आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३० ऑगस्ट २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधानांची
आर्थिक सल्लागार परिषद आज नवी दिल्ली इथं रोडमॅप फॉर इंडिया ॲट हंड्रेड अर्थात भारतीय
स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाकडील वाटचालीसाठीचा स्पर्धात्मक आराखडा जारी करणार आहे.
सन २०४७ पर्यंत भारत हा उच्च उत्पन्न मिळवणारा देश व्हावा यादृष्टीनं निश्चित मार्ग
आणि मार्गदर्शन या आराखड्यातून सूचित केलं जाणार आहे.
****
भारतीय परराष्ट्र
सेवेच्या २०२१ बॅचच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांची भेट घेतली. अधिकारी प्रशिक्षणार्थींना आगामी २५ वर्षांचा विचार करून दीर्घकालीन
योजना करण्याचं आणि देशाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्याचं आवाहन, पंतप्रधानांनी
यावेळी केलं.
****
डिजिटल व्यापारासाठी
खुल्या नेटवर्कसह एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमाचं एकत्रीकरण करण्याचं आवाहन केंद्रीय
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं एक जिल्हा
एक उत्पादन गिफ्ट कॅटलॉग आणि स्टोअरफ्रंटचं जीईएम पोर्टलवर उद्घाटन करताना बोलत होते.
डिजिटल व्यापारासाठीचं खुलं नेटवर्क ग्राहक आणि विक्रेत्यांना एकत्र आणून एक जिल्हा
एक उत्पादनाच्या सीमा विस्तृत करायला मदत करतील असं ते म्हणाले.
****
न्यायालयातले
खटले सूचीबद्ध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय नवी प्रणाली तयार करत असून, येत्या १ सप्टेंबरपासून
ही प्रणाली कार्यान्वित होईल, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळित यांनी सांगितलं.
प्रत्येक नोंदणीकृत खटला कोणत्यातरी दिवशी सूचीबद्ध केला जाईल, आणि कोणत्याही अग्रीम
सूचीत समाविष्ट केला जाईल, ही प्रक्रिया दहा दिवसात होईल, त्यामुळे सुनावणीच्या तारखा
कळतील, असं त्यांनी सांगितलं.
****
क्रीडापटूंसाठीच्या
पारितोषिकांच्या रकमेत लक्षणीय वाढ करणार असल्याचं राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन
यांनी म्हटलं आहे. काल राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मुंबईत झालेल्या क्रीडापटूंच्या
सत्कार समारंभात ते बोलत होते.
****
धुळे तालुक्यात
बेकायदेशीररित्या वाहतूक होत असलेला सुमारे साडे वीस लाख रुपयांचा गुटखा पोलिस दलाच्या
स्थानिक गुन्हे शाखेनं पकडला. हा गुटखा इंदूर इथून भिवंडी इथं नेला जात होता, याप्रकरणी
दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
****
No comments:
Post a Comment