Friday, 26 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.08.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  26 August  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ ऑगस्ट २०२   सायंकाळी ६.१०

****

·      काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा.

·      गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना पथकर माफ करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय.

·      राज्यातील आगामी सर्व निवडणुका एकत्रित लढवण्याची शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची घोषणा.

·      ५० टक्क्यांपेक्षा अधिक वीजहानी असलेल्या वाहिन्यांवरील वीज गळतीचं प्रमाण कमी करण्यासाठी महावितरणची मोहीम.

·      पैठणच्या जायकवाडी धरणात सध्या पाण्याची आवक थांबल्यामुळं धरणाचे सर्व १८ दरवाजे बंद.

आणि

·      राज्यात पोळ्याचा सण पारंपारिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा.

****

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. आझाद यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानांचं पत्र पाठवलं असून, त्यात त्यांनी अत्यंत जड अंतकरणानं गेली पाच तशक काँग्रेसशी असलेले संबंध आपण तोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस पक्षानं भारत जोडो यात्रेऐवजी प्रथम काँग्रेस जोडो अभियान राबवायला हवं होतं. पक्षातील त्रुटींचा उल्लेख करणाऱ्या २३ नेत्यांना अपमानित केलं गेल्याचंही त्यांना आपल्या पत्रात म्हटलं आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या नेतृत्वाखाली पक्षाने आपली पात्रता आणि प्रतिष्ठा गमावली असून, पक्षाची परिस्थिती कधीही न सुधारण्याच्या मार्गावर असल्याचं आझाद यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. काँग्रेस पक्षानं गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा दुःखद असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पक्ष महागाई, बेरोजगारी आणि ध्रुवीकरणाच्या मुद्यावर भारतीय जनता पक्षाशी लढत असताना आझाद यांनी पक्ष सोडला असल्याचं पक्षाचे महासचिव अजय माकन यांना म्हटलं आहे.

****

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासंदर्भात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. २००७ मध्ये गोरखपूर इथं आदित्यनाथ यांनी प्रक्षोभक भाषण दिलं होतं असं या याचिकेत म्हटल होतं. मुख्य न्यायाधीश एन वी रमणा, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती सी टी रवि कुमार यांच्या पीठीनं आज हा निर्णय दिला.

****

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आश्वासक अभियानाअंतर्गत आतापर्यंत देशातील ६८ हजारांहून अधिक गावांमधल्या एक कोटी लोकांची तपासणी करण्यात आली आहे. देशातील क्षय रोगाच्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. गेल्या जानेवारी महिन्यात नंदूरबार जिल्ह्यातून हे अभियान सुरु करण्यात आलं होतं.

****

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना पथकर माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून करण्यात येणार असून पथकर नाक्यांवर ही सवलत ११ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातले रस्ते दुरुस्त करण्याच्या दृष्टीनं सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गावर पळस्पे ते इंदापूर दौरा केला. कोणत्याही परिस्थितीत युद्धपातळीवर प्रयत्न करुन गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करुन ते वाहतुकीसाठी सुसज्ज करावे असे आदेश त्यांनी संबंधित विभाग आणि कंत्राटदारांना दिले आहेत.

****

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडनं राज्यातील आगामी सर्व निवडणुका एकत्रित लढवण्याची आज घोषणा केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी ही मुंबईत पत्रकारांना ही माहिती दिली. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित मेळावे देखील घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ही वैचारिक युती असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आखरे यांनी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या एकत्र येण्यानं एक चांगलं समीकरण तयार होईल, अशी आशा व्यक्त केली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा रविवारी २८ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

५० टक्क्यांपेक्षा अधिक वीजहानी असलेल्या वाहिन्यांवरील वीज गळतीचं प्रमाण कमी करण्यासाठी महावितरणनं मोहीम हाती घेतली आहे. सध्या महावितरणच्या १६ परिमंडळातील २३० पेक्षा जास्त वाहिन्यांवर राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेत वीज चोरांविरुद्ध धडक कार्यवाही, नादुरुस्त मीटर बदलणं, एरियल बंच केबल्स टाकणे, मल्टी मीटर बॉक्स बसवणं, कॅपॅसिटर बसवणं आणि वीज भाराचा समतोल राखणे आदी कामे करण्यात येत आहेत अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे. ही योजना जलदगतीनं राबवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निर्देश दिले आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या जायकवाडी धरणात सध्या पाण्याची आवक थांबल्यामुळं धरणाचे सर्व १८ दरवाजे बंद करण्यात आले आहेत. यापुढं पाण्याची होणारी आवक पहाता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असं धरण विभागाचे अभियंता विजय काकडे यांनी कळवलं आहे.

****

नाविन्यता संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा जालना शहरात दाखल झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात दाखल झालेल्या या यात्रेतील मोबाईल वाहनाची जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी पाहणी केली. २९ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात भ्रमण करणाऱ्या या यात्रेत जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त विद्यार्थी आणि नवउद्योजकांनी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

लातूर महानगरपालिकेनं २०२२-२३ या आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या मागणी बिलातच पाणीपट्टीचाही समावेश केला आहे. त्यानुसार मालमत्ता धारकांना बिलं वाटप करणं सुरू झालं आहे. नागरिकांच्या सोयीसाठी मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करण्याकरता पालिकेनं www.propertytax.mclatur.in ही वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २११ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३१ लाख ६० हजार २९२ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २११ कोटी १३ लाख ९४ हजार ६३९ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या दहा हजार २५६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १३ हजार ५२८ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ९० हजार ७०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

राज्यातील शेतकरी आज पोळ्याचा सण पारंपारिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करत आहेत. वर्षभर शेतात शेतकऱ्यासमवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलांची पूजा आणि मिरवणूक काढण्याची प्रथा ग्रामीण भागात आहे.

****

यवतमाळ इथल्या राळेगाव तालुक्यातल्या सरबई इथं पोळ्यानिमित्त बैल धुवायला गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा गाळात फसून मृत्यू झाला. बैल धुण्यास तलावात उतरले असता दोघेही पाण्याच्या गाळात फसल्याने त्यांना बाहेर निघता आले नाही त्यामुळे पाण्यात बुडुन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

****

धुळे महापालिकेचे भारतीय जनता पक्षाचे महापौर प्रदीप कर्पे यांच्या प्रभागात २२ लाख रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेला रस्ता चोरीला गेल्याचा आरोप करत शिवसेनेनं आंदोलन केलं. यावेळी महापालिका आयुक्तांना घेराव घालण्यात आला. शिवसेनेच्या आंदोलनानंतर महापौर प्रदीप कर्पे यांनी सेनेवर खोटे आरोप करत असल्याचं म्हणत टीका केली.

****

नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेश बागूल यांना २८ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील स्वयंपाक गृहाच्या उभारणीसाठी ठेकेदाराकडून २८ लाख ८० हजार रुपयांच्या लाचेची त्याने मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारतांना काल सायंकाळी बागूलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली होती. त्यानंतर बागूलच्या पुण्यातील घराच्या झडतीत ४८ लाख रुपये तर नाशिकच्या घरातून ९८ लाख रुपये अशी एकूण एक कोटी ४६ लाख रुपयांची रोकडही लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं जप्त केली आहे.

****

प्रसिद्ध चित्रपट निर्माते सावनकुमार टाक यांच्या पार्थिवावर आज मुंबईच्या पवन हंस स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. यापूर्वी त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी जुहूच्या त्यांच्या घरी ठेवण्यात आलं होतं. चित्रपट क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सावनकुमार यांचं काल मुंबईत निधन झालं.

****

सोलापूर आणि पंढरपूरमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. सोलापूरमधले बांधकाम व्यावसायिक, डॉक्टर्स तसंच पंढरपूरमधले साखर कारखानदार यांची आयकर विभाग चौकशी करत आहे. या व्यक्तींशी संबंधित व्यक्तींना देखील चौकशीसाठी बोलावलं आहे.

****

कोल्हापुरात मध्यरात्री जवळपास सव्वा दोनच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता २ पूर्णांक ९ दशांश रिक्टर स्केल एवढी होती, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली १० किलोमीटरवर होता.

****

No comments: