Sunday, 28 August 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २८ ऑगस्ट २०२२ दुपारी १.०० वा.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 August 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

भरड धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी आगामी नवीन वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे ते जनतेला संबोधित करत होते. संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव मंजूर करून २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केलं आहे. भारताच्या या प्रस्तावाला जगातील ७० पेक्षा अधिक देशांचा पाठिंबा मिळाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. जगभरात बाजरी या भरड धान्याबद्दल आकर्षण वाढते असल्याचं पंतप्रधान म्हणाले. प्राचीन काळापासून तृणधान्य हे आपल्या शेती, संस्कृतीचा आणि परंपरेचा  भाग असून भारत हा जगातील सर्वात मोठा तृणधान्य उत्पादक देश असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. तृणधान्याचा हा उपक्रम यशस्वी करण्याची आपल्या सर्वांवर जबाबदारी आहे. आपण सर्वांनी मिळून याला एक जनआंदोलन बनवायचं आहे, असं पंतप्रधान म्हणाले. तृणधान्याशी संबंधित संशोधन आणि नावीन्यपूर्ण उपयोगांवर लक्ष केंद्रित करण्यासोबतच शेतकऱ्यांनी तृणधान्यांची अधिकाधिक लागवड करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.

****

काँग्रेस पक्षाच्या कार्यकारीणीची आज दुपारी बैठक होत आहे. काँग्रेस अध्यक्षाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमावर या बैठकीत चर्चा करण्यात येईल. पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आजाद यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेस मधली सल्लागार पद्धती नष्ट करण्यात आल्याचा आरोप करत  गुलाम नबी आजाद यांनी राहुल गांधींवर टीका केली होती.

दरम्यान, काँग्रेसचे तेलंगणातील ज्येष्ठ नेते राज्यसभेचे माजी सदस्य एम ए खान यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. देशाला पुढे नेण्यासाठी सक्षम असल्याचा विश्वास जनतेला देण्यात काँग्रेस पक्ष अयशस्वी झाला असल्याचं खान यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

****

केंद्र सरकारनं राष्ट्रीय तपास संस्था- एनआयए, एक केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्था म्हणून अधिक बळकट करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावलं उचलली आहेत, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. छत्तीसगडमधील नवीन रायपूर इथं राष्ट्रीय तपास संस्थेच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय तपास संस्थेने अल्पावधीतच आपल्या कार्यक्षेत्राच्या प्रत्येक पैलूत उच्च मापदंड प्रस्थापित करून जगातील प्रमुख दहशतवादविरोधी तपास संस्था म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली असल्याचं ते म्हणाले.

****

भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयतर्फे दरवर्षी क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागवली जातात. २०२२ च्या क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज पाठवण्याचं आवाहन करणारी अधिसूचना www.yas.nic.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

पुरस्कारासाठी पात्र खेळाडू, प्रशिक्षक, संस्था, विद्यापीठांकडून अर्ज मागवण्यात येत असून या वर्षीपासून, या कार्यासाठी समर्पित एका पोर्टलद्वारे केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. पुरस्कारासाठी मार्गदर्शक तत्त्वांनुसार पात्र असलेल्या अर्जदारांना केवळ dbtyas-sports.gov.in या पोर्टलवर स्वत: अर्ज करण्याची परवानगी आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २११ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २६ लाख ५३ हजारांहून अधिक नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २११ कोटी ६६ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल सुमारे ९ हजार नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर जवळपास १० हजार रुग्ण बरे झाले. देशात सध्या ८६ हजार ५९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर  थं जगभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी तसंच पर्यटन विकास स्थळांचा विकास करण्यासाठी २१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.  मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी आपल्या दुसऱ्याच भेटीत जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठकीचं आयोजन केलं होतं. महाबळेश्वर इथल्या राजभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडलेल्या या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काल हा निर्णय जाहीर केला.

****

गुजरातच्या अहमदाबाद इथे साबरमती नदीवर पादचारी आणि सायकलस्वारांसाठी बनवण्यात आलेल्या फूट ओव्हर पुलाचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकार्पण केलं. या पुलाला माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी बायपेयी यांचं नाव देण्यात आलं आहे.

****

No comments: