Saturday, 27 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.08.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 August 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा

·      शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची आगामी सर्व निवडणुका एकत्रित लढवण्याची घोषणा

·      सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची राज्यस्तरीय स्पर्धा-सांस्कृतिक कार्य विभागाचा निर्णय

·      देशातल्या २१ बोगस विद्यापीठांची यावं यूजीसीकडून जाहीर; राज्यातल्या एका विद्यापीठाचा समावेश

·      राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्या क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत पाच पटीनं वाढ

·      राज्यभरात पोळ्याचा सण पारंपारिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरा

·      आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ;उद्या भारत-पाकिस्तान सामना

आणि

·      जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचा उपांत्य फेरीत प्रवेश

 

सविस्तर बातम्या

ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. आझाद यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानांचं पत्र पाठवलं असून, त्यात त्यांनी अत्यंत जड अंतकरणानं गेली पाच दशकं काँग्रेसशी असलेले संबंध आपण तोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस पक्षानं भारत जोडो यात्रेऐवजी प्रथम काँग्रेस जोडो अभियान राबवायला हवं होतं. पक्षातील त्रुटींचा उल्लेख करणाऱ्या २३ नेत्यांना अपमानित केलं गेल्याचंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या नेतृत्वाखाली पक्षानं आपली पात्रता आणि प्रतिष्ठा गमावली असून, पक्षाची परिस्थिती कधीही न सुधारण्याच्या मार्गावर असल्याचं आझाद यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. काँग्रेस पक्षानं गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा दुःखद असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महागाई, बेरोजगारी आणि ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावर पक्ष भारतीय जनता पक्षाशी लढत असताना, आझाद यांनी पक्ष सोडला असल्याचं पक्षाचे महासचिव अजय माकन यांनी म्हटलं आहे.

****

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडनं राज्यातल्या आगामी सर्व निवडणुका एकत्रित लढवण्याची काल घोषणा केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी मुंबईत पत्रकारांना ही माहिती दिली. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित मेळावे देखील घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ही वैचारिक युती असल्याचं सांगत ठाकरे यांनी, विरोधी पक्ष संपवण्याचं केंद्राचं कारस्थान हाणून पाडण्यासाठी, समविचारी संघटनांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. प्रादेशिक पक्षांना एकत्रित येण्याचं आवाहन करतांना ते म्हणाले...

Byte …

केवळ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशांमध्ये प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकणं, मारून टाकणं, प्रादेशिक पक्ष, इतर पक्ष संपवून टाकणं यालाच लोकशाही मानणारे काही लोकं हे आता बेताल बोलायला आणि वागायला लागलेले आहेत. गेले महिना - दोन महिने अनेक जणं जे आपल्या विचारांचे आहेत पण आणि काही हे शिवसेनेच्या विचारांशी जवळपाससुद्धा येणारे नाहीत अशी काही लोकं ही स्वतःहून मला सांगतायत की आता संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे.

 

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आखरे यांनी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या एकत्र येण्यानं एक चांगलं समीकरण तयार होईल, अशी आशा व्यक्त केली.

****

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून, त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे. मुंबई-बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत येत्या ११ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

****

राज्यातल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागानं घेतला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनग़ंटीवार यांनी काल ही माहिती दिली. राज्यस्तरावर पाच लाख रुपये, अडीच लाख रुपये आणि एक लाख रुपये इतक्या रकमेची पारितोषिकं आणि प्रमाणपत्र, तसंच जिल्ह्यातल्या प्रथम क्रमांकाच्या मंडळाला पंचवीस हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. यासाठीचे अर्ज शासनाच्या दार्शनिक विभागाच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येत्या ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील.

****

५० टक्क्यांपेक्षा अधिक वीज हानी होत असलेल्या वाहिन्यांवरील वीज गळतीचं प्रमाण कमी करण्यासाठी महावितरणनं मोहीम हाती घेतली आहे. राज्यात महावितरणच्या १६ परिमंडळातल्या २३० पेक्षा जास्त वीज वाहिन्यांच्या ठिकाणी, ही मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती, महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे.

****

राज्याच्या ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागातल्या गट क संवर्गातल्या कर्मचाऱ्यांच्या भरतीचं वेळापत्रक काल जाहीर केलं. १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी गट क या सवर्गातल्या पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेनंतर पुढच्या १५ दिवसात निकाल घोषित केले जाणार असल्याचंही ग्रामविकास विभागानं जाहीर केलं आहे .

****

विद्यापीठ अनुदान आयोगानं देशातल्या २१ बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. यात राज्यातल्या नागपूरच्या राजा अरॅबिक विद्यापीठाचा समावेश आहे. सर्वाधिक आठ बोगस विद्यापीठं दिल्लीत आहेत. उत्तर प्रदेशात चार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी दोन, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि पुदुच्चेरीमध्ये प्रत्येक एक बोगस विद्यापीठ असल्याचं आयोगानं जाहीर केलं आहे.

****

निवडणूक प्रचारात मतदारांना भेटवस्तू दिल्या जातात या संदर्भात तज्ज्ञ समिती आणि सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलवावी, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन.व्ही.रमणा यांनी सेवानिवृत्तीपूर्वी काल अखेरच्या दिवशी हे निर्देश दिले. निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवण्यासाठी मोफत सेवा सुविधा किंवा भेटवस्तू देणाऱ्या पक्षांची नोंदणी रद्द करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर त्रिसदस्यीय पीठ सुनावणी करेल असं रमणा यांनी सांगितलं. न्यायमूर्ती रमणा यांच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी काल प्रथमच सरन्यायाधीशांच्या कक्षात झालेल्या २० प्रकरणांच्या सुनावणीचं थेट प्रसारण करण्यात आलं.

****

देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत आज सकाळी शपथ घेतील. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू न्यायमूर्ती लळीत यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील.

****

केंद्र आणि राज्य शासनाच्या संघटित आणि असंघटित कामगारांच्या हिताच्या विविध योजना एकत्रितपणे राबवण्याचं आश्वासन राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश  खाडे यांनी दिलं आहे. केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या वतीनं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती इथं सुरु झालेल्या कामगार मंत्री आणि कामगार सचिवांच्या राष्ट्रीय परिसंवादात ते काल बोलत होते. राज्यातल्या बांधकाम कामगरांकरता बांधकाम कामगार मंडळामार्फत देण्यात येत असलेल्या सुविधा आणि आर्थिक सामग्रीच्या मदतीसंदर्भात संपूर्ण माहिती खाडे दिली. यासंदर्भात इतर राज्यांनी महाराष्ट्राचं मार्गदर्शन घ्यावं असं केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी यावेळी सांगितलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

राज्य शासनानं राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मधल्या पदक विजेत्या क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत पाच पटीनं वाढ केली असल्याची माहिती, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या आधी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना १० लाख रुपये देण्यात येत होतं, आता ही रक्कम ५० लाख रुपये करण्यात आली आहे. रौप्यपदक विजेत्या खेळाडूंसाठी साडे सात लाख रुपयांऐवजी ३० लाख रुपये तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूंना पाच लाख रुपयां ऐवजी २० लाख रुपये करण्यात आले आहेत.

खेळाडूंच्या मार्गदर्शकांच्याही बक्षिसांची रक्कम वाढवण्यात आली आहे. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकासाठी साडेबारा लाख रुपये, रौप्यपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकांना साडे सात लाख रुपये तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकांना ५ लाख रुपये बक्षिस देण्यात येणार आहे.

****

नाविन्यता संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा काल जालना शहरात दाखल झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात दाखल झालेल्या या यात्रेतल्या मोबाईल वाहनाची जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी पाहणी केली. २९ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात भ्रमण करणाऱ्या या यात्रेत जास्तीत जास्त विद्यार्थी आणि नवउद्योजकांनी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

लातूर महानगरपालिकेनं २०२२-२३ या आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या मागणी बिलातच पाणीपट्टीचाही समावेश केला आहे. त्यानुसार मालमत्ता धारकांना बिलं वाटप करणं सुरू झालं आहे. नागरिकांच्या सोयीसाठी मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करण्याकरता पालिकेनं, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट प्रॉपर्टी टॅक्स डॉट एम सी लातूर डॉट इन हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिलं आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ८४६ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ९३ हजार १२२ झाली आहे. काल या संसर्गानं राज्यात चार रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार २१८ झाली असून मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल दोन हजार २४० रुग्ण बरे झाले.  राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ३३ हजार ३३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य दोन शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ११ हजार ८७१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ३६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात लातूर जिल्ह्यातल्या नऊ, उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी सात, औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी चार, परभणी तीन, तर बीड जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे. 

****

राज्यात काल शेतकऱ्यांनी पोळ्याचा सण पारंपारिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला. वर्षभर शेतात शेतकऱ्यासमवेत राबणाऱ्या बैलांची प्रथेनुसार पूजा करुन त्यांची मिरवणूक काढण्यात आली. 

यवतमाळ शहरात नगर परिषदेनं भरवलेल्या पोळ्यात राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी बैलांची पूजा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांच्या हस्ते उत्कृष्ट बैलजोड्यांना बक्षिस वितरित करण्यात आलं.

भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यात सातोना गावात ट्रॅक्टर पोळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शेतात काम करताना मोठ्या प्रमाणात यांत्रिकरणाची मदत घेतली जात आहे. बैलांची जागा आता ट्रॅक्टरनं घेतली, या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमात, गावातल्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली.

अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यात रासेगावमध्ये पोळ्याच्या सणाच्या दिवशी आपल्या मालकाला आर्थिक हातभार लावणाऱ्या गाढवांचा पोळा भरवण्यात येतो. बैलांप्रमाणेच गाढवांना साजशृंगार करून पुरणपोळीचा नैवद्य दिला जातो.

****

औरंगाबाद शहरात हर्सुल परिसरात काल सायंकाळी पारंपरिक पद्धतीनं बैलांची मिरवणूक काढून त्यांना पुरणपोळीचा घास भरवण्यात आला.

बीड जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरी भागात सजवलेल्या बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.

जालना जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोळ्याच्या दिवशीच आठ गायींसह दोन बैल दगावले. परतूर तालुक्यातल्या अंबा इथं एका शेतकऱ्यानं वन्य प्राण्यांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी सोडलेल्या विद्युत प्रवाहाचा शेतात आलेल्या आठ गाईंचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या घटनेमुळे ग्रामस्थांनी पोळा सण साजरा न करता दुखवटा पाळला. घनसावंगी तालुक्यातल्या घोंशी इथं खदानीवर धुण्यासाठी नेलेल्या दोन बैलांचा बुडून मृत्यू झाला.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु होत आहे. श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात आज पहिला सामना होईल. भारताचा पहिला सामना उद्या पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी होणार आहे.

****

जपानमध्ये टोक्यो इथं सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने काल उपांत्य फेरीत प्रवेश केला. यामुळे भारताचं या स्पर्धेत पुरुष दुहेरीतलं पहिलं पदक निश्चित झालं आहे .आज सकाळी हा सामना होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सात्त्विक-चिरागने यजमान जपानच्या गतविजेत्या ताकुरो होकी-युगो कोबायाशीचे आव्हान २४-२२, १५-२१, २१-१४ असं संपुष्टात आणलं. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असणाऱ्या सात्त्विक-चिराग जोडीने याच महिन्यात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विजेतेपद मिळवलं आहे.  

****

यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक, पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत साजरा करावा असं आवाहन, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गणेश मंडळ आणि नागरिकांना केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत ते काल बोलत होते. उत्सव साजरा करण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या सुलभरित्या देण्यात येणार असून, तहसीलनिहाय मदत कक्षाद्वारे मार्गदर्शन करण्याच्या सूचना त्यांनी जारी केल्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी देशभक्तीपर देखाव्यांना प्राधान्य द्यावं असं ते म्हणाले. तालुकास्तरावरच्या स्पर्धेतून जिल्हास्तरावर क्रमांक पटकावणाऱ्या गणेश मंडळांना प्रोत्साहनपर बक्षीस जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

भारतीय संरक्षण दलामार्फत राज्यात घेण्यात येणाऱ्या पाच भूदल सैन्यभरती मेळाव्यांसाठीच्या अनुदानात सहा लाखांवरून नऊ लाख इतकी वाढ करण्यात आली आहे. वायूदल, नौदल आणि महिला भूदल सैन्यभरती मेळाव्यांसाठीही तीन लाख मंजूर करण्यात आले. यावर्षी एकूण १० मेळाव्यांसाठी ६० लाख इतक्या रकमेस मान्यता देण्यात आली आहे  .

****

No comments: