Wednesday, 31 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.08.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 August 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यात दहा दिवसीय गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. गणेश मूर्ती, रोषणाई आणि पुजेच्य साहित्यांनी बाजारपेठ फुलली असून ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश प्रतिष्ठापना करण्याची तयारी केली असून मोठ्या गणेशमूर्ती मंडपात आणल्या आहेत. आज सायंकाळपर्यंत त्यांची विधीवत प्रतिष्ठापना केली जाईल.

***

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज सकाळी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. राज्याच्या विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी बळ देण्याबरोबरच राज्यातील जनतेला सुखी-समृद्ध, समाधानी ठेवण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी गणरायाला घातलं. गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा जपतांनाच निर्भय, मुक्त वातावरणात, आनंद-जल्लोषात तसेच पर्यावरणपूरक वातावरणात हा गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं.

***

धुळे शहर आणि जिल्ह्यात आज गणरायाचं मोठ्या उत्साहात सर्वत्र आगमन होत आहे. सकाळ पासूनच धुळे शहरातील फुलवाला चौक, संतोषी माता चौक, दत्त मंदिर चौक येथून गणपती मुर्ती भाविक सहकुंटूंब घरी घेवून जात आहेत. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी शाडूच्या मातीची गणेश मुर्ती घेण्याला प्राधान्य दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

***

सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात ३५० सार्वजनिक मंडळात आज गणेश मुर्तींची प्रतिष्ठापना होत आहे. शहरात गणेश चतुर्थीच्या पूर्व संध्येला गणेशमूर्तींच सहवाद्य मिरवणुकांसहित आगमन करण्यात आलं. यावर्षी गणेशोत्सव साजरा करताना शासनाने निर्बंध शिथिल केल्याने अनेक मंडळ उंच गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

***

श्रीवैष्णो देवी मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंचा प्रवास सुलभ करण्यासाठी कटरा इथं इंटर मोडल स्थानक विकसित केलं जात आहे. यासंबंधी राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टीक व्यवस्थापन लिमिटेड- एनएचएलएमएल आणि कटरा विकास प्राधिकरण यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही के सिंह, तसेच केंद्रीय आणि राज्य सरकारमधील अधिकारी यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

***

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी इथल्या अनुसयात्मक दिव्यांग पुनर्वसन केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली आहे. दिव्यांग आणि मतिमंद विद्यार्थ्यांना अन्नातून झालेल्या विषबाधा प्रकरणाची दखल घेत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागानं आपला अहवाल दिव्यांग आयुक्तालयाला पाठवून सदर पुनर्वसन केंद्राची मान्यता रद्द केली आहे. गेल्या २५ ऑगस्टला रात्रीच्या जेवणानंतर झालेल्या विषबाधेतून केंद्रातील दोन मुलांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता तर अन्य सहा विद्यार्थ्यांवर उपचार सुरु होते.

***

रशियाचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. अमेरिका आणि तत्कालिन संयुक्त रशिया यांच्यात विभाजीत देशांच्या गटांमध्ये सुरू असलेलं शीतयुद्ध संपवण्यात गोर्बाचेव्ह यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी १९८५ मध्ये रशियाची सुत्रे स्वीकारली आणि तत्कालिन युनियन ऑफ सोव्हिएत सोशॅलिस्ट रिपब्लीक- युएसएसआरच्या प्रगती आणि विकासात योगदान दिलं. गोर्बाचेव्ह यांनी रशियाच्या व्यवस्थेत महत्त्वाचे बदल घडवले.

***

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१२ कोटी ३९ लाख मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २२ लाख ५० हजार लसीच्या मात्रा देण्यात आल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. आतापर्यंत १०२ कोटी २९ लाखांहून अधिक जणांना लसीची पहिली मात्रा, ९४ कोटी २४ लाखांहून अधिक नागरीकांनी दुसरी, तर १५ कोटी ८३ लाखांहून अधिक नागरीकांनी वर्धक मात्रा घेतली असल्याचंही आरोग्य

मंत्रालयानं म्हटलं आहे.

दरम्यान, देशात काल नव्या सात हजारांहून अधिक कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ११ हजार रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ६७ शतांश टक्के झाला आहे. देशात सध्या ६४ हजारांवर रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

***

जागतिक वरिष्ठ कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १० सप्टेंबरपासून सर्बिया इथं या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.  १० सदस्य असलेल्या पुरुष फ्री स्टाईल संघाचं नेतृत्व राष्ट्रमंडळ खेळांत सुवर्णपदक प्राप्त विजेता बजरंग पुनिया करणार आहे. तर ९ सदस्य महिला संघाच नेतृत्व राष्ट्रमंडळ खेळांत तीनवेळा सुवर्णपदक प्राप्त विजेत्या विनेश फोगाट करणार आहे.

***

No comments: