Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27
August 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ ऑगस्ट २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
देशाचे एकोणपन्नासावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय उमेश
लळित यांचं शपथग्रहण.
·
शिर्डीच्या साईबाबा मंदिरात हार फुलं निर्बंधाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या
अध्यक्षतेखाली समिती स्थापन.
·
सातशे वर्षांची परंपरा असलेला वाई-गोरखनाथ इथला महापोळा उत्साहात
साजरा.
आणि
·
जागतिक बॅटमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सात्विक-चिराग
जोडीला कांस्य पदक.
****
देशाचे
एकोणपन्नासावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी उपराष्ट्रपती जगदीश धनखड, पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित होते. न्यायमूर्ती उदय लळित यांचा कार्यकाळ
आठ नोव्हेंबर पर्यंत राहील. न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा काल सरन्यायाधीश पदावरुन निवृत्त
झाले.
दरम्यान,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय लळीत याचं अभिनंदन केलं आहे. “महाराष्ट्राचे सुपुत्र
न्यायमूर्ती लळीत यांची कारकीर्द भारतीय न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणि तिचा गौरव वृद्धींगत
करणारी ठरेल” असंही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
****
एखाद्या
संस्थेचं आर्थिक लेखापरीक्षण जितकं महत्त्वाचं असतं त्याहून अधिक त्या संस्थेच्या कामगिरीचं
लेखापरीक्षण महत्त्वाचं आहे, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी
यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दीक्षांत
समारंभात बोलत होते. ज्ञानाचं रूपांतर अभिनवतेत करणं म्हणजे देशाच्या संपत्तीत वाढ
करण्यासारखं आहे, अनेकदा महानगरपालिकांच्या कामकाजात गुणवत्तेचा आणि दर्जाचा अभाव जाणवतो,
त्यावर उपाय म्हणून आपल्याला उत्कृष्ट आणि प्रगत तंत्रज्ञान तसंच प्रकल्प व्यवस्थापनाची
आवश्यकता आहे, असं गडकरी म्हणाले. आगामी काळात तंत्रज्ञानाचा वापर करून स्थानिक स्वराज्य
संस्थांचं आर्थिक सक्षमीकरण करण्याची गरज असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं. स्थानिक
स्वराज्य संस्थांचा विकास करताना सजीवसृष्टी आणि पर्यावरण यांचं भान राखणं महत्त्वाचं
आहे. भविष्यात सामाजिक स्तरावर केलं जाणारं प्रत्येक काम दर्जेदार व्हावं यासाठी सध्या
शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना तसं प्रशिक्षण द्यायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी
व्यक्त केली.
****
शिर्डीच्या
साईबाबा मंदिरात असलेली हार फुलं बंदी तूर्तास कायम असून या निर्बंधाबाबत सर्वंकष धोरण
ठरवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा
अंतिम अहवाल आल्यानंतर याबाबत शासन स्तरावरून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं महसूल
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याशी चर्चा करून भाविकांच्या भावना आणि श्रद्धेचा
विचार करून या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार
महसूलमंत्र्यानी आज शिर्डी इथं साईबाबा संस्थान विश्वस्त आणि शिर्डीच्या ग्रामस्थांची
चर्चा केली. शिर्डी शहर आणि परिसर शंभर टक्के गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी पोलीस विभागाला
सूचना देण्यात आल्याची माहिती ही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
महाराष्ट्र
हे राज्य शैक्षणिक राजधानी म्हणून संपूर्ण देशात उदयास यावं, अशी अपेक्षा राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातल्या
तळेरे इथल्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन आज कोश्यारी
यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, निसर्गाने सिंधुदुर्ग जिल्ह्यावर
मुक्त हस्ते उधळण केली आहे, भविष्यात राज्यात सिंधुदुर्ग शैक्षणिक पॅटर्न निर्माण करण्याला
आपण प्राधान्य देणार आहोत, असं शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर म्हणाले.
****
विधिमंडळाच्या
मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र
लावण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी
मान्य केली आहे. यासंदर्भात विधानमंडळ सचिवालय पुढील तीन महिन्यात कार्यवाही करून तैलचित्र
लावेल, अशी घोषणा नार्वेकर यांनी केली, तसे निर्देशही त्यांनी संबंधिताना दिले आहेत.
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या वाई - गोरखनाथ इथं सातशे वर्षांची परंपरा असलेला
ऐतिहासिक महापोळा आज मोठ्या उत्साहात साजरा झाला. मराठवाडा, विदर्भातल्या हजारो शेतकऱ्यांनी
या महापोळ्याला मोठी गर्दी केली होती. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे हिंगोलीचे
वार्ताहर –
वाई येथील
गोरखनाथाच्या मंदिराला तब्बल ४० हजार बैलजोड्यांनी प्रदक्षिणा घातली. बैलपोळ्याच्या
दुसऱ्याच दिवशी म्हणजे कराच्या दिवशी गोरखनाथांच्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची
परंपरा आहे. येथे प्रदक्षिणा घातल्यानंतर बैलांना कोणताच आजार होत नाही अशी आख्यायिका
आहे. कोरोनाच्या साथीनंतर प्रथमच मोठ्या उत्साहात महापोळा साजरा झाला आहे. या निमित्ताने
हिंगोली जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने मोफत पशुचिकित्स्याचे स्टॉल थाटले होते.
तर ग्रामस्थांनी बैलांसाठी मोफत चाऱ्याची व्यवस्था केली होती. आकाशवाणी बातम्यांसाठी
रमेश कदम हिंगोली.
विदर्भात
आज पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा होतो. बैलांचे सजवलेले पुतळे वाजत गाजत
मिरवले जातात. या निमित्तानं काढण्यात येणाऱ्या मारबत मिरवणुकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या
बडग्याच्या प्रतिकृतीद्वारे समाजातल्या अनिष्ट रूढी, सामाजिक राजकीय मुद्यांवर लक्ष
वेधलं जातं. गोंदिया मध्ये देखील मारबतचा जल्लोष पहायला मिळाला.
****
महात्मा
जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेची रक्कम १० सप्टेंबरपर्यंत
शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर जमा होणार आहे, ज्या शेतकऱ्यांचं बँकेत बचत खातं नाही त्यांनी
प्राधान्याने ते उघडावं, असं आवाहन औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
यांनी केलं आहे. आधार प्रमाणीकरण नसलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज खात्याशी आधार कार्ड जुळवून
आधार प्रमाणीकरण करून घ्यावं असंही चव्हाण म्हणाले. सन २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षात
घेतलेल्या अल्पमुदती पीक कर्जाच्या परतफेडीच्या देय दिनांकास विचारात घेऊन पीक कर्जाची
मुद्दल आणि व्याजासह पूर्णत: परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्दल रकमेवर पन्नास हजारपर्यंतचा
प्रोत्साहनपर रक्कमेचा लाभ शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर जमा होणार आहे.
****
देशात
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २११ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २५ लाख
८६ हजार ८०५ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २११ कोटी ३९ लाख ८१
हजार ४४४ मात्रा देण्यात आल्या आहेत.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या मालिकेचा हा ९२वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
टोकियो
इथं सुरु असलेल्या बी डब्ल्यू एफ बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक
साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं कांस्य पदक जिंकलं. आज झालेल्या
उपान्त्य फेरीच्या सामन्यात सात्विक - चिराग जोडीला मलेशियाच्या जोडीकडून २२ - २०,
१८- २१, १६ - २१ असा पराभव पत्करावा लागला.
****
भालाफेकपटू
नीरज चोप्रानं लुसाने डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावत इतिहास रचला
आहे. ८९ पूर्णांक शून्य आठ मीटर अंतरावर भाला फेकून त्यानं ही कामगिरी केली असून, ही
स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. या विजयामुळे नीरज डायमंड लीगच्या अंतिम
स्पर्धेसाठी पात्र ठरला असून, ही स्पर्धा सात आणि आठ सप्टेंबरला स्विज्झर्लंडमध्ये
होणार आहे.
****
आशिया
चषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा आजपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु होत आहे. श्रीलंका
आणि अफगाणिस्तान यांच्यात आज पहिला सामना होईल. भारताचा पहिला सामना उद्या पाकिस्तान
विरुद्ध होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी होणार आहे.
****
No comments:
Post a Comment