आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२९ ऑगस्ट २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
आज राष्ट्रीय
क्रिडा दिवस.हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. चालू वर्ष खेळांसाठी महत्त्वाचं ठरलं असल्याचं पंतप्रधानांनी
आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.तसंच पदक मिळवण्याचं आणि देशभरात खेळांप्रती आवड अशीच
वाढत राहील अशी इच्छा त्यांनी आपल्या संदेशात व्यक्त केली आहे.
***
देशात कोविड
प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २११ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २४ लाख ७० हजार
नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २११ कोटी ९१ लाख मात्रा देण्यात
आल्या आहेत.
***
गडचिरोली जिल्ह्यातील
भामरागड तालुक्याच्या लाहेरी हद्दीतील जंगलातून तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात
आली आहे. यामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. लाहेरी जिल्हा पोलीस दलाच्या
विशेष अभियान पथक आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं संयुक्तपणे ही कारवाई केली. या तिघांवर
एकूण दहा लाख रुपयांचे बक्षिस होते. रमेश पल्लो, तानी पुंगाटी, अर्जुन नरोटे अशी या
तिघांची नावं आहेत. गेल्या दोन वर्षात ५७ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे.
***
नांदेड-लोहा-अहमदपूर-लातूर
तसंच नांदेड-मुखेड-लातूर या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात यावी अशी मागणी नांदेडचे
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भाग शहरी
भागाशी जोडण्यासाठी तसंच महाराष्ट्र - तेलंगणा राज्य जोडण्यासाठी हा एक पर्यायी मार्ग
ठरेल, असं चिखलीकर यांनी म्हटलं आहे.
***
आगामी गणेशोत्सवाच्या
पार्श्वभूमीवर जालना शहरातल्या मिरवणूक मार्गाची जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, तसंच
पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांनी काल पाहणी केली. मिरवणूक मार्गातले अडथळे दूर करण्याबरोबर
रस्त्यावरचे खड्डे तातडीनं बुजवावेत, तसंच सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक खबरदारी घेण्याचे
निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले.
***
अकोला शहरात
काल संत गाडगेबाबा सेवा समितीच्या वतीने शाडू माती पासून गणेश मूर्ती निर्मितीची कार्यशाळा
आयोजित करण्यात आली होती.
***
No comments:
Post a Comment