Saturday, 27 August 2022

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.08.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२७ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत आज शपथ घेतील. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू न्यायमूर्ती लळीत यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. न्यायमूर्ती उदय लळित हे ७४ दिवस या पदावर राहणार असून, सरासरीपेक्षा हा कार्यकाळ कमी आहे.

****

आगामी काही वर्षात भारत विश्वनेता आणि जागतिक आरोग्य सेवेचा मानदंड ठरेल असं मत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केलं आहे. भारतीय उद्योग महासंघानं ‘महिला आरोग्य सेवेचं भवितव्यया विषयावर मुंबईत आयोजित केलेल्या परिषदेत ते दृक-श्राव्य माध्यमाद्वारे सहभागी झाले होते. आपल्या भाषणात मांडवीय यांनी व्यापक लसीकरण मोहिम, प्रतिबंधात्मक उपचार पद्धती तसंच डिजिटल आरोग्यसेवेमुळे कमी खर्चात सहज उपलब्ध होणारे उपचार यासबंधी माहिती दिली.

****

अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकातल्या ७५ विद्यार्थ्यांची परदेश शिष्यवृत्तीकरीता निवड झाली असून या योजनेंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी दिडशे कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

****

सोलापूर आणि पंढरपूरमध्ये काल सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागानं छापेमारी केली. बांधकाम व्यावसायिक, डॉक्टर्स तसंच पंढरपूरमधले साखर कारखानदार यांची आयकर विभाग चौकशी करत आहे. या व्यक्तींशी संबंधित व्यक्तींना देखील चौकशीसाठी बोलावलं आहे.

****

सातारा इथल्या नगर भूमापन अधिकारी कार्यालयातल्या प्रमुख लिपिकास पाच हजार रुपयांची लाच घेताना काल अटक करण्यात आली. मोजणी नकाशामध्ये अतिक्रमण केलेल्या व्यक्तींची नोंद करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

सांगली जिल्ह्यातल्या शिपूर गावात काल राज्य उत्पादन शुल्क विभागानं गांजाच्या शेतीवर छापा टाकून चारशे झाडं जप्त केली. कोट्यवधी रुपयांचा हा गांजा असून, या प्रकरणी पोलिसांनी एका शेतकऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

****

मराठवाड्यात काल ३६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात लातूर जिल्ह्यातल्या नऊ, उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी सात, औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी चार, परभणी तीन, तर बीड जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे. 

****

No comments: