Friday, 26 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.08.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 August 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.  आझाद यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानांचं राजीनामा पत्र पाठवलं असून, त्यात त्यांनी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. भारत जोडो यात्रेऐवजी काँग्रेस जोडो यात्रा काढावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या नेतृत्वाखाली पक्षाने आपली पात्रता आणि प्रतिष्ठा गमावली असून, पक्षाची परिस्थिती कधीही न सुधारण्याच्या मार्गावर असल्याचं आझाद यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

****

खाद्यतेल उत्पादक, पॅकिंग करणारे आणि आयातदार यांनी तापमानाशिवाय तेलाचं निव्वळ प्रमाण, आणि घनतेप्रमाणे वजन घोषित करावं असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं या सूचना जारी केल्या आहेत. निव्वळ प्रमाण जाहीर करताना तापमानाचा उल्लेख न करता लेबलिंगमधे सुधारणा करावी, अशी सूचना मंत्रालयानं केली आहे. पुढच्या जानेवारीपासून याची अंमलबजावणी करायला सांगितलं आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २११ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३१ लाख ६० हजार २९२ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २११ कोटी १३ लाख ९४ हजार ६३९ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या दहा हजार २५६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १३ हजार ५२८ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ९० हजार ७०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

कोविडची साथ, त्यामुळे लागू झालेली टाळेबंदी आणि राज्य सरकारनं कोविड संकटाशी सामना करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा, राज्याच्या अर्थकारणावर मोठा परिणाम झाला असल्याचं मत, कॅगनं आपल्या अहवालात नोंदवलं आहे. राज्याच्या कर संकलनात सुमारे १३ टक्क्यांची तूट झाली, भांडवली खर्च सुमारे साडे अठरा टक्क्यांनी कमी झाला, तर कर्जात सुमारे ५२ टक्क्यांची वाढ झाल्याचं कॅगनं म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २८ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

बैलपोळ्याचा सण आज साजरा होत आहे. वर्षभर शेतात शेतकऱ्यासमवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलाप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणून आपल्या सर्जाराजाचा पोळा हा सण शेतकरी बांधव श्रावण अमावस्येला अर्थात पिठोरी अमावस्येला अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात.

****

महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत पदकधारकांना काल अनुदान मंजूर करण्यात आलं. शासन निर्णयानुसार सैन्यातल्या १६ प्रकारच्या शौर्यपदक आणि सेवापदक धारकांना, शासनामार्फत अनुदान देण्यात येतं. परभणी जिल्ह्यातले कर्नल समीर बळवंत गुजर यांना मेन्शन इन डिस्पॅच हे पदक बहाल करण्यात आलं असून, या पुरस्काराकरता सहा लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. यात ५० टक्के रक्कम ही शासकीय अनुदानातून तर उर्वरित रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीतून घेण्यात आलेल्या, आणि राष्ट्रीयकृत बँकेत सद्यस्थितीत गुंतवण्यात आलेल्या रकमेच्या व्याजातून अदा करण्यात येणार आहे.

****

महावितरणच्या थकबाकी वसुली मोहिमेत काल औरंगाबाद शहरातल्या विविध भागात ५१३ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तर वीजपुरवठा खंडित असलेल्या ११४ ग्राहकांचं मीटर आणि सर्व्हिस वायर काढून घेण्यात आलं. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर ग्राहकानं परस्पर किंवा शेजाऱ्यांकडून वीजपुरवठा घेतल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा महावितरणनं दिला आहे. सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांच्या निर्देशानुसार ही मोहीम सुरू आहे.

****

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचा स्टर्टअप यात्रा रथ आज औरंगाबाद जिल्ह्यात दाखल होत आहे. शहरातल्या रेल्वेस्टेशन परिसरात मराठवाडा ॲसेलरेटर फॉर ग्रोथ अँण्ड इन्क्यूबिएशन कौन्सिल - मॅजिकच्या कार्यालयात दुपारी दोन वाजता हा रथ दाखल होणार आहे. नावीन्यपूर्ण कल्पना असलेले नागरिक आपल्या कल्पना यावेळी नोंदवू शकतात. अधिक माहितीसाठी आणि सहभाग नोंदवण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस आय एन एस डॉट इन किंवा डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा स्टार्टअप यात्रा डॉट इन या संकेत स्थळाला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

टोकियो इथं सुरु असलेल्या बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या सामन्यात त्यांनी जपानच्या जोडीचा २४-२२, १५-२१, २१-१४ असा पराभव केला.

****

No comments: