आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२६ ऑगस्ट २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
गव्हाच्या पिठासाठी
निर्यात बंदीतून सूट देण्याच्या धोरणात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला आर्थिक व्यवहार
विषयक मंत्रिमंडळ समितीनं मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे आता गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर
निर्बंध घालता येतील. त्यामुळे गव्हाच्या पिठाच्या वाढत्या किमतींना आळा बसेल आणि समाजातल्या
सर्वात असुरक्षित घटकांची अन्न सुरक्षा सुनिश्चित होईल.
****
तरुणांना लष्करी
सेवेत भरती करण्याच्या अग्निपथ योजनेच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यायला दिल्ली उच्च
न्यायालयानं नकार दिला. या योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर येत्या चार आठवड्यांमध्ये
उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत.
****
आर्थिक गैरव्यवजार
प्रतिबंधक कायद्यातल्या सुधारणा उचलून धरणाऱ्या आपल्या आदेशाचा फेरविचार करण्याची मागणी
करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. कार्ती चिदंबरम यांनी दाखल
केलेल्या या याचिकेवर जबाब दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत.
****
बैलपोळ्याचा
सण आज साजरा होत आहे. वर्षभर शेतात शेतकऱ्यासमवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलाप्रती एक
दिवस उतराई होण्याची संधी म्हणून आपल्या सर्जाराजाचा पोळा हा सण शेतकरी बांधव श्रावण
अमावस्येला अर्थात पिठोरी अमावस्येला अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. .
दरम्यान, औरंगाबाद
जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या नारायणगाव इथं पोळा सणानिमित्त नदीवर बैल धुण्यासाठी
गेलेल्या शेतकरी तरुणाचा काल बुडून मृत्यू झाला. बाळू गवळी असं या तरुणाचं नाव आहे.
****
नाशिक जिल्ह्यात
दिंडोरी तालुक्यातला मंडल अधिकारी कामरूद्दीन गुलाम मोहम्मद सय्यद याला दहा हजार रुपयांची
लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं. एका शेत जमिनीच्या सात बारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी
त्यानं ही लाच मागितली होती.
****
बी डब्ल्यू एफ
जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरूष एकेरीत एच एस प्रणॉयनं लक्ष्य सेनचा १७-२१, २१-१६ आणि २१-१७ असा पराभव
करत उपउपांत्य फेरी गाठली. सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, तसंच ध्रुव
कपिला आणि एम आर अर्जुन या दोन भारतीय जोड्यांनी पुरूष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत
प्रवेश केला आहे.
****
No comments:
Post a Comment