केंद्र
सरकारने जनतेच्या प्रश्नावर झोपेचे सोंग घेतलं आहे, त्याला जागवण्याचं काम राष्ट्रवादी
काँग्रेस रस्त्यावर येवून करेल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. पुण्यात
कोथरूड इथं जनआक्रोश आंदोलनात खासदार सुळे बोलत होत्या. महागाईचा विषय देशातील सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत
महत्त्वाचा आहे. मात्र, या विषयाकडे केंद्रातले सत्ताधारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत
असल्याचा आरोप खासदार सुळे यांनी केला आहे.
****
शिवसेनेच्या
दसरा मेळाव्याबाबत काहीही संभ्रम नसून, हा मेळावा आमचाच होणार, असं शिवसेना पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत मातोश्री या आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी
बोलत होते. राज्यभरातल्या शिवसैनिकांनी शिवतीर्थावर मेळाव्याला येण्याची तयारी सुरू
केली असल्याचं ठाकरे म्हणाले.
दरम्यान,
बजरंग दलाचे उद्धव कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेनं
हिंदुत्व सोडल्याची आवई भाजपने उठवली होती, कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा शिवसेना
प्रवेश ही त्याला छेद देणारी घटना असल्याचं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.
****
काँग्रेस
नेतृत्वाला प्रश्न विचारणं मान्य नव्हत असं, असं ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी
म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. आपण पक्ष नेतृत्वासमोर अनेक
मुद्दे ठेवले, पक्षाच्या अनेक बैठका झाल्या मात्र आपल्या कोणत्याही सूचनांचा विचार
झाला नाही असंही आझाद यांनी सांगितलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर पक्षाला
कमकुवत करणं आणि सल्लामसलतची परंपरा समाप्त करण्याच्या आरोपावरून आझाद यांनी नुकताच
पक्षाच्या सर्व सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
****
मल्टीमॉडेल
लॉजीस्टिक पार्क हे राज्याची प्रगती आणि विकासात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणार असून
या पार्कच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचं,
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. गडकरी यांच्या
अध्यक्षतेखाली आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे
याबाबत बैठक झाली, त्यावेळी गडकरी बोलत होते. राज्यात जालना, जळगाव, सोलापूर, नाशिक
सह आठ ठिकाणी हे मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क लवकरच सुरू होणार असल्याचं सामंत यांनी
सांगितलं. या पार्क साठी आवश्यक असणारी जागा राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे.
****
केंद्रीय
आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी औषध निर्माता उद्योगांना श्रेष्ठ दर्जाच्या औषधांचं
उत्पादन करण्याचं आणि जागतिक बाजारपेठेत ही औषधं उपलब्ध व्हावीत असं सूचित केलं आहे.
आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारित प्राधिकरणाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याला
ते संबोधित करत होते. गुणवत्ता पूर्ण औषधं उपलब्ध केल्याबद्दल जगात भारताची प्रतिष्ठा
वाढली, त्यामुळे औषधांची निर्यातही वाढल्याचं ते म्हणाले.
****
क्रीडापटूंसाठीच्या
पारितोषिकांच्या रकमेत लक्षणीय वाढ करणार असल्याचं राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन
यांनी म्हटलं आहे. आज राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मुंबईत झालेल्या क्रीडापटूंच्या
सत्कार समारंभात बोलत होते. त्याआधी त्यांनी चर्चगेट इथं, मुंबई हॉकी संघटनेत मेजर
ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
देशात
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २११ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २४ लाख
७० हजार नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २११ कोटी ९१ लाख मात्रा
देण्यात आल्या आहेत.
****
औरंगाबाद
शहरात सीएनजी गॅस पंप तत्काळ सुरु करण्याची मागणी रिक्षा चालक, टॅक्सी कारचालक आणि
खाजगी सीएनजी वाहन धारकांनी केली आहे. यासर्वांच्या एका शिष्टमंडळांनं आज जिल्हाधिकारी
सुनील चव्हाण यांना निवेदन सादर केलं. शहरात सीएनजी गॅस वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात
असून वाहनात सीएनजी गॅस भरण्यासाठी २० ते २५ किलोमीटर शहराच्या बाहेर जावं लागतं, यापंपावरही
वाहनांच्या लांबच लांब रांगा असतात. त्यामुळे सीएनजी गॅस भरण्यासाठी तासनतास रांगेत
ताटकळत रहावं लागतं, हा वेळ निघून गेल्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या रोजगारावर
परिणाम होत असल्यामुळे शहरामध्ये तत्काळ सीएनजी पंप सुरु करावा आणि त्यांच्या संख्येतही
वाढ करण्याची मागणी या शिष्टमंडळानं प्रशासनाकडे केली आहे.
****
दिव्यांगांच्या
विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अपंग जनता दलाच्या वतीने हिंगोली इथं जिल्हाधिकारी
कार्यालयाचं प्रवेशद्वार बंद करून आंदोलन करण्यात आलं. दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी
या संघटनेने यापूर्वीही निवेदनं दिली होती, मात्र कोणीच दखल घेत नसल्यानं संघटनेनं
आज हा पवित्रा घेतला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हे प्रवेशद्वार उघडण्यात आलं.
घरकुल योजनेत प्रपत्र ड मध्ये दिव्यांगांना प्राधान्याने लाभ द्यावा, शासनाने दिव्यांगांसाठी
स्वतंत्र विभाग करावा, ग्रामपंचायतीतल्या ५ टक्के निधीचे वेळेत वाटप करावं, पंचायत
समितीत अपंग तक्रार निवारण कक्ष सुरू करावा, आदी मागण्या संघटनेनं केल्या आहेत.
****
सामान्य
माणसाची घुसमट करणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मार्गही दाखवण्याचं काम पत्रकार
अरुण समुद्रे यांनी केल्याचं गौरवोद्गार प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांनी काढले आहेत.
पत्रकार अरुण समुद्रे यांनी विविध नियतकालिकांमधून लिहिलेले लेख आणि बातम्यांचा संग्रह
असणाऱ्या ‘लक्षवेधी’ या ग्रंथाचं मान्यवरांच्या हस्ते आज लातूर इथं प्रकाशन झालं, या
प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून दासू वैद्य बोलत होते. अनेक मान्यवरांनी या
कार्यक्रमाला हजेरी लावून समुद्रे यांना शुभेच्छा दिल्या.
****
सोलापूर
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ हजार ६६ शेतकऱ्यांच्या सुमारे
२६ हजार हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती
दिली आहे. या नुकसान भरपाईसाठी किमान ४० कोटी ५३ लाख रुपये निधीची मागणी शासनाकडे केली
आहे. त्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला असल्याचं शंभरकर यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात वैजापूर इथल्या भूमी अभिलेख कार्यालयातला भूमापक संजीत कवटकर याला दोन हजार
रुपये लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं अटक केली आहे. जमिनीची हद्द कायम मोजणी
करून मोजणी नकाशा देण्यासाठी, कवटकर यानं तक्रादाराकडे लाचेची मागणी केली होती, त्यातले
दोन हजार रुपये घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं सापळा रचून कवटकर याला अटक केली.
****
धुळे
तालुक्यात बेकायदेशीररित्या वाहतुक होत असलेला सुमारे साडे वीस लाख रुपयांचा गुटखा
पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेनं पकडला. हा गुटखा इंदूर इथून भिवंडी इथं नेला जात
होता. गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
****
मराठवाड्यासह
राज्यात हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीनं वैद्यकीय मदत आणि रुग्ण सेवा पुरवण्याचं
काम करण्यात येत असल्याची माहिती मराठवाडा कक्ष प्रमुख दादासाहेब थेटे यांनी दिली आहे.
ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. दिवंगत आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी
निमित्त मराठवाड्यात घेतलेल्या विविध कार्यक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
****
No comments:
Post a Comment