Monday, 29 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.08.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 August 2022

Time 07.10 AM to 07.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      कुपोषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी तृणधान्या विषयी जागरूकता वाढवण्याची गरज - पंतप्रधान नरेंद्र मोदी

·      काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी येत्या १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार

·      गडचिरोली जिल्ह्यात तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक 

·      औरंगाबादमध्ये नियोजित क्रीडा विद्यापीठाचं लवकरच भुमीपूजन - सहकार मंत्री अतुल सावे

·      लेखक, कलावंतांनी सतत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह धरावा, ज्येष्ठ साहित्यिक -समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांचा आग्रह

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार ६३९ रुग्ण, मराठवाड्यात ३४ बाधित

आणि

·      आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तावर पाच गडी राखून विजय

 

सविस्तर बातम्या

कुपोषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी देशातील जनतेमध्ये तृणधान्या विषयी जागरूकता वाढवण्याची गरज असून, त्यासाठी लोकचळवळ उभारण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रम मालिकेच्या ९२ व्या भागात जनतेशी संवाद साधत होते. संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव मंजूर करून २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा तृणधान्य उत्पादक देश असून, देशाच्या विविध भागातल्या अन्नात तृणधान्यांचे ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, राळे, कोडो, कुटकी, कुट्टू, असे विविध प्रकार पाहायला मिळतात, याकडे लक्ष वेधताना, ऊर्जा तसंच जीवनसत्वांनी परिपूर्ण तृणधान्ये कुपोषणाशी लढण्यासाठी उपयोगी असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. कमी पाण्यात उत्पादन होणाऱ्या तृणधान्यांच्या आरोग्य विषयक विविध वैशिष्ट्यांचा उल्लेख  करत, शेतकऱ्यांनी तृणधान्यांची अधिकाधिक लागवड करून त्याचा लाभ घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. तृणधान्यावर प्रक्रिया उद्योग उभारलेल्या स्टार्ट-अपस्चं पंतप्रधानांनी कौतुक केलं.

आगामी सणासुदीच्या काळात तृणधान्यांपासून शिजवलेल्या पक्वान्नांची छायाचित्रं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. दूरदर्शनवरून प्रसारित होणारी स्वराज मालिका आवर्जून पाहण्याचं आवाहन पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना केलं.

डिजिटल इंडिया, इंटरनेट सुविधा, पोषण मास, अमृत सरोवर, जल संरक्षण आदी मुद्यांवरही पंतप्रधानांनी संवाद साधला. मेजर ध्यानचंद यांची जयंती -राष्ट्रीय क्रीडा दिन, गणेशोत्सव, ओणम, जैन धर्मियांचं संवत्सर पर्व, या निमित्ताने पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

****

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी येत्या १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारणीच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसुदन मिस्त्री आणि ज्येष्ठ नेते के सी वेणूगोपाल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या २४ सप्टेंबरपासून ३० सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून, १ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. ८ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. आवश्यकतेनुसार १७ ऑक्टोबरला मतदान होईल, आणि १९ ऑक्टोबरला नव्या अध्यक्षांच्या नावाची औपचारिक घोषणा होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अनुपस्थितीत ही बैठक झाली. लोकशाही पद्धतीनं पक्षांतर्गत निवडणुका घेणारा काँग्रेस हा देशातला एकमेव पक्ष असल्याचं जयराम रमेश यांनी यावेळी सांगितलं.

****

महाबळेश्वर इथल्या पर्यटन विकास स्थळांचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१४ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. काल महाबळेश्वर इथं झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. भिलार या पुस्तकाच्या गावाला पर्यटनस्थळाचा 'क' दर्जा आहे. मात्र हे गाव 'ब' दर्जाचे पर्यटनस्थळ करण्यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. प्रतापगड संवर्धनाचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

****

विधानसभेच्या येत्या निवडणुकीनंतर राज्यात बहुमतानं शिवसेनेचं सरकार आणण्यासाठी गाव तिथं युवा सेनेची शाखा स्थापन करणार असल्याचं युवा सेनेचे राज्यविस्तारक शरद कोळी यांनी म्हटलं आहे. ते काल सोलापूरात बातमीदारांशी बोलत होते. येणारा काळ हा शिवसेनेचाच असणार आहे, हे पक्ष सोडून जाणाऱ्यांनी लक्षात ठेवावं, असंही ते म्हणाले. निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन त्यांनी युवासैनिकांना केलं.

****


नाशिकमधील प्रतिबंधित तोफखाना क्षेत्रात लष्कराच्या जवानांना शुक्रवारी रात्री एक ड्रोन घिरट्या घालतांना आढळलं. यासंदर्भात प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन उडविल्याबद्दल अज्ञात व्यक्ती विरुद्ध नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वीच नाशिकच्या पोलीस आयुक्तालयाकडून शहरातील 'नो ड्रोन फ्लाईग झोन' घोषित करण्यात आले आहेत. त्याउपरही प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन उडवल्याबद्दल नाशिक पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.

****

परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राखतळ्यातून राख जमा करण्यासाठी स्फोटकं वापरण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. वीज निर्मिती केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थापकाने सतर्कता दाखवत या तिघांना ताब्यात घेऊन ग्रामीण पोलिसांच्या हवाली केलं. मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी अधिक माहिती देत, यामुळे परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रास काही धोका नसल्याचा खुलासा केला आहे.

****

चतुरंग प्रतिष्ठानच्या गेल्या तीन वर्षांसाठीच्या जीवन गौरव पुरस्कारांची घोषणा काल  करण्यात आली. ख्यातकीर्त दिग्दर्शक दत्तात्रय अंबादास मायाळू तथा राजदत्त यांना २०२० सालचा, शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात मोलाचं योगदान देणारे डॉ प्रभाकर मांडे यांना २०२१ सालचा तर दुर्गभ्रमक-गिर्यारोहक बाळकृष्ण ऊर्फ आप्पा परब यांना २०२२ सालचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि तीन लाख रुपये असं या पुरस्काराचा स्वरूप आहे.

****

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याच्या लाहेरी हद्दीतील जंगलातून तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. लाहेरी जिल्हा पोलीस दलाच्या विशेष अभियान पथक आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं संयुक्तपणे ही कारवाई केली. या तिघांवर एकूण दहा लाख रुपयांचे बक्षिस होते. रमेश पल्लो, तानी पुंगाटी, अर्जुन नरोटे अशी या तिघांची नावं आहेत. गेल्या दोन वर्षात ५७ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

****

औरंगाबादमध्ये नियोजित क्रीडा विद्यापीठाचं भुमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच होणार असल्याचं आश्वासन सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अनुषंगानं काल औरंगाबाद इथं जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचा तिसरा जीवन गौरव पुरस्कार खो खो चे ज्येष्ठ संघटक रमेश भंडारी यांना सावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि अर्जुन पुरस्कार विजेते नौकानयनपटू दत्तू भोकनळ यावेळी उपस्थित होते. खेळाडूंनी पायाभूत सुविधा नाहीत म्हणून रडत बसण्यापेक्षा परिस्थितीवर मात करत आपलं ध्येय गाठण्याचं आवाहन भोकनळ यांनी केलं. यावेळी जिल्हाभरातील विविध राष्ट्रीय आणि आतंराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केलेले खेळाडू आणि आदर्श क्रीडा शिक्षकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरवण्यात आलं.

****

चंद्रपूर इथले प्रसिद्ध जलयोग साधक कृष्णाजी नागपुरे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नोंद करण्यात आली आहे. ८५ वर्षीय नागपुरे यांनी चंद्रपूर इथल्या जलतरण तलावात काल जलयोगाची प्रात्यक्षिके सादर केली. कृष्णाजी नागपुरे हे जलयोग करणारे सर्वाधिक वयाचे व्यक्ती ठरले आहेत. ३७ प्रकारच्या योगासनांचं आणि योगमुद्रांचं ३७ मिनिटात सादरीकरण करून आपलं नाव त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद केलं.

****

कचरा व्यवस्थापनाचा एक आदर्श नमुना म्हणून लातूर जिल्ह्याची राज्यात ओळख होईल असा विश्वास नगर परिषद प्रशासनाचे सह आयुक्त रामदास कोकरे यांनी व्यक्त केला आहे. लातूर जिल्ह्यातल्या सर्व  नगर पंचायतींमध्ये जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या सूचनेनुसार कचरा विघटन प्रक्रिया सुरु झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर कोकरे बोलत होते. कोकरे यांनी प्रत्येक नगर पंचायतीत विघटन प्रक्रियेचं प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केलं आहे. औसा नगरपालिकेकडून काल घनकचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक बंदी सप्ताह अंतर्गत दहा पथका मार्फत संपूर्ण शहरात १०० टक्के कचरा विलगीकरण करून, बसस्टॅन्ड ते कचरा डेपो पर्यंत भव्य जनजागृती फेरी काढण्यात आली होती.

****

लेखक, कलावंतांनी सतत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह धरला पाहिजे असं मत ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी व्यक्त केलं आहे. काल औरंगाबाद इथं, संस्कार भारतीच्या एक दिवसीय साहित्य संमेलनाचं उद्धाटन रसाळ यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. भयमुक्त असा लेखक, कलावंत, विचारवंताचा वर्ग या देशामध्ये निर्माण होण्यासाठी साहित्यसंस्थांनी पुढाकार घेण्याचं आवाहन डॉ.सुधीर रसाळ यांनी यावेळी केलं. भरत लोळगे यांनी अध्यक्षीय समारोपात कला व्यक्तीला सुसंस्कृत आणि परिपूर्ण करते ती व्यक्तीला क्षणिक सुख नाही तर खरी शांती आणि खरा आनंद प्रदान करत असल्याचं यावेळी म्हटलं. परिसंवाद, काव्यसंमेलन, मुलाखत असे विविध कार्यक्रम संमेलनात घेण्यात आले.   

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ६३९ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ९६ हजार ४८४ झाली आहे. काल या संसर्गानं राज्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार २२४ झाली असून मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल १ हजार ६९८ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ३६ हजार ५७६ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य दोन शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ११ हजार ६७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ३४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात लातूर जिल्ह्यातल्या १३, औरंगाबाद ११, जालना  ७, बीड २ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

****

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात जांबसमर्थ इथल्या मुर्ती चोरी प्रकरणी काल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री राजेश टोपे यांनी काल ग्रामस्थांशी संवाद साधला. चोरीचा तपास लवकर व्हावा यासाठी वरिष्ठ स्तरावर बोलणं झाल्याचं दानवे यांनी सांगितलं. तर विधीमंडळ अधिवेशनात हा प्रश्न तातडीनं मांडल्याचं सांगत पोलिसांना कार्यबळाचा वापर करुन प्रकरणाचा तपास करावा तसंच मंदिरासह गावात सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं. एक आठवडयापूर्वी जांबसमर्थ इथल्या श्रीराम मंदिरातून ऐतिहासिक नऊ मूर्ती चोरीला गेल्या आहेत.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं पाकिस्तावर पाच गडी राखून विजय मिळवला. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेल्या भारतीय संघाने पाकिस्तान संघाला २० व्या षटकात १४७  धावांवर तंबूत पाठवलं. भुवनेश कुमारनं चार, हार्दिक पंड्या तीन, अर्शदीप सिंग दोन तर अवेश खानने एक बळी घेतला. १४८ या लक्ष्याचा पाठलाग करतांना के एल राहुल शून्यावर बाद झाला. रोहित शर्मा १२, विराट कोहली ३५, रवींद्र जडेजा ३५ आणि सूर्यकुमार यादवने १८ तर हार्दिक पांड्याने १७ चेंडूत नाबाद ३३ धावा केल्या. अष्टपैलू कामगिरी करणारा हार्दिक सामनावीर ठरला. भारताचा पुढचा सामना ३१ तारखेला हाँगकाँग संघासोबत होणार आहे.

****

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी मानवी मूल्यांसाठी संघर्ष केला, ती मूल्य समाजाने जोपासायला हवीत, असं विधीज्ञ वैशाली डोळस यांनी म्हटलं आहे. लहुजी साळवे कर्मचारी महासंघ आणि परिवर्तन ग्रूपच्या विद्यमानं अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त काल औरंगाबाद इथं अभिवादन सभा घेण्यात आली, यावेळी केलेल्या भाषणात विधीज्ञ डोळस यांनी, अण्णाभाऊ यांच्या कार्याला उजाळा दिला.

****

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर तालुक्यात दीपक नगर तांडा इथं मन की बात कार्यक्रमाचं सामुहिक श्रवण केलं. ढोकी इथं भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, निहाल काझी, यांनी मन की बात कार्यक्रम ढोकी ग्रामस्थांसमवेत ऐकला.

****


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लातूर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दयानंद वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं काल लातूर इथं पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात जिल्ह्यातील जवळपास साडे तीन हजार युवकांनी सहभागी नोंदवला. यावेळी १ हजार ४४८ युवकांची प्राथमिक निवड करण्यात आली.

****

No comments: